शेती करायची राहूनच गेली…! -रमेश देव

0
466

(काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत ‘राहून गेलेली गोष्ट’ हे सदर सुरू केलं होतं. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना बोलतं करून त्यांचं मी शब्दांकन केलं होतं. त्या सदरातच नुकतेच दिवंगत झालेले अभिनेते रमेश देव यांनी व्यक्त केलेली ही खंत…)
…………………………………………
तशा करायच्या अनेक गोष्टी राहून गेल्यात आयुष्यात… पण जीव खंतावतो तो एकाच गोष्टीसाठी, शेतीसाठी. माझी शेती करायची हौस तशीच राहून गेली. कोल्हापूरजवळच्या कळंबे गावी थोडी थोडकी नाही, तब्बल ५५ एकर शेती होती आमची. अजूनही आहे. पण तिथल्या काळ्या मातीत घाम गाळायचं राहूनच गेलं. कळंब्याच्या शेतीवाडीत आंब्याची शंभरेक, नारळाची तीसेक आणि सागाची अडीचशे झाडं होती. शेतात पाण्यानं तुडुंब भरलेल्या तीन विहिरी होत्या. त्यांच्या मुबलक पाण्यावर ऊस, जोंधळ्याचं पीक असं काही डोलायचं की, कुठल्याही बांधावर उभं राहिलं, तर संपूर्ण शेतजमीन म्हणजे निळ्या आकाशाखाली पाचूचा हिरवाकंच तुकडा भासायची. सुट्टीत कधी शेतावर गेलं, तर हे सारं वैभव बघता बघता मोह व्हायचा आणि हात तिथल्या काळ्या मातीत राबायला कधी लागायचे, तेच कळायचं नाही. शाळा-कॉलेज होईस्तोवर माझा सुट्टीतला आणि एरव्हीही बराचसा मुक्काम या शेतजमिनीत असायचा. तिथल्या जमिनीत राबताना दिवस अलगद सरून जायचा. खुरपणी, पेरणी, भांगलणी, नांगरणी सारं काही मी गावच्या शेतात केलंय. अगदी पाण्याची मोटही हाकलीय.

गावची माती मला खुणवायची…


… पण नशिबाने एके दिवशी पलटी खाल्ली. नाटक-सिनेमाच्या क्षेत्रात आलो नि आयुष्याला एकदम वेगळंच वळण मिळालं. चेहऱ्यावर रंग चढला आणि कल्पनेच्या दुनियेतच वावरत राहिलो. मात्र ही रंगीन दुनिया आपली नाही, याचा विसर मला कधीच पडला नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा निवांत असायचो, गावची माती मला खुणवायची. मग गावाकडचं ते घर, ती शेतजमीन डोळ्यासमोर फेर धरायची.
या शेतातल्या काही आठवणी मनात घर करून आहेत. आमच्या या शेतात एक दहा-बारा फूट लांब असलेली धामण होती. पिवळी धम्मक. शेतातून अशी सळसळत जायची की जणू आगीचा लोळ चाललाय, असंच वाटायचं. खरंतर धामण म्हणजे बिनविषारी साप. पण तरीही शेतात काम करणारे कामकरी तिला घाबरायचे. म्हणून मग एके दिवशी घरातच असलेल्या ट्वेल्व्ह बोअर बंदुकीतून तिच्यावर बार टाकला. पण काळजात काहीतरी खुपत होतंच. नेम चुकला. धामण पळून गेली. मग कामकरी आणखीच घाबरायला लागले. शेतातच येईनासे झाले. शेवटी साताऱ्याच्या एका मित्राच्या मदतीने बत्तीस शिराळ्याच्या एका व्यक्तीला बोलावलं. तो आला आणि एखाद्या सराईतासारखा धामण पकडून तिला घेऊन गेला. धामण गेली, तेव्हा उगाच चुकचुकल्यासारखं वाटलं. शेताची राखणदारच गेल्यासारखं वाटलं.

