मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असताना आता एकनाथ शिंदे समर्थक ५० आमदारांची शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शिंदे समर्थक ५० आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील विकासकामे आणि मंत्रीमंडळाचा विस्तार तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या सर्व मुद्दांवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच आमदारांच्या मतदार संघातील विकासकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान मंत्रीमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचा प्रश्न सर्व आमदारांना पडला आहे. याची उकल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करावी लागणार आहे. सत्तापालट होण्यापूर्वी शिंदे सर्व आमदारांना भेटत होते. मात्र मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे आमदारांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत शिंदे सर्व आमदारांना विश्वासात घेऊ शकतात.
शिंदे करणार आमदारांशी चर्चा
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबतही शिंदे आमदारांशी चर्चा करू शकतात. तसेच मतदार संघातील रखडलेली विकासकामे देखील उद्याच्या बैठकीत कळीचा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.




