23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*'वेध' परिषदेच्या कार्यक्रमास तरुणांचा भरभरून प्रतिसाद*

*’वेध’ परिषदेच्या कार्यक्रमास तरुणांचा भरभरून प्रतिसाद*

वेध ‘ कार्यक्रमात संविधान, मानवी मूल्यांचा झाला जागर

लातूर ; दि.३( वृत्तसेवा ) वेध परिषद आणि लातूर इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लातूरात आयोजित ‘वुई द पीपल ‘(आम्ही भारताचे लोक ) हे विचार सूत्र घेऊन आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधान आणि मानवी मूल्यांचा जागर करण्यात आला. अत्यंत प्रभावी व यशस्वी झालेल्या या कार्यक्रमास लातूरकर तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला .


वेध परिषदेच्या वतीने रविवारी दयानंद सभागृहामध्ये या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीच वेध परिषद असे आगळे वेगळे कार्यक्रम घेऊन जनतेचे प्रबोधन करीत असते ; त्यामुळे या वेधच्या कार्यक्रमांबद्दल रसिक श्रोत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. आज देखील ‘वुई द पीपल’ हे विचार सूत्र घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास लातूरकर तरुणाईने प्रचंड प्रतिसाद दिला. दयानंद सभागृह तरुण-तरुणींमुळे अक्षरशः हाउसफुल झाले होते.


‘ आपलं आयकार्ड ‘ या पुस्तकाच्या तरुण लेखिका राही श्रुती गणेश, येमूता फाउंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे ध्येय घेतलेला तरुण डॉक्टर प्रियदर्श , शिक्षणापासून वंचित उपेक्षित राहिलेल्या अनेक तरुण-तरुणींना एकलव्य फाउंडेशनद्वारे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे ध्येय प्राप्त करून देणारा तरुण राजू केंद्रे, समग्र भारतीयांचे जीवनमूल्य असलेलं संविधान अगदी सरळ सोप्या भाषेत समजावून सांगणारा ध्येयासक्त तरुण राजवैभव शोभा रामचंद्र आणि सिनेमा – चित्रपट या अत्यंत प्रभावी माध्यमाचा जबरदस्त वापर करून मुखबीर, कोण प्रवीण तांबे ? हुतात्मा, नागरिक असे आशयघन चित्रपट देणारा तरुण कलाकार जयप्रद देसाई अशा विविध क्षेत्रात नाव कमावून ध्येयासक्त असलेल्या या पाच अवलीयांना आपल्या प्रगल्भ शैलीतून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मुलाखतीद्वारे बोलत केलं .या पाचही तरुणांच्या मुलाखतीतून संविधान आणि मानवी मूल्यांचा जागर झाला. अत्यंत यशस्वी झालेल्या या कार्यक्रमास तरुणांनी वेळोवेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करून प्रतिसाद दिला.

  भारतीय संविधानावर डोळस श्रद्धा ठेवून त्यातील चिरंतर मूल्यांसाठी, त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आज देशभर असंख्य तरुण-तरुणी आपापल्या परीने झोपून देऊन काम करीत आहेत .

डोळ्यात सुंदर उद्याची स्वप्न घेऊन अनवट वाटेने ही तरुणाई खूप मूलभूत स्वरूपाचे काम उभे करीत आहे व्यवस्थेला प्रश्न विचारत, प्रसंगी संघर्षाला सामोरे जात रचनात्मक कामातून हस्तक्षेप करीत हे सर्वजण स्वातंत्र्य- समता- बंधुता या वैश्विक मूल्यांसाठी कार्यरत राहून आपल्यात खराखुरा आशावाद जागवत आहेत.
बदलांचे वाहक असलेल्या अशाच काही तरुण-तरुणांना भेटण्याचा योग वेध परिषदेने ‘वेध 2023 ‘ या कार्यक्रमांमध्ये लातूरकरांना घडवून आणला.

राही गणेश
प्रारंभी ‘आपलं आयकार्ड ‘ या पुस्तिकेच्या लेखिका राही श्रुती गणेश यांची मुलाखत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतली. या मुलाखती मधून राही गणेश या तरुण लेखिकेने ‘ आपलं आयकार्ड ‘ या पुस्तक लेखना मागचा प्रवास प्रकट केला .माहिती व तंत्रज्ञानाच्या या जगामध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र ,राज्यशास्त्र असे क्लिष्ट विषय घेऊन पदवी व पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या या तरुण लेखिकेने व विविध वृत्तपत्रामधून स्तंभ लेखन करणाऱ्या राही श्रुती गणेश यांनी समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करीत उपस्थित तरुणांना जागेवर खिळवून ठेवले. आपलं आयकार्ड या पुस्तिकेच्या आतापर्यंत तीन आवृत्ती निघाल्या असून आज चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ।आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते लातूरात करण्यात आले. भारतीय संविधानावर पुस्तक का लिहिले याबद्दलची विस्तृत माहिती देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये उलगडून सांगितली. राज्यघटना, भारतीय संविधान काय आहे ? हे आजही समाजाला समजावून सांगण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. मै कहा हु .. ?मै कौन हू..? अशी आजच्या समाजाची अवस्था झाली आहे .मी कोण आहे आणि मी मला कुठे जायचे आहे याचे उत्तर आपल्याला संविधानामध्ये आणि आपलं आयकार्ड या पुस्तकांमध्ये सापडते .संविधान हे आपलंकार्ड आहे असेही त्यांनी या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितले भरकटलेल्या समाजाला संविधान हे रस्ता दाखवते. शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आपलंसं वाटणार आयकार्ड आहे .आपल्या या पुस्तकास भरभरून प्रतिसाद मिळत आहे ,असे त्या म्हणाल्या.

