आमदार धिरज देशमुख यांचे आवाहन; धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा
—
लातूर : गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे मांजरा नदीवरील काही बराज तुडूंब भरले आहेत. पुढचे काही दिवस पाऊस असाच राहिला तर उर्वरित बराजही भरतील, अशी आशा आहे. पण, या पाण्याचा सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी येथे केले.
पावसाळ्याच्या गेल्या चार महिन्याच्या कालावधीत आपल्याकडे पुरेसा पाऊस झाला नाही. लातूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरण क्षेत्रातही पावसाने यंदा पाठ फिरवली आहे. त्यामुळे धरणात सध्या पुरेसा पाणी साठा नाही. परतीच्या पावसामुळे या आठवडाभरात धरणातील साठा ३० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. पण, धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरेल, ही आशा धूसर बनली आहे.

परतीचा पाऊस सध्या अंतिम टप्प्यात पोचला आहे. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार आता मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. पण, मांजरा नदीवरील उर्वरित बराज भरतील, असे संकेत मिळत आहेत. या पाण्याचा सर्वांना अतिशय काटकसरीने, नियोजनबद्ध वापर करावा लागणार आहे, याकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी लक्ष वेधले.
—
धरण भरावे -आ.देशमुख
मांजरा धरण हे १९८८ मध्ये पहिल्यांदा शंभर टक्के भरले होते. तेव्हापासून आजवर हे धरण १६ वेळेस पूर्ण क्षमतेने भरले आहे. सलग ३ वर्षे धरण १०० टक्के भरले होते. ही अत्यंत समाधानाची बाब होती. यंदाही हे धरण भरावे, अशीच माझी प्रार्थना आहे.
– श्री. धिरज देशमुख,
आमदार, लातूर ग्रामीण