विद्या आठल्ये उर्फ उषा
तिची माझी ओळख होऊन आता जवळजवळ ५०वर्षे होत आहेत. १९७२ला आम्ही औरंगाबादच्या आय.टी.आय.मध्ये भेटलो. तिथे आम्ही इंग्रजी स्टेनोग्राफारचा कोर्स करत होतो. आमच्या वर्गात चार मुली होत्या. मंगल गद्रे, रत्ना राव, उषा सप्तर्षी आणि मी! मध्यम उंचीची, गंभीर चेह-याची, अभ्यासू आणि कामसू उषा माझी जवळची मैत्रीण कशी झाली ते मलाही कळाले नाही.
परवा नुकताच माझा वाढदिवस झाला. त्यासाठी उषा खास औरंगाबादवरून आली होती. तिच्या काही घरगुती अडचणीमुळे तिला राहता येणार नव्हते. ती फक्त १तास थांबली. येताना तिने माझ्यासाठी निरंजन, तुपात भिजवलेली वात, कुंकवाचा करंडा, आणि काडेपेटीही आणली होती. आल्यांबरोबर मला म्हणाली, ‘आत चल, मला तुझे औक्षण करायचे आहे.’ मी काही उत्तर द्यायच्या आधीच पुन्हा तीच म्हणाली, ‘सगळी तयारी मी केली आहे. फक्त एक ताटली दे.’ मग तिने मोठ्या प्रेमाने माझे औक्षण केले. माझे डोळे भरून आले. आई गेल्यानंतर कधी वाढदिवसाला मला कुणी ओवाळले नव्हते. माझ्या हातात एक चांदीचे नाणे देऊन म्हणाली, ‘करोनामुळे काही खरेदी करता आली नाही ग.
बाहेर दिवाणखान्यात एक मोठा डबा माझी वाट बघत होता. त्यात अनेक प्रकारचे चिवडे, दोन तीन प्रकारचे लाडू, खास औरंगाबादच्या बसैये बंधूंचे फुटाणे, शेंगदाणे, लोणची, चटण्या, आणि हैद्राबाद्चे पापड होते. आणि बरेच काही बारीकसारीक जिन्नस होते. मी हसून म्हटले, ‘का ग, इतकेच का? अजून काही नाही? एखादा छोटा ट्रक करायचास की!’ त्यावर ती निरागसपणे म्हणाली, ‘अग हल्ली फार काम होत नाही ग मला.’
पटकन आठवण होऊन म्हणाली, ‘अप्पा हलवाईच्या तुझ्या आवडीच्या खव्याच्या पोळ्या पण करून आणल्यात बर का! आणि थांब, त्यावर घालण्यासाठी हे साजूक तूप’ असे म्हणून तिने माझ्या हातात पोळ्याचा भला थोरला डबा आणि तुपाची बरणी दिली! मी म्हटले, ‘उषा आता खरी चांदी झाली माझ्या वाढदिवसाची.’ काही लोकांना इतरांकडून काहीतरी मिळवण्यात आनंद वाटतो. उषा त्या विरळ लोकातील एक आहे जिला कुणालातरी काहीतरी दिल्याने आनंद होतो.
उषाची आणि माझी मैत्री तब्बल पाच दशकांची! एवढ्या प्रदीर्घ कालावधीत आमचे कधीच भांडण झाले नाही कि मतभेदही झाले नाहीत. तिच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात अनेक चढउतार आले. आम्ही एकमेकींशी बोललो, चर्चा केली त्यातुन मार्ग काढले. तिच्या अडचणीच्या वेळी मी क्वचित गेले असेल पण माझ्या छोट्यामोठ्या अडचणीत ती मात्र दत्त म्हणून हजर असते. माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ती तब्बल ८ दिवस रजा टाकून आली होती. मी इतक्या वेळी घरे बदलली पण प्रत्येक वेळी उषा सामान बांधायला आणि परत लावायला हजर असते. मोठ्या निगुतीने ती सर्व काम करते. मी जेंव्हा जेंव्हा ओरंगाबादला जाते त्यावेळी ती रेल्वे स्टेशनवर मला घ्यायला येते. ती वेळ रात्री १२ची असेल, पहाटेची ५ची असेल असेल किंवा दुपारी ४ची.. अशी काहीही असली तरी. एकदा मी रात्री साडे अकराला पोचणार होते. ट्रेन लेट झाली, मी तब्बल तीन वाजता मध्यरात्री पोचले तर ही स्टेशनवर उभी. मी तिला मोबाईलवर सांगितले होते ‘गाडी लेट होते आहे, तू घरी जा माझी मी येईन!’ तिला पाहून मला धक्काच बसला. मी म्हटले, ‘अग, इतक्या वेळ का उभी आहेस. घरी जायचास ना! मी आले असते. मला का हे गाव नवे आहे.’ त्यावर ती हसत म्हणाली, ‘अग, घरी जाऊन तुझ्या काळजीने झोप थोडीच लागणार होती.’ आजच्या जगात अशी काळजी अगदी जवळच्या नात्यांच्या बाबतीतही करण्याची प्रथा बंद होऊन दशके लोटली आहेत हे तिच्या गावीही नसते!