      राजू केंद्रे

यानंतर ग्रामीण ,आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी एकलव्य ही शैक्षणिक चळवळ सुरू करणारे व एकलव्यच्या माध्यमातून आजवर हजारो युवकांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळवून देणारे एकलव्य फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांची मुलाखत देखील या कार्यक्रमांमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतली .दुसऱ्या सत्रामध्ये झालेल्या या मुलाखतीमध्ये राजू केंद्रे यांनी एकलव्य फाउंडेशन काढण्यामागचा प्रवास आपल्या मुलाखतीतून उलगडा. ग्रामीण आदिवासी भागातील मुला मुलांसाठी काढण्यात आलेल्या या संस्थेचे एकलव्य हे नाव कसे सुचले हे देखील त्यांनी या मुलाखतीत विस्ताराने सांगितले .फाउंडेशन काय काम करते हेही त्यांनी सांगितले. तरुणांना ज्ञाननिर्मितीसाठी सक्षम करणे यासाठी एकलव्यची स्थापना करण्यात आली. शिक्षणच माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकते ,शिक्षणामुळे चार-पाच पिढ्यांचा बॅकलॉग भरून निघू शकतो असे सांगत त्यांनी आदिवासी ग्रामीण भागातील तरुणांसाठी विद्यापीठ काढण्याचे स्वप्न असून आपले हे विद्यापीठ जगाला हेवा वाटेल असे असेल असे त्यांनी आपल्या मुलाखतीत आवर्जून सांगितले. भारत हा महासत्ता व्हायला पाहिजे असे आपण बोलतो परंतु आज अनेक आदिवासी भागातील नागरिकांना आधारकार्ड नाही. शेवटच्या तळागळातील माणसापर्यंत आपण जर पोहोचलो नाही तर मग कुठल्या महासत्तेच्या आपण गप्पा मारतोय ? असा सवालही केंद्रे यांनी यावेळी उपस्थित केला.


डॉ. प्रियदर्श यांच जीवनपट
कम्युनिटी हेल्थ व एज्युकेशन ऍक्टिव्हिस्टचे संचालक व युमेत्ताचे समन्वयक डॉ. प्रियदर्श यांची मुलाखत देखील डॉ.आनंद नाडकर्णी यांनी घेतली . आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात काम करून आपल्याला तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करता आले याचे समाधान वाटते असे ते म्हणाले. यापुढेही असेच काम करायचे आहे .सामाजिक भान असलेल्या युवकांना एकत्र आणून त्यांना मार्गदर्शन करून स्वबदलाची आणि समाज बदलाची व्यापक चळवळ महाराष्ट्राबाहेर सुरू करणे हे या फाउंडेशनचे ध्येय आहे ,असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मुलाखतीत स्पष्ट केले.


जयप्रद देसाई
दिग्दर्शक, निर्माता जयप्रद देसाई यांची मुलाखत देखील या कार्यक्रमांमध्ये गाजली .उत्तरार्धामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये जयप्रद देसाई यांनी सिनेमा कुतुलाचा विषय आहे , सिनेमाचा प्रवास कसा चालू झाला हे त्यांनी सांगितले .संगीतकार वसंत देसाई हे आपले आजोबा. परंतु आपल्या पिढीमध्ये त्यानंतर माझ्या व्यतिरिक्त आपल्या घरातील कोणीही या क्षेत्रामध्ये उतरलेला नाही. चांगल्या घरातली माणसं सिनेमात काम करीत नाहीत ,असा समज त्यावेळी होता कॉम्प्युटर इंजिनिअर पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपट क्षेत्रामध्ये उतरण्या मागचा रंजक प्रवास त्यांनी यावेळी मुलाखतीमध्ये उलगडून सांगितला. अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथे एक मोठा अपघात झाला .गाडीने आपल्याला उडवले होते परंतु सुदैवाने आपण त्यातून वाचलो .हीच एक मोठी गोष्ट होती. तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये व तीन महिने व्हील चेअरवर घालवल्यानंतर बदलून टाकणारा अनुभव आपल्याला अनुभवालाआला. आपण मृत्यू खूप जवळून पाहिला आहे. यातून आपल्याला खूपच काही शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले.


राजवैभव यांच्या मुलाखतीने सांगता
कार्यक्रमाचे राजवैभव शोभा रामचंद्र या तरुणाईने आपल्याअमोघ शैलीने व गायनाने तसेच अभंग पोवाडा सादर करुन संविधान अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये समजावून सांगताना राज वैभव या तरुणाने अनेक गमती जमती सांगितल्या .संविधान हे भारताचा प्राण आहे . स्वरचित अभंग काही पोवाडे म्हणत या तरुणाने संविधानाचा जागर केला. इलेक्ट्रिक इंजिनिअर पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर देखील आपण सामाजिक क्षेत्रात कसे वळलो याचा रंजक प्रवास देखील राजवैभव या तरुणाने उघडून सांगितला. या पाचही अवलीयांची डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपल्या प्रगल्भ शैलीतून मुलाखत घेत हा कार्यक्रम रंजक केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे धनंजय कुलकर्णी, राहुल लोंढे, प्रा. सतीश नरहरे ,डॉ.मिलिंद पोद्दार ,प्रा. सविता यादव, उत्तम होळीकर ,प्रदीप कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]