अशीच एक आठवण


दुसरीही अशीच आठवण आहे. तेव्हा आमच्याकडे खिल्लारी बैलांची एक जोडी होती. त्यांची नावंही ढवळ्या-पवळ्या अशीच होती. भलतीच सुंदर जोडी. पण एक दिवस मोट चालवताना अचानक मोटेचा दोर तुटला आणि सारा भार या बैलजोडीवर आला. त्यामुळे या जोडीतला एकजण खाली बांधात पडला आणि त्याचा पायच मोडला. डॉक्टर बोलावून आम्ही त्याच्यावर लगेच उपचार केले. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की उपचारांचा काहीही उपयोग होणार नाही, तेव्हा त्याला कसायाला देऊन टाका. अन्यथा त्याचे बसल्या जागी अतिशय हाल होतील. अर्थात त्याच्यावरील प्रेमामुळे त्याला कसायाला न देण्याचा निर्णय आम्ही तिथेच घेतला. मात्र त्याला मारून शेतजमिनीतच कुठेतरी पुरण्याचं नक्की केलं.
माझं या बैलावर खूपच प्रेम होतं. त्यामुळे मी सगळ्यांना म्हटलं,’मी गेल्यावरच त्याला मारा आणि त्याला कुठे पुरलंय ते मला सांगू नका.’ मी सांगितल्याप्रमाणेच करण्यात आलं. परंतु नंतर खूप महिन्यांनी गावी गेल्यावर नेहमीप्रमाणे शेतात गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. शेतात एक जांभळाचं झाड होतं. टपोरी जांभळं लागायची त्या झाडाला. मला खूप आवडायची. त्यावर्षी पहिलं जांभूळ तोंडात टाकलं आणि सोबतचा कामकरी म्हणाला, ‘आपल्या पवळ्याला हतंच पुरलाय जांभळीखाली.’ झालं पहिल्याच जांभळानं तोंड कडूजार झालं. तेव्हापासून जांभळं खायचं सोडून दिलं.

वय झालं आणि राहून गेलं..


आजोबा-वडील होते, तोपर्यंत ही पंचावन्न एकर शेती राबती होती. पुढे माझा एक भाऊ सैन्यात गेला, दुसरा पोलिसात गेला आणि मी अभिनेता झालो. हळूहळू शेतीतली कामकऱ्यांची वर्दळ थांबत गेली. मध्यंतरी आम्ही ती काहींना कसायलाही दिली. म्हणजे झालेल्या उत्पन्नापैकी त्यांनी अर्धं स्वत:ला ठेवायचं नि अर्धं आम्हाला द्यायचं, या बोलीवर. पण ते नीट जमेना. अर्ध्याच्या निम्मंही धड घरात येईना. मग शेत त्यांच्याकडून काढून घेतलं. दरम्यानच्या काळात काही वर्षांपूर्वी स्वत:च पुन्हा शेतात जाऊ या असं वाटायला लागलं. पण मुलांनी थोपवलं. साहजिकच वयही झालं होतं. शेतातली कामं कुठे झेपणार होती?
तरीही मनात रुखरुख होतीच. मातीला दुरावल्याची. मग एक दिवस काय केलं? आम्ही आता अंधेरीला पश्चिमेला जुहू-वर्सोवा लिंक रोडला राहतो, त्या इमारतीच्या समोरच आमची थोडी जमीन होती. त्या जमिनीवरच ट्रकच्या ट्र्क लाल माती आणून तिथे पसरून दिली आणि तिथेच वांगी, टोमॅटो, मिरच्यांची झाडं लावली. आता रोज सकाळी खाली उतरून या शहरी शेतीत माझी मशागत सुरू असते. कुठे खुरपणी कर, कुठे तण काढ, असं काही ना काही सुरू असतं. या जमिनीत झाडं लावण्याआधी घराच्या गच्चीतही मी फुलझाडं, फळझाडं लावली होती. गच्च्चीतल्याच मिरचीच्या एका झाडाला एवढ्या मिरच्या येतात की आम्हाला मिरच्या विकत आणाव्याच लागत नाही.

अन् शेती करायचे राहूनच गेलं…!


कदाचित कुणाला हा म्हातारपणीचा नस्ता उद्योग वाटेल. पण माझ्यासाठी मात्र वयाच्या ८७व्या वर्षीही तना-मनाला ऊर्जा देणारा तो एक सुरेख उद्योग आहे. प्रत्यक्ष शेती करण्याची इच्छा राहून गेली खरी! पण इमारतीसमोरच्या छोट्या जागेतल्या बागेत मातीत हात कालवल्यावर जरा बरं वाटतं. थेट गावाकडच्या मातीशी जोडलं गेल्यासारखं वाटतं. तेवढंच गावच्या मातीच्या ऋणातून अंशत: मुक्त झाल्याचं समाधान!

लेखन: मुकुंद कुळे, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here