मातृभारती इन्फोटेक आयोजित कथास्पर्धेत स्पृहणीय यश!
पुणे :- ( प्रतिनिधी) –येथील साहित्यिक नागेश सू. शेवाळकर यांच्या ‘बायको माझी प्रेमाची’ या विनोदी कथेला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून मातृभारती इन्फोटेक साहित्य संस्था, अहमदाबाद (गुजरात) यांनी ‘समर स्टोरी कार्नीवलः मे 2022’ ही कथा स्पर्धा आयोजित केली होती. संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र शर्मा यांनी एका पत्रकाव्दारे विजेत्या लेखकांची नावे जाहीर केली असून अभिनंदन केले आहे.
या स्पृहणीय यशाबद्दल बोलताना नागेश शेवाळकर यांनी सांगितले की, ‘बायको माझी प्रेमाची’ हे कथानक विनोदी असून एक वेगळा विषय या कथेत व्यक्त झाला आहे. या कथेला राष्ट्रीय पातळीवरील बक्षीस जाहीर होणे आणि त्यातही मातृभारती सारख्या नामांकित संस्थेद्वारे होणारी निवड हा माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे. मातृभारती या संस्थेच्या वेबसाईटवर माझे कादंबरी, कथा, चरित्र, पत्र या विभागात २४४ भाग प्रकाशित झाले आहेत. मातृभारती संस्थेवर प्रकाशित माझ्या साहित्याला चार लाखांपेक्षा अधिक वाचकांनी डाउनलोड केले असून दहा लाखांपेक्षा अधिक वाचकांनी माझे साहित्य बघितले आहे. तसेच दोन हजारापेक्षा जास्त वाचकांनी माझ्या साहित्याला पंचतारांकित केले आहेत. मराठी लेखकासाठी हा फार मोठा बहुमान आहे. मी वाचकांचे आभार मानतो तसेच श्री महेंद्र शर्मा आणि मातृभारती इन्फोटेक संस्थेचा संपूर्ण चमू यांना धन्यवाद देतो. नागेश शेवाळकर यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




