36.9 C
Pune
Monday, April 28, 2025
Homeसाहित्य*शेती आणि शेतकऱ्यांचे वास्तव चिंतन..*

*शेती आणि शेतकऱ्यांचे वास्तव चिंतन..*

डॉ शेषराव मोहिते यांची ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.हे संमेलन उद्या आणि परवा दि.१०,११ डिसेंबर २०२२ या दोन दिवशी होत आहे. डॉ.मोहिते सरांच्या ललित लेखनावर प्रा. जयद्रथ जाधव यांनी लिहिलेला लेख.
आपल्या साठी…

शेती आणि शेतकऱ्यांचे वास्तव चिंतन..
डॉ.जयद्रथ जाधव
लातूर

ललित गद्य या लेखन प्रकारातून मराठी वाड्.मय अत्यंत समृद्ध आहे. यातही चरित्र,व्यक्तिचरित्र, प्रवास वर्णन, निबंध, अनुभव कथन, वैचारिक लेखन, वृत्तपत्रांतील सदर लेखन किंवा एखाद्या सामाजिक व्यवस्थेवरील लेखन ललित वाड्.मयात येते.ललित लेखन हे अनेक प्रकारांनी आणि विविधतेने केले जाणारे लेखन असून प्रत्येकाचे स्वरूप वेगळे असते.पाच- सहा दशकाचा इतिहास ललित गद्याला जरी असला तरी या वाड्.मयातून लेखन करताना लेखक आतून अगदी उमलून आलेला असतो.जे काव्यात किंवा इतर गद्य वाड्.मयातून सांगता आलेले नसते ते लेखक या प्रकारातून सहजपणे सांगत असतो. कथा, कादंबरी, कविता वाड्.मयप्रकारातून व्यक्त होण्यासाठी एक विशिष्ट रचना पध्दत आहे. ललित गद्याचा हा प्रकार मात्र कल्पनेपेक्षा ही विचार आणि आत्मचिंतनातून अधिक प्रगट होतो. लेखकाच्या लेखकत्त्वाचे आत्मसिद्ध समृद्ध रूप ललित लेखनात पहायला मिळते.कल्पनेपेक्षा तो वास्तवावर अधिक आधारलेला असून वास्तवाच्या सौंदर्यदृष्टीतून लिहिला जाणारा हा वाड्.मयप्रकार आत्मनिष्ठ आहे. ललित गद्य म्हणजे,’ जे कथेत मावत नाही आणि कवितेत सापडत नाही ते ललित लेखनातून सहजपणे मांडता येते ‘ असे याचे स्वरूप आहे.मराठीतील अत्यंत नावाजलेल्या लेखकांनी ललित गद्य लेखनातून आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.यामध्ये गो.वि.करंदीकर, इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे, दुर्गाबाई भागवत, इंदिरा संत,शांता शेळके,चि.त्र्यं खानोलकर,मधू मंगेश कर्णिक,प्रकाश नारायण संत या मराठी साहित्यातील महत्त्वाच्या लेखकांनी ललित वाड्.मयाला नवे नवे आयाम देत या वाड्.मयाचा विस्तार केला आणि दिशा दिली आहे.


१९६० नंतर ललित गद्य लेखनाचा अनेक अंगांनी विस्तार झाला.शिक्षणाचा प्रसार खेड्यापाड्यात झाल्यामुळे ग्रामीण अनुभव विश्व घेऊन स्वतंत्रपणे लेखन करणारी पिढी यात लिहू लागली.गाव,शेत- शिवार, निसर्ग, शाळा, शिक्षक,आई- वडील आणि ग्रामीण जीवनाचे भावविश्व यातून उमटू लागले.अवतीभवतीच्या परिसराविषयी असलेली आस्था आणि मनाच्या खोल तळापर्यंत घरं करून बसलेले बालपणीचे अनुभव वयाच्या पन्नाशी- साठीनंतर बालवयाकडे डोकावून पहाताना लेखक आपोआपच तो आपल्या आत डोकावतो.बालवयातील जडणघडण, संस्कार, मित्र-मैत्रिणी, विशिष्ट वातावरण, पाऊस पाणी, दारिद्रय आणि त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीमधून केलेली वाटचाल आणि आजची परिस्थिती ललित लेखनाला पोषक दिसते. ललित लेखनात ग्रामीण अनुभव विश्व घेऊन स्वतंत्रपणे लेखन करणारी पिढी आहे.श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मधुकर ‌केचे,जी.ए.कुलकर्णी,चंद्रकुमार नलगे,द.ता.भोसले, श्रीकांत देशमुख,दासू वैद्य, शेषराव मोहिते यांच्या ललित लेखनाचे स्वरूप हे ग्रामीण भावविश्वाशी निगडित आहे. या सर्वांमध्ये डॉ.शेषराव मोहिते यांचे ललित लेखन सर्वांपेक्षा वेगळे असून त्यांच्या विचार चिंतनाचा,लेखनाचा मुख्य गाभा हा शेती-शेतकरी हाच आहे.शेतक-यांच्या भावविश्वाशी ते घट्ट चिकटून ललित लेखन करतात.
