*शिष्टमंडळाने घेतली राज्‍यपालांची भेट*

0
190

जिल्‍हा बँक निवडणुक संबंधीत अधिकाऱ्यांविरूध्‍द

फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची परवानगी द्यावी

मा. राज्‍यपाल यांच्‍याकडे लातूरच्‍या भाजपा शिष्‍टमंडळाची मागणी

लातूर दि.२९-  लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुक प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अत्‍यंत चुकीच्‍या पध्‍दतीने बेकायदेशीररित्‍या सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद केले असून विरोधकांना अपात्र ठरविण्‍यासाठी सत्‍ताधारी पक्षाच्‍या उमेदवारांशी संगनमत करून जिल्‍हा बँक आणि संबंधीत अधिकाऱ्यांनी बनावट नोंदी, खोटे कागदपत्र आणि प्रमाणपत्र तयार केली. हा अत्‍यंत गंभीर स्‍वरूपाचा गुन्‍हा केला असल्‍याने लोकशाही बळकट करण्‍यासाठी त्‍यांच्‍या विरूध्‍द फौजदारी खटला दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल महामहीम मा. भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍याकडे लातूर येथील भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने केली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक संदर्भात राज्याचे महामहीम माननीय राज्यपाल मा. भगतसिंह कोश्‍यारी यांची लातूरच्या भाजपा शिष्टमंडळाने दि. २९ ऑक्टो. २०२१ शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता राजभवनावर भेट घेतली. या वेळी लातूरचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, आ अभिमन्यु पवार, यांच्यासह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले उमेदवार धर्मपाल देवशेट्टे, बाबु खंदाडे त्‍याचबरोबर अमोल पाटील, विक्रम शिंदे यांच्‍यासह अनेकजण होते. यावेळी त्‍यांना आपल्‍या  मागण्‍यांचे निवेदन सादर करून निवडणुक प्रक्रियेतील अनेक महत्‍वाचे दस्‍तावेज त्‍यांच्‍याकडे सुपूर्द केली.

मा. राज्यपाल महोदयांशी सदरील शिष्‍टमंडळाची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक अनुषंगाने सविस्‍तर चर्चा झाली असून जिल्‍हा सहकार बोर्ड, मजूर फेडरेशन, जिल्‍हा उपनिबंधक, जिल्‍हा बँक आणि निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वजण संगनमत करून जिल्‍हा बँकेची निवडणुक प्रक्रिया पार पाडत आहेत. सत्‍ताधारी यांच्‍या दबावापोटी बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे, जिल्‍हा उपनिबंधक समृत जाधव, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक एच. ए. जाधव, जिल्‍हा सहकार मंडळाचे एस. एस. देशमुख यांनी आपल्‍या अधिकाराचा वापर करून चुकीचे निर्णय घेवून विरोधी उमेदवारांना अपात्र ठरविण्‍यासाठी बनावट नोंदी करून खोटी, बनावट कागदपत्रे, पमाणपत्रे तयार केली. निवडणुक निर्णय अधिकारी पदाचे कर्तव्‍य विसरून विरोधी सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले असल्‍याचे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.

निवडणुक कार्यक्रम हा सलग सुट्यात असून सुट्टी गृहीत धरून केलेला आहे. अर्ज दाखल करण्‍यासाठी आठ दिवसांपैकी केवळ प्रत्‍यक्षात चारच दिवस कार्यालयीन कामकाजाचे होते. छाननी नंतर उच्‍च न्‍यायालयात जाण्‍यासाठी वेळ मिळणार नाही याची काळजी घेवून निवडणूक कार्यक्रम तयार करण्‍यात आला. त्‍याचबरोबर विरोधकांना लागणारे कागदपत्र उपलब्‍ध होवू नयेत यासाठी सर्व संबंधीत कार्यालयातील बेबाकी प्रमाणपत्र देणारे अधिकारी गायब केले. मोबाईल बंद ठेवून कोणालाही बेबाकी द्यायची नाही असे गटसचिवांना आदेशीत केले. बँकेच्‍या शाखा इन्‍स्‍पेक्‍टर यांना बँकेत येवू नये असे आदेश दिले. सहकार बोर्डाचे आणि मजूर फेडरेशनचे अधिकारी तर कार्यालयात आलेच नाहीत सत्‍ताधारी गटाकडून दाखल केलेल्‍या उमेदवारी अर्जासोबत जोडलेले चुकीचे व बोगस कागदपत्र असल्‍याचे निदर्शनास आणून दिले तरी त्‍यांचे अर्ज वैध ठरविले शंभर टक्‍के वसुली म्‍हणून गौरवलेल्‍या  संस्‍था निवडणुकीत थकबाकीत दाखविल्‍या. सहकर बोर्ड आणि मजूर फेडरेशनची वर्गणी व इतर निधी असताना त्‍यास थकबाकी दाखवण्‍यात आली असेही निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.

महाम‍हीम राज्‍यपाल महोदय, संवैधानिक यंत्रणेच्‍या कामकाजात तुमचा सतत पाठींबा आणि प्रामाणिक मध्‍यस्‍थी लोकशाही व्‍यवस्‍थेतील घटनात्‍मक अधिकाराचे रक्षण करण्‍यासाठी आजपर्यंत सिध्‍द झाले आहे. त्‍यानुसार प्रामाणिकपणा, न्‍याय, सुशासन आणि सहकार चळवळ पुढे जाण्‍यासाठी, लोकशाही बळकट करण्‍यासाठी लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुक प्रक्रियेत भ्रष्‍ट, अनैतिक, फसव्‍या आणि अप्रामाणिक कार्यात गुंतलेले निवडणुक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे, जिल्‍हा उपनिबंधक समृत जाधव, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक एच. ए. जाधव आणि जिल्‍हा सहकार मंडळाचे एस. एस. देशमुख यांच्‍या विरूध्‍द फौजदारी खटला दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी अशी मागणीही यावेळी करण्‍यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here