*शुद्ध भोजन, ऑक्सिजन व शांत झोप हीच सुखाची खरी व्याख्या* – पद्मश्री चैत्राम पवार
लातूर, दि.२८ जून,(माध्यम वृत्तसेवा) :–पर्यावरणाचा शाश्वत विकास साधला तरच व्यक्तीला खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगता येईल. शुद्ध भोजन, ऑक्सिजन व शांत झोप हीच सुखाची खरी व्याख्या आहे, असे प्रतिपादन बारीपाडा, धुळे येथील पर्यावरण रक्षक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. २८ जून २०२५ रोजी लातूर येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने दयानंद सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यामध्ये दुपारच्या सत्रात कला, क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू , शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत, १२ वी NEET, JEE, सीबीएसई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पद्मश्री चैत्राम पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई केंद्रीय कार्यकारिणी, सदस्य प्रवीण सरदेशमुख तर विशेष अतिथी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जितेश चापसी, संजय गुरव, विष्णू सोनवणे, विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे, केशवराज शैक्षणिक संकुल स्थानिक समन्वय समिती, अध्यक्ष धनंजय तुंगीकर, कार्यवाह शैलेश कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर, केशव शिशुवाटिका शालेय समिती अध्यक्षा श्रीमती वर्षाताई डोईफोडे, श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे प्राचार्य महेश बांगर, केशव शिशु वाटिका प्रधानाचार्या . श्रीमती अवंती कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफीत दाखवून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पद्मश्री पवार पुढे म्हणाले की, वनवासी कल्याण आश्रमाच्या एकूण १४ आयामापैकी पर्यावरण हे एक आयाम आहे. त्यांनी गावातील लोकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी अनेक योजना राबवल्या, त्यातून गावातील आदिवासी लोकांना रोजगार मिळू लागला. जंगल,जल, जमीन, जन आणि पशुधन या पाच गोष्टी वाचवण्यासाठी त्यांनी कार्याची सुरुवात केली. वनधन विकास योजना, शेतीच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या योजना, मोहाच्या फुलांपासून तयार होणाऱ्या विविध गोष्टी यांची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले अभिमन्यू पवार म्हणाले की ,या शाळेच्या शिस्तीमुळे, संस्कारामुळे, विचारामुळे आपण घडलो. शाळेचा माजी विद्यार्थी असण्याचा सार्थ अभिमान वाटतो. शाळा जेव्हा केव्हा हाक मारेल, तेव्हा शाळेचे माजी विद्यार्थी मदतीला लगेच तयार असतील, असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रवीण सरदेशमुख यांनी संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. शिक्षकांनीच या संस्थेची स्थापना केली, तसेच समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी संस्था उभी करण्यात योगदान दिले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था नेहमीच सामाजिक भान ठेवून अनेक उपक्रम राबवते असे सांगितले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्था माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यानंतर कु. श्रावणी ईश्वरशेट्टे व चि. अथर्व चाफेकरंडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आणीबाणीच्या काळात कार्य करणाऱ्या संस्थेतील अप्पाराव कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, अशोक मठपती या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच कला, क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील नैपुण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी, शालांत प्रमाणपत्र परीक्षा, १२वी NEET, JEE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती तेजस्विनी सांजेकर व प्रदीप कटके यांनी केले. दहावी प्रमुख श्रीमती शैलजा कुलकर्णी व सहप्रमुख श्री संजय आढाव यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. याप्रसंगी श्री संतोष बीडकर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी विद्यार्थी, संघ पदाधिकारी, सर्व निमंत्रित पालक, विद्यार्थी, नातेवाईक, संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक बबन गायकवाड, श्रीमती राजश्री कुलकर्णी, श्रीमती इंदु ठाकूर, श्रीमती अंजली निर्मळे, राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे पालक जितेंद्र जोशी, कार्यक्रम प्रमुख त्र्यंबक कुलकर्णी, कार्यक्रमाच्या व्यवस्थेतील संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