डॉ.शेषराव मोहिते ग्रामीण कथा, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.’ असं जगणं तोलाचं'(१९९४) आणि ‘ ‘धूळपेरणी'(२००१) या दोन कादंबऱ्या, ‘ बरा हाय घरचा गोठा ‘ (१९८३) हा कथासंग्रह, ‘आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय’ ही गाजलेली कविता, ‘शेती व्यवसायातील अरिष्ट’ हा शेती प्रश्नावरील वैचारिक ग्रंथ, ‘ग्रामीण साहित्य: बदलते संदर्भ’ हा ग्रामीण साहित्याची वेगळी समीक्षा करणारा ग्रंथ आहे.या वेगवेगळ्या लेखनातून स्वतःच्या लेखनाचे वेगळेपण त्यांनी सिद्ध केले आहे. ग्रामीण कथा कादंबरी लेखनातील वेगळे पण सिध्द केल्यानंतर त्यांनी ‘ बोलिलो जे काही ‘(२०१०) आणि ‘ अधले मधले दिवस’ (२०२२) या दोन ललित गद्य ग्रंथाचे लेखन केले आहे. ‘बोलिलो जे काही ‘ हे ललित लेखन दै.लोकसत्ता च्या मराठवाडा वृत्तांतमध्ये ‘ संवाद’ या सदरासाठी त्यांनी लिहिलेले हे लेखन आहे. तर ‘ अधले मधले दिवस ‘ यामधील ललित लेखन हे दै. सकाळ व दै.अग्रोवन या वृत्तपत्रांतून केलेले लेखन आहे. वृत्तपत्रात सदर लेखन हजार बाराशे शब्दांतून लिहिणे म्हणजे लेखकांसाठी एक कसोटीच असते. कमी शब्दांतून विषयाची मांडणी करून त्यात आशय आणि अभिव्यक्तीचा समन्वय साधून सशक्त लेखन केले तरच ललित लेखनाचा वाचकांवर प्रभाव पडू शकतो.दुसरे असे की, वृत्तपत्रात हलकं फुलकं लेखन करण्यासाठी सूचना असते पण डॉ.शेषराव मोहिते यांनी या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळत शेती, शेतक-यांविषयीचे वास्तव अनुभव लेखन केले आहे. संपादकांनी या लेखनाला धक्का न लावता जसेच्या तसे छापले आहे.
