दासोपंतांच्या भक्ती पदांवर भरतनाट्यम्! वैष्णवी धर्माधिकारी (देशपांडे) यांचा ‘अरंगेत्रम्’ सोहळा पुण्यात गाजला
पुणे: भारतीय शास्त्रीय नृत्याच्या परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण, नृत्यांगणा सौ. वैष्णवी धर्माधिकारी (देशपांडे) यांचा ‘अरंगेत्रम्’ सोहळा दिनांक 27 सप्टेंबर रोजी पुण्याच्या सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिरात यशस्वीरित्या पार पडला. कवी संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी यांच्या मराठी भक्ती पदांवर आधारित हा कार्यक्रम कला आणि भक्ती यांचा अनुपम संगम साधणारा ठरला.
या सोहळ्याला दासोपंत स्वामींच्या सोळाव्या पिढीतील वंशज व आंबेजोगाई येथील श्री. चिंतामणीमहाराज गोस्वामी यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी, नृत्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. स्वातीताई दातार (नृत्यगुरु), शारदापुत्र डॉ. विनोद कमलाकर निकम (नृत्यगुरु व कीर्तनकार) आणि सौ. अनुराधा निकम (नृत्यगुरु) यांचा सन्मान करण्यात आला. या गुरुजनांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची उंची अधिक वाढली.

यावेळी बोलताना शारदापुत्र डॉ. श्री विनोद निकम यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “या ‘अरंगेत्रम्’च्या माध्यमातून संत दासोपंत स्वामींना अंबेजोगाईतून पुण्यात आणण्याचे मोठे आणि ऐतिहासिक कार्य झाले आहे.”दासोपंतांचे वांग्मय संपूर्ण विश्वामध्ये नृत्याच्या माध्यमातून नेले पाहिजे. असाच एक कार्यक्रम चेन्नईमध्ये व्हावा व तो दासोपंतांच्या कृपेने होईल असेही मत निकम यांनी व्यक्त केले. ठराविक काळ गुरुच्या कठोर व शिस्तीखाली मार्गदर्शन घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाने मंचावरील जाहीर असा पदन्यास हा गायन वादना क्षेत्रासाठी आदर्श वस्तुपाठच आहे. भारतीय संगीताचे पावित्र्य, महत्ता व सर्वव्यापी श्रेष्ठता टिकविण्याच्या या संस्काराचे अनुकरण व अनुसरण केल्यास कलेच्या दर्जात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल अशी खात्रीच या कार्यक्रमातून कलासाधक देत आहेत असे ते म्हणाले.

गुरु मयुरी जोशी यांनी सौ वैष्णवी चे तिच्या नृत्य साधने बद्दल कौतुक केले व ही नृत्य सेवा अधिकाधिक वर्धिष्णू व्हावी असे मत मांडलेवैष्णवी मुळची लातूर येथील रहिवासी असून तिने जर्मनीमध्ये एम एस करून जर्मनीमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून नृत्य साधनेचेही शिक्षण पूर्ण केले. सध्या सॉफ्टवेयर अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या वैष्णवी यांनी गुरू मयुरी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा टप्पा पूर्ण केला. या कार्यक्रमात वैष्णवीने भरतनाट्यमचे विविध क्लिष्ट प्रकार सादर केले. यात तोड्य मंगलम, शब्दं, वर्णम, कीर्तनं, पदम् आणि तिल्लाना या काव्य प्रकारांचा समावेश होता. आंबेजोगाई हे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. याच भूमीत आद्यकवी मुकुंदराज व योगेश्वरी देवीचे अधिष्ठान आहे. या मनोहर अंबा नगरीवर रचलेले शारदा पुत्र निकम यांचे पद नृत्यसह यावेळी सादर झाले.कार्यक्रमादरम्यान वैष्णवी धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय लहानपणापासून केलेल्या भरतनाट्यमच्या साधनेला दिले. या साधनेमध्ये आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच सासरकडील देशपांडे कुटुंबियांचे मिळालेले खंबीर पाठबळ अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे त्यांनी भावूकपणे नमूद केले.

या सोहळ्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. अपर्णा धर्माधिकारी यांनी केले. त्यांनी संत दासोपंत यांच्या सादर होणाऱ्या पदांची पार्श्वभूमी व विवेचनात्मक अर्थ प्रस्तुत केला. या कार्यक्रमास श्री. एन. एन. शिवप्रसाद (संगीतकार व गायक), श्री. पंचम उपाध्याय (मृदंग), श्री. मधु रामनकुट्टी (व्हायोलिन) आणि श्री. संजय शशिधरन (बासरी) या नामवंत कलाकारांची उत्कृष्ट संगीत साथसंगत लाभली.हा कार्यक्रम केवळ एक नृत्याविष्कार नव्हता, तर मराठी संत साहित्याला शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून वंदन करणारा एक संस्मरणीय सोहळा ठरला.




