लातूर : ‘चला कवितेच्या बनात’ व ‘झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन’ उदगीर यांच्या वतीने लातूर येथील साहित्यिक तथा इतिहास संशोधक विवेक सौताडेकर यांना ‘राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
विवेक सौताडेकर हे गेल्या दोन दशकापासून शिक्षण क्षेत्रामध्ये अनुक्रमे विषयतज्ज्ञ, जिल्हा समन्वयक पदांवर कार्यरत आहेत.यापूर्वी त्यांनी शिक्षक व प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. जिल्हा परिषद,शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यामार्फत आजवर प्रकाशित झालेल्या शिक्षण विषयक अनेक पुस्तिकांच्या संपादक मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे.शिवाय अनेक शासकीय उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून अनेक प्रशिक्षणांमध्ये त्यांनी साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्व. कांताबाई मारुती तलवाडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि.३ ऑगस्ट २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कवयित्री शांताबाई गिरबणे या उपस्थित असून प्रमुख अतिथी नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. हंसराज वैद्य व परभणी येथील सुप्रसिद्ध कवी व गजलकार प्रा.अरविंद सगर हे असून मंचावर आयोजक संस्था असणाऱ्या ‘चला कवितेच्या बनात’ या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अनंत चंपाई माधव कदम व’झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन ‘ च्या संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील जीएसटीकर निरीक्षक डॉ.प्रेमिलातलवाडकर, निवृत्त अधिकारी मारुती तलवाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी अनेकांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अनंत चंपाई माधव कदम यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ.प्रेमिला तलवाडकर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. सगर यांनी केले.