डॉ.शेषराव मोहिते यांच्या साहित्याचा पोत ग्रामीण लेखकांमध्ये वेगळ्या जाणीवेचा आहे. ते काही काळ जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिणीचे १९८०-८१ मध्ये महाराष्ट्राचे संयोजक होते. यानंतर ते शेतकरी संघटनेत मूलभूतपणे सक्रिय झाले. शरद जोशी यांच्या समवेत शेतकरी संघटना स्थापन करण्यात डॉ.मोहिते यांचा सहभाग पहिल्या दहा मध्ये अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे.म्हणून अगदी वयाच्या अट्टाविसाव्या वर्षी ते शेतकरी संघटनेचे नेते, चळवळीचे व्याख्याते आणि धोरणकर्ते म्हणून कृषि विद्यापीठ परभणी येथे शिकत असताना ते पुढे आले. शेतकरी संघटनेचे दुसरे अधिवेशन परभणी येथे दि.१७,१८ फेब्रुवारी १९८४ मध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाचे ते संयोजक होते.या अधिवेशनाला बारा राज्यातून शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.ते शेतकरी चळवळीत सतत आघाडीवर राहत असल्याने त्यांना पाच वेळा अटक झाली होती.यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या वाट्याला आलेली,आणली गेलेली,येणारी परिस्थिती,ते जगतात ते जीवन,सरकारची धोरणं, मध्यमवर्गीय समाजाची शेतकऱ्यांविषयीची मानसिकता याचं भान त्यांना ग्रामीण लेखकांमध्ये खूप अधिकचे आहे.शेतक-यांच्या अवनतीची स्थिती’ ते निरपेक्ष पणे सांगतात. या दोन्हीही ललित लेखनाचे मध्यवर्ती सूत्र शेती आणि शेतकरी हेच आहे.ज्या चळवळीत त्यांनी उमेदिची पाच-दहा वर्षं खर्ची घातली तोच त्यांच्या लेखनाचा मुख्य धागा आहे.


‘बोलिलो जे काही’ आणि ‘अधले मधले दिवस’ हे दोन्हीही ललित लेखन वृत्तपत्रीय असूनही या लेखाचे स्वरूप मात्र वैचारिक आणि चिंतनशील आहे.हे लेख शेती व शेतकऱ्यांची काल,आज व उद्याची स्थिती समजून घेण्यासाठी आधार ठरणार आहेत. या लेखनाला शब्दांची मर्यादा आहे परंतु विचारांने व भूमिकेने मात्र ते ठाम आहेत. शेतीचे अर्थशास्त्र वास्तविकतेणे किती आतबट्ट्याचे आहे ते न जुमानता सांगत आहेत. शेती, शेतकरी प्रश्नांच्या धगीने तावून सुलाखून निघालेले अनुभव यात आहेत.’बोलिलो जे काही’ ललित लेखनाच्या मनोगतात या लेखनापाठीमागची भूमिका सांगितली आहे. ‘जे बोलणे आणि लिहिणे यांच्यामध्ये एक साम्य असावे’ अशा स्वरूपाचे लेखन लोकसत्तेच्या संवाद सदरासाठी अपेक्षित होते. तरूण वयात विद्यापीठात शिक्षण घेताना शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या हितासाठी एक भूमिका घेऊन वैचारिक मांडणी करून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात अनेक आंदोलने डॉ.मोहिते यांनी केली.एकाचवेळी भूमिका, संघटन, वैचारिक मांडणी, दिशा, आंदोलन, संघर्ष,अटक आणि फलनिष्पत्ती या विविध स्थितीवर काम करताना स्वतःला ही सावरावे लागत असते.या सर्व परिस्थितीत जे अनुभव आले,बोलणे तसे वागत राहिले याचे हे परखड बोल आहेत. शेतक-यांचे उदात्तीकरण करून शेती म्हणजे आनंदाचा मळा आणि शेतकरी म्हणजे शोषणकर्ता अशी पारंपरिक समज साहित्य, सिनेमांनी देशात निर्माण करून ठेवली आहे, तो समज दूर करून खरी शेतकऱ्यांची परिस्थिती परखडपणे कळवून देण्याचाही या ललित लेखनाचा मनोभाव आहे.याविषयी ते म्हणतात ,”आजवरचा अनुभव असा की, वाचणाऱ्यांना शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल काय आवडते ? तर शेतीतील हिरवेपणाचे कौतुक, शेतीचे उदात्तीकरण. ‘मेरे देश की धरती सोना उगले’ उगले हीरे मोती’ या प्रकारचे चित्रण करणारे’ बोलणे; पण या उलट शेतकरी आणि शेती यासंबंधीचं वास्तव कुणी मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लागते हे ठरलेले. शेतकऱ्यांची बाजू जो घेईल, त्याचे भले असे पाहण्यात नाही. झाले तर वाटोळेच होते. हा आजवरचा अनुभव. त्यामुळे लिहिणारी, बोलणारी शहाणी माणसं, सहसा या वाटेला जात नाहीत; पण दुसरीकडे हेही जाणवत होतं की, आज शेतीची परिस्थिती खूप बदललेली आहे. शेती विषयी आणि शेतकऱ्यांविषयी खोटं बोललेलं, लिहिलेलं लोक खपवून घेईनासे झाले आहेत. शेतकऱ्यांविषयी ही संवेदनशीलतेनं विचार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.” या मताचा उलगडा यातून होतो.
