कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा आज स्मृतीदिन…!!!
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाडगावकरांनी लिहिलेल्या कविता व भावगीते यांचे स्थान अढळ आहे. रुईया काॅलेज, मुंबई आकाशवाणी, अमेरिकन दूतावास अशी मुशाफिरी करताना पाडगावकरांनी साहित्य प्रतिभाही जपली, हे विशेष.
६०च्या दशकात त्यांनी वसंत बापट व विंदा करंदीकर यांच्या समवेत कविता वाचनाचे कार्यक्रम सुरू केले. हा उपक्रम कमालीचा लोकप्रिय झाला. कविता वाचनासाठी ही त्रयी खेडोपाडी प्रवास करत राहिली.
पाडगावकरांची अनेक गीते आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वतोमुखी झाली. ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी’, ‘उघड्या तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा’, ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’ या आणि अशा शेकडो भावगीतांनी महाराष्ट्राला वेड लावले.
पाडगावकरांनी ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’ अशी बालगीतेही रचली.
इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या पाडगावकरांना शेक्सपियरने भुरळ घातली होती. म्हणूनच त्यांनी ‘रोमियो ज्युलिएट’ , ‘ द टेम्पेस्ट’, ‘ज्युलियस सिझर ‘ ही नाटके भाषांतरीत केली.
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हा ऐहिकतावाद सांगणाऱ्या पाडगावकरांनी संत कबीराचे दोहे आणि मीरेची भजनेही मराठीत आणली. २००८मध्ये त्यांचे ‘बायबल – द न्यू टेस्टामेंट’चे मराठी भाषांतर प्रकाशित झाले. असा त्यांचा ऐहिकतेपासून अध्यात्मापर्यंतचा प्रवास होता.
असा चतुरस्त्र प्रतिभेचा ‘महाराष्ट्र भूषण’ आजच्याच दिवशी निघून गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात पोकळी निर्माण झाली.
साहित्य संगीत कला अकादमी च्या वतीने त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली… !




