सूर्योदयापासून सुरू झाले होम-हवन
महासोमयागात दुसरे दिवशी विद्यार्थ्यांसह भक्तांची मोठी गर्दी
लातूर/प्रतिनिधी:लातूर येथील बालाजी मंदिरच्या परिसरात सुरू असणाऱ्या सर्वस्तोमोतीरात्र महासोमयागात दुसरे दिवशी सूर्योदयापासूनच हवनास प्रारंभ झाला.यागाच्या दुसरे दिवशी प्रवर्ग्य हा प्रमुख विधी होता. याशिवाय सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रमही लक्षवेधी ठरला. दिवसभर सुरू असणाऱ्या वेदमंत्रांच्या घोषांनी यज्ञभूमी अर्थात बालाजी मंदिरचा परिसर दुमदुमला. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुकामठ गुरु मंदिर तथा विश्व फाऊंडेशन,शिवपुरी,अक्कलकोट, श्री दत्त मंदिर देवस्थान महासोमयाग समिती,लातूरच्या वतीने आयोजित सर्वस्तोमोतीरात्र महासोमयागास शुक्रवारी (दि.२३)प्रारंभ झाला.बालाजी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य यज्ञभूमीत ३५ पुरोहितांच्या उपस्थितीत शुक्रवारी धार्मिक विधी सुरू झाले.

गणेश पूजा व संकल्पनांतर शनिवारी प्रवर्ग्य हा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.सूर्योदयापासून हवन सुरू झाले.पुरोहितांचे एका सुरातील वेदमंत्रांचे घोष,प्रज्वलित झालेले अग्निकुंड आणि श्रद्धेने उपस्थित असलेले भक्त असे चित्र बालाजी मंदिर परिसरात दिसून येत आहे. दरम्यान शनिवारी यज्ञस्थळी भक्तांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच नागरिक यज्ञस्थळी जमा होऊ लागले. त्यात शाळकरी मुलांची संख्याही मोठी होती.विविध वयोगटातील नागरिक,शिक्षक व प्राध्यापकही यज्ञस्थळी दर्शनासाठी येत होते. कृषी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी अभ्यासासाठी यावेळी उपस्थित होते.

यज्ञस्थळी भक्तांना दर्शन घेता यावे तसेच यज्ञकुंडाला प्रदक्षिणा करता यावी यासाठी परिक्रमा मार्ग तयार करण्यात आला आहे. नागरिकांना सोमयागाची शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती देणारे फलक या परिक्रमा मार्गात लावण्यात आलेले आहे.यज्ञस्थळी एका मंडपात दृकश्राव्य माध्यमातून नागरिकांना सोमयागाची माहिती दिली जात आहे.७२ मिनिटांची एक क्लिप नागरिकांना पाहता येत आहे.यज्ञाबद्दल असणाऱ्या विविध शंकांचे निरसन या माध्यमातून होत आहे. शनिवारी सायंकाळी डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम संपन्न झाला.यात ५०० जणांनी सहभाग घेत सामुहिक अग्निहोत्र केले.अग्निहोत्राचे महत्त्व पटवून देताना त्यातून होणारे वैज्ञानिक फायदे यावेळी डॉ.राजीमवाले यांनी सांगितले.यज्ञस्थळी उपस्थित नागरिक आणि भक्तांनी यात सहभाग नोंदवला.