डॉ.शेषराव मोहिते हे नामांकित कथा कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा कादंबरी मधून मांडणी करताना ललित लेखनाइतकी स्पष्टता घेता येत नसते जे काही सांगायचे आहे ते नीटपणे सांगता आलेले नसते. ललित लेखनामधून सरळ विषयाला भिडता येते. डॉ.मोहिते यांनी ललित लेखन करताना कोणताही आडपडदा न ठेवता हे लेखन केले आहे.म्हणून या लेखनांविषयी ते म्हणतात,” माझ्या कविता, कथा, कादंब-यांमधून जे सांगायचे राहून गेले तेही काही यात आले.” त्यांच्या अनुभवाचे जे क्षेत्र आहे तोच धागा पकडून हे लेखन केले आहे.
लेखक हा समाजाचा एक जबाबदार घटक असतो.समाजात घडणा-या घटनांचा तो जसा साक्षीदार असतो तसाच तो भाष्यकार ही असतो.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तरी बरे झाले आहे असे काही दिसत नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर इतर साम्राज्यांकडून शेतकऱ्यांचे सतत दमनच झाले आहे. परंतु या देशाची संस्कृती, मंदिर-मूर्ती शिल्पकला,गड किल्ले अनेक राजेशाह्या भरभराटीला आल्या त्या शेतकऱ्यांच्या शेतसा-यांवरून. शेतकऱ्यांनी मेहनतीने उत्पादन केलेल्या शेतीमालातून देशाचे वैभव उभे राहिले.स्वातंत्र्याच्या नंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नसून हीच परिस्थिती पुढे सुरू राहिली.देशाच्या विकासात शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे.धरणं,रस्ते, उद्योग निर्माणांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी मुक्तपणे दिल्या पाहिजेत अशी भूमिका त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या मंत्रिमंडळांनी घेतलेली होती. दुसरे असे की पंचवार्षिक योजनांमधून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले नाही.शेतकरी हा दाता आहे.तो या जगाचा पोशिंदा आहे.तो स्वतःच स्वताचा मालक आहे.या मानसिकतेमुळे शेतकऱ्यांच्या किमान गरजांकडे, त्यांच्या जिवनाकडे कुणी पाहिले नाही.त्याच्या कष्टाची किंमत कोणी केली नाही.देशात शेती क्षेत्रात रासायनिकबियाणे, खते व नवनवीन तंत्रज्ञान आले त्याचा स्वीकार ही शेतकऱ्यांनी केला.यातून उत्पादन वाढ होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला,पण शेतीमालाच्या किंमतीबद्दल किंवा शेतकरी जो धान्य शेतीत पिकवितो त्याचे किमान मूल्य तरी त्याला मिळते का याचा विचार कोणीही केला नाही.यामुळे शेतीची अवस्था बिकट झाली.शेतीतील खर्च आणि उत्पादित शेतीमालाला मिळालेला बाजारभाव यात प्रचंड तफावत वाढत गेली.दुसरे असे सालोसाल शेतीत होणा-या तोट्याबद्दल कुठे बोलताही येत नाही. शेतीशिवाय दुसरा उत्पन्नाचा मार्ग नाही.यामुळे प्रचंड मोठी घुसमट शेतकऱ्यांची होऊन परिणामी शेतकरी आत्महत्या घडू लागल्या.राज्यकर्ते, नियोजनकर्ते, उद्योगपती, व्यापारी- भांडवलदार आणि बेभरवशाचा निसर्ग अशा संकटामुळे शेती आतबट्ट्यात आहे. म्हणून काही शेतकरी पालकांनी आपली मुलं जाणीवपूर्वक शेतीमधून बाहेर काढली.तर काही जाणकार शेतकऱ्यांच्या मुलांनी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा मार्ग स्वीकारला आणि आंदोलने केली. तर काही शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक शिक्षण,ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन या शेतीमातीच्या धद्यांतून जमेल तसे बाहेर पडणे पसंत केले.आधुनिक काळात आपणाला सर्व क्षेत्रातील प्रगती हवी आहे,पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मात्र देण्याची मानसिकता शासनाची नाही. यामुळे सातत्याने शेती व शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली.या स्थितीची पक्की जाणीव डॉ.शेषराव मोहिते यांना आहे. म्हणून ते सामाजिक घटनांचे विचारक भाष्यकार ठरतात.त्यांचे हे नुसते ललित लेखन नाही तर शेतकऱ्यांच्या परिस्थितींचा वास्तवानुभूतीतून मांडलेला लेखाजोखा आहे. ‘बोलिलो जे काही’ या लेखाचे स्वरूपच बोलणे आणि लिहिणे यातील साम्य आहे.
