औरंगाबादः( विशेष प्रतिनिधी)– शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधून मोठे बळ मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे विधानसभेवर निवडून गेलेले सहा आमदार आहेत, त्यापैकी पाच आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत; त्याशिवाय मराठवाड्यातील अन्य तीन आमदारदेखील शिंदेच्या साथीला असल्याचे वृत्त आहे.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या विरोधात १९९१ मध्ये सर्वप्रथम बंड पुकारले होते. त्या वेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे वीस आमदार मात्र शेवटपर्यंत अठरा जण त्यांच्यासोबत राहिले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे कैलास पाटील आणि पैठणचे बबनराव वाघचौरे यांचा समावेश होता. भुजबळ यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सेनेविरुद्ध औरंगाबाद शहर आणि जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. त्यांनीच या शहराचे नाव संभाजीनगर असे केले. औरंगाबाद शहराने १९८८पासून काही अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेला सत्तेत ठेवले. विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद शहर व जिल्ह्याने शिवसेनेला भक्कम साथ दिली.

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असले, तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आठपैकी सहा मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. त्यात सिल्लोडचे अब्दुल सत्तार, पैठणचे संदीपान भुमरे, कन्नडचे उदयसिंह राजपूत, वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट यांचा समावेश आहे.
पाच आमदारांची चर्चा
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी पाच आमदार सहभागी झाल्याची चर्चा आहे. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांच्यासह मुंबईतच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र अन्य आमदार मंत्र्यासह आसाम मध्ये पोहचल्याचे पुढे आले आहे. ज्या औरंगाबादने शिवसेनेला बळ दिले, या बळाच्या जोरावर शिवसेना संपूर्ण मराठवाड्यात वाढली, त्याच औरंगाबाद जिल्ह्याने शिंदेच्या बंडाला बळ दिल्याचे बोलले जात आहे. उमरगा मतदारसंघातील ज्ञानराज चौगुले, नांदेड (उत्तर)चे आमदार बालाजी कल्याणकर, भुम-परंडाचे आमदार तानाजी सावंत हेदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.