अतिवृष्टीमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत
दिलासा देणारा निर्णय; आ.कराड यांच्या कडून आभार व्यक्त
लातूर दि.३० – सततच्या पावसाने नुकसानीत आलेल्या राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना निकषात बसत नसतानाही विशेष बाब म्हणून राज्यातील महायुती सरकारने तब्बल ७५५ कोटी रुपयांची अभूतपूर्व मदत जाहीर केली. लातूर जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार शेतकर्यांना याचा लाभ होणार असून शेतकर्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी आभार व्यक्त केले.
राज्यात गेल्या आडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांवर अनेक संकटे आली मात्र केवळ वसुली करणार्या या सरकारने दमडीचीही मदत शेतकर्यांना केली नाही. असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या नव्या महायुतीच्या सरकारने आत्तापर्यंत अनेक धाडसी आणि दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात गोगलगायीच्या प्रादुर्भावामूळे नुकसानीत आलेल्या ९८.५८ कोटी रुपयाची शेतकर्यांना मदत केली त्याचबरोबर नियमीत कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपयाचे अनुदान वाटप करण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगून आ. कराड म्हणाले की, सततच्या पावसामूळे अतिवृष्टी होवून नुकसानीत आलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी निकषामध्ये बसत नसतानाही विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय शेतकर्यांना दिलासा देणारा असून याचा लाभ राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकर्यांना मिळणार आहे.
सततच्या पावसामूळे व अतिवृष्टीमूळे नुकसानीत आलेल्या शेतकर्यांना मदत देण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. त्यानूसार लातूर जिल्ह्यातील २ लाख १३ हजार २५१ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाच्या वतीने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामूळे लातूर जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार शेतकर्यांना लाभ होणार आहे. सततच्या पावसामूळे नुकसानीत आलेल्या शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती राज्य सरकारचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी आभार व्यक्त केले आहे.



 