‘ बोलिलो जे काही ‘ या ललित लेख संग्रहातील एकावन्न लेख आहेत. स्वातंत्र्यानंतर शेती आणि शेतक-यांच्या दृष्टीने विपरीत परिस्थिती कशी निर्माण होत राहिली याचे वास्तव्य लेखन एक तृतीयांश लेखांमधून डॉ.मोहिते यांनी केलेले आहे.महात्मा जोतीराव फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची सांगितलेली खरी स्थिती आणि शेतकरी आत्महत्येचा दिलेला इशारा आपल्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर गांभीर्याने घेतला नाही. महात्मा जोतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड मधून मांडलेली परिस्थिती आजही बदललेली नाही.स्वातंत्र्यानंतर विकासाच्या नावाखाली आणि मध्यमवर्गीय समाजाची मानसिकता सांभाळून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्याला सतत सोसासला सांगितले गेले. यामुळे शेतकरी वर्गाच्या जीवनात नकारात्मक बदल झाले. ‘शेतकऱ्यांसहित शेतीची हल्ल्याची स्थिती’, ‘स्वप्न आणि वास्तव’, ‘उलटी पट्टी’, ‘या नैराश्याचे चिन्ह’, ‘गावाच्या अकाभोवती’ ‘आमचा 15 ऑगस्ट’, ‘राहिले दूर गाव माझे’, ‘कानठळ्या बसविणारी शांतता’, ‘वेगळी माणसं’, ‘हम को बरबादी का..’, ‘अवनतीचे पुरावे’ या लेखातून गेल्या पंच्याहत्तर वर्षातील शेतकऱ्यांच्या नेमक्या स्थितीविषयीचे लेखन आहे.’कृषिमूलंही जीवनम्’ आपल्या जगण्याचा मूलभूत पाया शेती आहे. हे खरे असले तरी तशी व्यवस्था निर्माण करण्यात आपण अपयशी झालेलो आहोत. देशाच्या आर्थिक विकासाचा दर सतत वाढत असताना शेतीची अवस्था बिकट होत आहे.देशाच्या आर्थिक विकासातून शेतीचे क्षेत्र वजा होत असून शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा ४८ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आला आहे.जगण्याचा योग्य पर्याय उपलब्ध झाल्यास ४० टक्के लोक शेतीमधून बाहेर पडायला तयार आहेत.हे ‘शेतकऱ्यांसहित शेतीची हल्लीची स्थिती’ या लेखात नमूद करतात. दुसरीकडे जागतिकीकरणानंतर समाजात कमालीचे बदल होत आहेत.माहिती तंत्रज्ञानाच्यामुळे देशाचा आर्थिक विकास दर वाढला आहे. मोबाईल,संगणक, इंटरनेट, गुगल, व्यवस्थापनशास्त्र आणि तंत्रशिक्षणाने प्रगतीचे आशादायी चित्र पहायला मिळते. पण शेतक-यांच्या किमान दैनंदिन गरजा भागतील अशी सोय शेतीत होत नाही. शेतीचे हल्लीचे चित्र ‘स्वप्न आणि वास्तव’ भासावे असेच आहे. शेती आज असा एकमेव व्यवसाय आहे की, तिथे उत्पन्न मिळते,पण मालाला भाव मिळत नाही. केलेल्या श्रमाचे मोलही मिळत नाही. सतत शेतकऱ्यांच्या नशिबात उलटी पट्टी येते.