भाग्यश्री बानायत शिर्डी संस्थानच्या नव्या सीईओ
मॅडमचं शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर मोर्शी येथील महाविद्यालयातुन त्या बीएस्सी झाल्या.आईतुळसाबाई,वडील भीमराव हे दोघेही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सी नंतर त्या बीएड झाल्या. पुढे एक वर्ष एमएससी केलं. त्याच दरम्यान वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनी साथ द्यायला हवी होती. पण तसं न करता प्रॉपर्टी वरून वडिलांच्या मृत्यूनंतर विसाव्या दिवशी मॅडमना आईसह कोर्टात हजर रहावं लागलं. त्यातून पुढील संघर्षाची त्यांना जाणीव झाली. आथिर्क दृष्टीने सक्षम व्हायचं त्यांनी ठरवलं.
अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ञ म्हणून काम मिळालं. आईचं आजार पण, तिची सेवा शुश्रुषा, घरकाम सांभाळून त्या गावाहून अमरावती ला जा – ये करत. त्याच्या जोडीला मुळे त्या स्पर्धा परीक्षा द्यायला लागल्या. अमरावती येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्था किंवा खाजगी कोचिंग क्लास नव्हते. त्यामुळे त्यांना सर्व भर स्व अध्ययन पद्धतीवर द्यावा लागला. वडिलांचं निधन, आईचं आजारपण, स्वतःच्या काही वैद्यकीय समस्यावर मात करत, त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळू लागलं.
प्रथम २००५ साली प्रकल्प अधिकारी, २००६ साली तहसीलदार, २००७ साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांच्या सलग निवडी होत गेल्या. पण या निवडींवर त्यांनी समाधान मानलं नाही. २००६ साली त्यांची नायब तहसीलदार व प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या दोन्ही वर्ग २ च्या पदांसाठी निवडी झाल्या. आईला सल्ला विचारला, तर मॅडमना अपेक्षा होती की, आई शिक्षक असल्याने शिक्षण विभागाची नोकरी स्वीकारण्याविषयी सांगेल. पण तसं न सांगता, आई म्हणाली,तुला योग्य वाटेल ते कर. मॅडमना आयएएसच व्हायचं होतं. म्हणून त्यांनी दोन्ही पदं नाकारली.दुसरीकडे सततच्या गैर हजेरीमुळे त्यांची अमरावती महानगरपालिकेची नोकरी गेली. तीन पदं हाती असताना नंतर एकही पद राहिलं नाही! परंतु त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्या देत राहिल्या. २०१० साली थोडक्यात अपयश आलं. पण अपयशामुळे खचून न जाता २०११ साली अधिक जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केला. त्यांची अभ्यासुवृत्ती, परिश्रम, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा फलद्रूप झाली. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. ही परीक्षा देत आहे, म्हणून त्यांनी कुणालाच कळू दिलं नव्हतं. ही सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणं. हे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं होतं. मुख्य परीक्षेसाठी त्यानी मराठी साहित्य आणि इतिहास हे विषय घेतले होते. निवडीसाठीची त्यांची मुलाखत सुध्दा खूप आव्हानामक झाली. त्यांनी वरवरची नाही तर, मोकळेपणाने, मनापासून सर्व उत्तरं दिली. त्या अमरावती जिल्ह्यातील असल्याने एक प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख समस्या काय आहे ? असा त्यांना विचारला गेला. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सर्वात मोठी समस्या आहे, असं सांगितलं. पुढचा प्रश्न विचारला गेला, आपण तिथे जिल्हाधिकारी झालात तर हा प्रश्न कसा सोडवाल ? मॅडमना असं सांगायचं होतं की शेत तळी बांधून, पाण्याची सोय करून हा प्रश्न सोडविता येईल. पण त्यांना शेत तळी या शब्दाला योग्य हिंदी किंवा इंग्रजी शब्द आठवेना. म्हणून त्यांनी दुभाषी मागितला. त्याप्रमाणे तो लगेच मिळालाही. पण त्यालाही नीट सांगता येईना.उलट परिस्थिती बिगडतच आहे, हे पाहून त्यानी सरळ कागद घेतला. उभं राहून मुलाखत मंडळाला शेत तळ्याचं चित्र काढून आपली शेत तळ्याची संकल्पना स्पष्ट केली.त्या निवड मंडळाच्या प्रमुख एक वरिष्ठ महिला अधिकारी होत्या. त्या खूप कडक असून खूप कमी गुण देतात, असा त्यांचा लौकिक होता. त्यामुळे आपली निवड होईल की नाही ? या विषयी मॅडम साशंक होत्या. पण त्यांची निवड झाली. इतकंच नव्हे तर,त्या वर्षी निवड झालेल्या त्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या.