मी तिच्या घरी गेले की माझे माहेरसारखे लाड सुरु असतात. ती सारखी विचारणार आता काय खाणार? रात्री काय करू? जाताना काय नेशील?
एकदा मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबादला होती. त्यावेळी मी तिच्या घरी ६ दिवस राहिले होते. मी कधीतरी रात्री उशिरा परत यायची. दार उघडले की उषा विचारणार ‘जेवण झाले का?’ नाही म्हटले की लगेच हातात गरम दुधाचा ग्लास देणार. हो म्हटले की अन्न गरम करून वाढणार. मस्त धुतलेला गाऊन आणि परीटघडीची चादर माझी वाट बघत असायचे. सकाळी रोज नवा नास्ता मलाच नाहीतर मला घ्यायला येणाऱ्या सहकार्यांनासुद्धा मिळायचा. इतके लाड माझे आयुष्यात कुणीही केले नसतील. तिचे पती बांधकाम व्यावसायिक होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ आर्थिक चढउतार बघावे लागले. पण उषा टोकाची स्वाभिमानी. तिने कधीही कुणाला मदत मागितली नाही. एकदा हिच्याकडे विद्यापीठातील ऑफिसात जायलाही पैसे नव्हते. गाडीतले पेट्रोल संपलेले. मागितले असते तर कुणीही पैसे दिले असते. पण ही बाई उस्मानपुरा ते विद्यापीठ चालत गेली. हे अंतर किमान ८-१० किलोमीटर नक्की असेल!
ती मराठवाडा विद्यापीठात स्टेनोग्राफर होती. भरपूर काम असायचे. ८ तास टाईप रायटर बडवल्यावर ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या प्रबंधांची कामे करायची. उषाचे वाचन फार चौफेर आहे. मध्ये काही वर्षे मुलीसाठी तिला हैदराबादला जावे लागले. तर ही पठ्ठी दरमहा औरंगाबादला येऊन वेगवेगळ्या चार वाचनालयांची वर्गणी भरून पुस्तकांचा गठठा घेऊन हैदराबादला जायची. पुढच्या ट्रीपला सगळी पुस्तके वाचून संपलेली असायची.
कार्यालयीन बदल्यामुळे मी अनेक गावी राहिले. उषा माझ्या प्रत्येक घरात आली आहे. ती कधीही काही मागत नाही. मी मुंबई असताना तिची एकच मागणी असायची, ‘आपण समुद्रावर जाउ या’. मी राजभवनला राहात असताना तिथल्या निवांत किना-यावरील लाटाकडे बघताना उषा अगदी आनंदून जात असे.
मला मराठवाड्यात कुठेही कार्यक्रमाला जायचे असेल तर उषा आनंदाने माझ्याबरोबर येते. एकदा मला बीडला जायचे होते. मी म्हटले येशील का? ती म्हणाली, ‘कधी?’ म्हटले, ‘परवा जायचे आहे.’ ती म्हणाली ‘ये.’ मी ठाण्याहून तिच्या औरंगाबादच्या घरी पोहोचले. ती घ्यायला आलीच होती. घरात नुकत्याच गावावरून आणलेल्या बॅगा दिसत होत्या. म्हटले, ‘काय ग, बॅगा कुणाच्या?’ तर ही पठ्ठी म्हणते ‘अग माझ्या!’ मी प्रश्नार्थक चेहरा केला तेंव्हा हसून म्हणते ‘अग, मी रात्री पोहोचले ना इथे.’ ‘कुठून?’ माझा प्रश्न. ‘हैदराबादला मुलीकडे गेले होते.’ ‘मग का आलीस?’ ‘अग, तू येणार होतीस न?’ ‘पण ऐनवेळी आरक्षण मिळाले का?’ ‘नाही ग, मी जनरल डब्यात बसून आले.’ मी तिला हात जोडून म्हटले, ‘धन्य आहेस.’ त्यावर ती म्हणाली ‘अग खूप दिवसात जनरल डब्यात बसले नव्हते. खूप मजा आली.’ आता यावर काय बोलणार! माझा चिडका चेहरा बघून म्हणते, ‘रागावू नकोस, मला इतर कामासाठीही यायचेच होते. आणि हे बघ, तुझ्या आवडीच्या फेण्या आणल्या आहेत.’
माझ्यासाठी उषाकडे ‘नाही’ हा शब्दच नाही. ती नेहमीच शांत राहून सर्वांचे ऐकून घेते. खर म्हणजे तिच्या जवळच्या लोकांना तिचे महत्व कधी समजलेच नसावे. सर्वांनी तिला नेहमी गृहीतच धरले. अनेकदा तर नकळत मी सुद्धा!
जीवनात यशाची उंच शिखरे गाठणारे अनेक लोक असतात पण स्वताची व्यक्तिगत म्हत्वाकांशा विसरून भक्कम पहाडासारखे आधार देणारे कुणीतरी असावे लागते. माझ्या सर्व सुखदु:खात, काहीही न बोलता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, भक्कमपणे उभी राहणारी उषा हा माझामागचा मायेचा पहाड आहे.

*******
-श्रद्धा बेलसरे-खारकर
८८८८९५९०००