परंतु वातानुकूलित खोलीमध्ये बसून शेतीबद्दल मार्गदर्शनपर बुवाबाज करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून तो शेतकऱ्यांची फसवणूक करतो आहे.या मार्गदर्शन करणा-या बुवाबाजी लोकांनी शेतीचे आभासी चित्र निर्माण केलेले आहे.याविषयी डॉ.शेषराव मोहिते अनिल दामले यांच्या ‘रानवस्ती’ आत्मकथनातील अनुभव सांगतात.दामले यांनी आवड म्हणून दौंड तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर भिजेल अशी नऊ एकर शेती विकत घेतली.आधुनिक संसाधनांचा वापर करून सात- आठ वर्षे द्राक्ष बागायत केली.उत्तम लागवड, उत्तम संगोपन केले, आणि तेरा वर्षांनंतर शेती विकून टाकली. कारण काय तर शेती परवडत नाही.शेतीचा जो लागवड खर्च असतो तो निघत नाही. हे ‘ रानवस्ती ‘ या आत्मकथनातून दामलेंनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात, ” महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार खोटे बोलण्यात सर्वात आघाडीवर आहेत.ते केवळ एकमेकांची घोर फसवणूक करतात.’ व्यापारी, भांडवलदार, नोकरदार शेतीतला तोंटा सहन करीत नाहीत.तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे शेतकरी उलटी पट्टी आली तरि तो सहन करतो आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना शेतकरी आत्महत्याग्रस्त बायकांच्या भेटी घेतल्या.त्यातील सर्व बायकांनी सांगितले की, पॅकेज पेक्षा आम्हाला अंगणवाडी सेविका, बालवाडीची नोकरी द्यावी,पण शेती नको.यातूनच शेती व्यवसायातील भयानक परिस्थितीची जाणीव होते.हे मोहिते या ‘नैराश्याचे चिन्ह’या लेखातून सांगतात.


मराठी साहित्य व मराठी सिनेमा मधून शेतकऱ्यांचे आनंदी आनंद असे आभास चित्र रंगविले आहे. तर काही लोकांनी कम्युनिस्ट मानसिकतेतून शेतकरी शोषण कर्ता दाखविला आहे. पण कृष्णराव भालेकरांच्या बळीबा पाटील या कादंबरीतील संपूर्ण गावाला सांभाळणारा, गावाला जगविणारा आणि अडीअडचणी मध्ये गावाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा शेतकरी पाटील १९२० नंतरच्या मराठी साहित्यात दिसत नाही. हिंदीतील मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरी मधील शेतकऱ्यांचे वास्तव वर्णन जे येते ते मराठी कादंबरीकारांनी धाडसाने केलेले नाही.उलट मराठी कथा कादंबरीकार हे मध्यमवर्गीय वाचकांची मानसिकता सांभाळून साहित्य लिहिले.याचाही समाचार डॉ.मोहिते यांनी घेतला आहे.
