शिवराज पाटील चाकूरकर हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ
विविध क्षेत्रातील मान्यवरांची भावना
भावूक वातावरणात लातूरकरांनी केली श्रद्धांजली अर्पण
शिवराज पाटील चाकूरकर यांचे विचार प्रेरणादायी होते.
लातूर ( माध्यम वृत्तसेवा ):–भाषा ,प्रांत, राजकीय विचारधारा ओलांडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी केवळ मानवतेचा विचार केला आहे .त्यांचे विचार दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहेत . त्यांच्यातील गुणधर्माचा आचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे ,अशी श्रद्धांजली वाहत अनेकांनी चाकूरकरांच्या आठवणींना उजाळा दिला. देश एका मराठी पंतप्रधानाला मुकला आहे ,अशीही भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहुन लोकांच्या हिताची त्यांनी अनेक कामे केली. सदैव राष्ट्राच्या भल्याचाच विचार केला. धर्म, पक्ष यापलिकडे जाऊन मानवतेला प्राधान्य देत त्यांनी सर्वांना जोडून घेतले. म्हणून खऱ्या अर्थाने ते अजातशत्रु होते. एक कणखर नेते, विद्वत्ता आणि नैतिक मुल्यांचे प्रतिक म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लातूरकरांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे काका,माजी खासदार व माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, , लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, माजी खासदार सुनील गायकवाड, लातूर अर्बन बँकेचे संस्थापक प्रदीप राठी, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,व रमेश बियाणी,धनंजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार बी. व्ही. मोतीपवळे, अँड.व्यंकट बेद्रे, माजी कुलगुरू अशोक ढवण यांनी मनोगतातून शिवराज पाटील चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिला.शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील चाकूरकर, ऋषिका पाटील चाकूरकर, राजेश्वर बुके, माजी प्राचार्य नागोराव कुंभार, सुनील कोचेटा, उदय गवारे, अभय साळुंके, रमेश बियाणी, विक्रांत गोजमगुंडे , माजी नगराध्यक्ष विक्रम सिंह चौहान , शंकर गुटे, अविनाश कोळी, डॉ . जगन्नाथ पाटील , पत्रकार प्रा. रामेश्वर बद्दर , अरूण समुद्रे, गोपाळ कुळकर्णी , डॉ . ओमप्रकाश मोतीपवळे, सुशांत संगवे ,विजयकुमार स्वामी, यांच्यासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, विधी, कला-क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

‘वैष्णव जन तो’, ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनांनी सभेची सुरुवात झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शोकसंदेशांचे बी. व्ही. मोतीपवळे यांनी वाचन केले.प्रा. अश्विनी रोडे, प्रा. गणेश बेळंबे यांनी सूत्रसंचालन केले.विचारधारा वेगवेगळ्या तरी दृढ संबंध पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे : साठ वर्षांपूर्वी वैद्यकीय व्यवसायासाठी मी लातूरात आलो. त्यावेळी पहिल्याच वर्षी शिवराज पाटील यांचा परिचय झाला. आमच्यातील संबंध दृढ झाले. आमच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या होत्या. तरी एकमेकांतील संबंध दृढ होते, याचे अनेकांना आश्चर्य वाटत असे. भूकंपानंतर परदेशातून आलेला १ लाख डॉलर्स निधी त्यांच्यामुळेच विवेकानंद रुग्णालयाला मिळाला होता. राजकारणापेक्षा समाजकारण, राष्ट्रकारण मोठे असते, असे त्यांना वाटत असे. प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे व्यक्तित्व होते.——
…. तर चाकूरकर पंतप्रधान झाले असते जनार्दन वाघमारे :

प्रतिभाशाली आणि चिंतनशील व्यक्तीमत्व असलेले शिवराज पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. मात्र त्याची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. लातूरच्या पाण्याचा प्रश्न त्यांनीच सोडवला होता. अशी लातूरमधील कितीतरी कामे त्यांच्यामुळेच मार्गी लागलेली आहेत. आपल्या जीवनात त्यांनी गरुडासारखी उत्तुंग झेप घेतली. पण, स्वतःविषयी ते कधीही बोलत नसत. २००४ मध्ये ते निवडून आले असते तर नक्कीच पंतप्रधान झाले असते. लोकांशी एकरूप झालेले, राजकारणातील संत म्हणता येईल, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

विलासरावांना घडवण्यात शिवराज पाटलांचा वाटा
आमदार अमित देशमुख :
मी लहानपणापासूनच शिवराज पाटील चाकूरकर या नावाचा दबदबा पाहत आलो आहे. आजोबांकडून, वडिलांकडून, काकांकडून, आईंकडुन त्यांच्याबद्दल कामय ऐकत आलो आहे. पुढे मलाही त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभला. विलासराव देशमुख यांना घडवण्यात शिवराज पाटील यांचाच हात आहे. हा प्रसंग आम्ही कायम उराशी बाळगून आहोत. शिवराज पाटील यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना वेगवेगळी पदे मिळत गेली. यांच्या मागे पदे पळत राहिली. त्या प्रत्येक पदांना त्यांनी योग्य न्याय दिला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे ते अतिशय लाडके सहकारी होते. चाकुरकरांनी लातूरचा लौकिक भारतभर आणि भारताबाहेरही वाढवला. त्यांचे व्यक्तीमत्व ‘हिरो’सारखे होते.
मुल्य जगून दाखवणारे उत्तुंग नेतृत्व
आदिनाथ सांगवे

शिवराज पाटील चाकूरकर यांचे व्यक्तिमत्त्व खरोखर दीपस्तंभासारखे होते. त्यांनी सच्चेपणा, नैतिकता, विद्वत्ता, तत्वनिष्ठता ही मूल्य इतरांना सांगितली असे नाही. तर ती स्वत: जगून दाखवली. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असे होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला त्यांची मुल्य शिकता आली. त्यांची वैचारिक उंची आभाळाऐवढी होती. त्यांची संपूर्ण कारकीर्द निस्पर्ह व निष्कलंक राहिली आहे. त्यांच्या जाण्याने एक बहुआयामी व उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे.सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घातलाप्रदिप राठी : शिवराज पाटील यांच्या जाण्याने एक मोठे नेतृत्व लूप्त झाले. विलासराव देशमुख यांच्या मागे त्यांनीच मोठी ताकद उभी केली होती. त्यांना आमदार केले. मंत्री बनवले. शिवराज पाटील यांनी कधीही कोणाबद्दलही नकारात्मक दृष्टीकोन बाळगला नाही. ते अतिशय सुसंस्कृत नेते. त्यांनी सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घालून दिला. त्यांचे अनेक अनुयायी होतील. पण त्यांच्यासारखे कोणी होणार नाही.
लक्ष्मीरमण लाहोटी :

राजकारणात त्यांच्या इतकी उंची लातूरात अन्य कोणाला गाठता येईल, असे वाटत नाही. त्यांचे आचरण अनुकरणीय असेच होते. डॉ. शिवाजी काळगे : शिवराज पाटील हे अतिशय उत्तुंग नेते होते. दिल्लीत असताना त्यांची वारंवार आठवण होते.




