आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी केली शेती नुकसानीची पाहणी
पंचनाम्याचे ढोंग नको सरसकट मदत द्या
निलंगा/प्रतिनिधीः- अतिवृष्टी आणि जलप्रकल्प भरल्याने नदीपात्रात सोडलेले पाणी यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या शेतीपिकाचे नुकसान झालेले असून बहुतांश पिके पाण्याखाली गेलेली आहेत. त्याचबरोबर अनेकांच्या जमीनीही वाहून गेल्या आहेत. या शेती नुकसानीची पाहणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली असून यावेळी आता सरकारने पंचनाम्याचे ढोंग न करता सरसकट शेतकर्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, आनंदवाडी, निटूर शिवारातील शेती नुकसानीची पाहणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव, रोहित पाटील, जर्नादन सोमवंशी, अशोक शिंदे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर चेवले, पंकज कुलकर्णी, आनंदवाडीचे सरपंच विष्णू साने यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी होते.

लातूर जिल्ह्यात गेल्या कांही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून पावसाने वार्षीक सरासरी ओलांडली आहे. विशेषतः जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झाली असल्याने जलप्रकल्पही तुंडुब भरलेले आहेत. जलप्रकल्प भरल्याने या प्रकल्पातील पाणी नदीद्वारे सोडण्यात आले आहे. अतिवृष्टी व नदीचे पाणी नदीकाठच्या शेतीसह अनेक शेतकर्यांच्या शेतात घुसलेले आहे. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असून काहीजणांच्या जमीनी पिकासह वाहून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर कांहीजणांचे पिके पाण्याखाली गेल्याने ती आता हातातून गेली आहेत. या पाण्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासन निकषानुसार 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान आणि 65 मिली मिटर पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास पंचनामे करण्याची गरज नाही. सध्या लातूर जिल्ह्यात 50 टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झालेले असून 95 मिली मिटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे आता सरकारने पंचनाम्याचे ढोंग न करता शेतकर्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केलेली आहे.

शेतकर्यांना देण्यात येणारी मदत लवकरात लवकर म्हणजेच दिवाळीपुर्वी मिळावी अशी आग्रही मागणी करत ही मदत रब्बी पेरणीच्या अगोदर मिळणे अपेक्षीत आहे. जेणेकरून शेतकर्यांचे खरीप पिकाचे नुकसान झालेले असून आता किमान रब्बीची पेरणी त्यांना करता यावी याकरीताच ही मदत तात्काळ शेतकर्यांच्या हातात पडावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी केली आहे. सरकारकडून मिळणार्या मदतीसह पिकविमा कंपनीनेसुद्धा ऑनलाईन अर्ज केलेले असो वा नसो शेतकर्यांना त्यांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम द्यावी अशी मागणी यावेळी केली. याअगोदरही सातत्याने सरकारकडे शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली असून आता सरकारने तात्काळ याबाबत घोषणा नाही केल्यास आम्हाला तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला.