टाळ मृदंग कल्लोळ’ या लेखामध्ये डॉ.मोहिते मा.यशवंतराव चव्हाणांचा कृषी विद्यापीठातील भाषणांचा दाखला देऊन सांगतात की, शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी विद्यापीठात शिक्षण घेऊन शेती करावी.ही अपेक्षा छान आहे,पण डॉक्टर, इंजिनिअर यांच्या कमाई एवढी शेतीत शेतकऱ्यांची कमाई असती तर शेती शिक्षण घेण्यासाठी व शेती करण्यासाठी समाजात चढाओढ झालेली असती.शेतीत राबणे नको यासाठी शिक्षण घ्यावयाचे आहे.या समाजातल्या वास्तवाची जाणीव ते करून देतात. जयप्रकाश नारायण यांच्या संघर्ष वाहिनीत काम करताना त्याकाळी महागाई विरोधात जे मोर्च काढले त्याची परिणीती हे आजच्या शेतकरी आत्महत्येत आहे,हे निरीक्षण ‘वाहिनी’ तले दिवस’ यातून नोंदविले आहे. शेतकऱ्यांच्या इतकीच उपेक्षा कृषी संशोधकांनाही भोगावी लागते.कृषी संशोधकांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले त्या कृषी संशोधकांचा यथोचित मानसन्मान व दखल या देशात घेतली गेली नाही, म्हणून पाच संशोधकांनी आत्महत्या केल्या.त्यांचा पदोपदी आत्मसन्मान डावलून त्यांची उपेक्षा केली होती.या देशात कृषी व्यवस्थाच सतत उपेक्षित राहिली आहे.हे ‘कृषि विद्यापीठाचा मौनराग’ या लेखात नमूद करतात.खेड्यातील समाज हा शिक्षण,वाचनापासून अलिप्त असतो.खेड्यात शिक्षणाचा प्रवेश दलित वस्तीतून झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने हा समाज शिक्षण,साहित्याशी जोडला गेला.पण खेड्यातील शेतीशी जोडलेला समाज मात्र यापासून दूर राहून आपलाच आत्मघात करतो.शिक्षणातून नोकरी, व्यवसायात स्थिर झाल्यावर शेतकऱ्यांची मुलं फारशी वाचनाशी,लेखनाशी जोडून घेत नसतात.कारण शेतकरी वर्गातील एखादा मुलगा नोकरीत जरी आला तरी त्याच्या मागची शेतीची दयदय संपलेली नसते.शेतक-यावर साहित्य लिहिले, त्याला पारितोषिक मिळाले पण शेतकरी वर्ग आहे तिथेच आहे.हे वास्तव ते यामध्ये सांगतात.’प्रिय बाई’ हा लेख मुलांच्या बद्दल कमालीची सहानुभूती निर्माण करतो.गुणवत्ता ही एकाच एक मापदंडाने मोजण्याची बाब नव्हे हे आत्मभान या लेखात आहे.शेतकरी संघटनेमधून शेतीचे अर्थशास्त्र जे समजते ते कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून समजत नाही.त्याप्रमाणे अभ्यासातील पारंगत असणे हे वेगवेगळ्या परिस्थितीमधून ठरवायला हवे याचा विचार देतात.’लातूर पॅटर्न’ हा पाठ परबतराव पाटलांची मुलांच्या बाबतीत जी अगतिकता आहे तीच या परिसरातील आणि देशातील पालकांची आहे.डोयानडोया शेणामुतात कुजल्या त्या शेतीमधून बाहेर काढण्याची जबाबदारी शाहू महाविद्यालयावर आहे ही जाणीव प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांना पाटील करून देतात.
महात्मा गांधी यांच्यावर महात्मा हा लेख महात्मा गांधींचे मोठेपण अचल आहे हे निस्पृहपणे सांगून जातो.नरहर कुरूंदकर, यशवंतराव चव्हाण आणि श्रीरंगराव मोरे हे व्यक्तिदर्शन पाठ त्यांचे अमौलिक मोठेपण अधोरेखित करणारे आहे.कुरूंदकरांचा बौद्धिक आधार तर श्रीरंगराव मोरे यांचा शेतकरी हिताची भूमिका यातून डॉ.मोहिते यांना आयुष्याची शिदोरी मिळते.’मी का लिहितो’ या लेखामधील आत्मभान डॉ.मोहिते यांच्या जीवनाची साहित्यिक वाटचाल सांगणारे आहे.एखाद्या पत्रकाराने इसम म्हणून केलेला किरकोळ उल्लेख जिव्हारी तर लागतोच,तसाच तो साहित्याच्या बीजभूमीसाठी प्रेरकही ठरतो.गाव,तालुका,बालपणीचे वर्गमित्र आणि त्यांच्याकडे शिक्षणाची क्षमता असूनही अर्धवट राहिलेले शिक्षण, समकालीन लेखक, संस्कारशील लेखक, चित्रपट आणि व्यक्ती यांच्या विषयी यामधील लेख ही जीवनाला सत्व पुरवणारी आहे.

प्रा. डॉ.जयद्रथ जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]