🌷🌷 हासरा नाचरा
जरासा लाजरा….
सुंदर साजिरा
श्रावण आला….💃
आषाढधारांनी न्हाऊमाखू घातलेल्या आपल्या वसुंधरेला हिरव्या गर्द रंगाच, सुमनांच्या स्वर्गीय गंधान भारलेलं सोनसळी नितळ वस्त्र नेसवीत येतो,तो श्रावण !
हळद भरल्या पावलांनी उन्हात रंगणारा वाहत्या निर्झराचे भावबंध गुंतवणारा, किलबिलत्या पक्षांच्या पंखावर नक्षी रेखणारा, कोमल कळ्यांना फुलविणारा,मनात हिरवे लावण्य जपत प्रेमीजनांना भुलवणारा, मादक खट्याळ गीतगंध गाणारा, भावविभोर तुषाराना संमोहित करणारा, मनमोराचा पिसारा फुलवत आठवणींना उसवणारा असा हा श्रावण !
अशा या स्वर्गीय काळाला तोरण बांधायला प्रत्येक कवीने काव्यसुमने उधळली आहेत. प्रत्येकाची जात, छंद, लय निराळी पण त्या विलोभनीय काळाला पकडण्याची लय साऱ्यांचीच
माझ्या, तुमच्या मनांत सतत रूंजी घालणारी ही काही
श्रावण गीते……❣️
★ॠतु हिरवा ॠतु बरवा
झिरमिरतो मृदुशिरवा लहरत ये गंध नवा ।
तृण म्हणते आज मला सोनेरी साज हवा ।
भिजवी तन भिजवी मन देई नव संजीवन ।
युगविरही विकल जिवा ॠतु हिरवा ॠतु बरवा !!!
शांता शेळके !
★त्या पाऊसओल्या वेळी मिठीत घेता मजला
मी हळूच डोळ्यामधला पाऊस मोकळा केला !!
अनिल कांबळे !
★ काळ्या काळ्या मेघाआडून
चमकून गेली बिजली
जणूं मोकळ्या केसामधुनी
पाठ तुझी मज गोरी दिसली !
सुरेश भट !
★मनात माझ्या झरतो श्रावण
देहावरती स्वप्नथवा
आज नव्याने कळला मजला
स्पर्शामधला अर्थ नवा !
राम मोरे .
★रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे !
पी. सावळाराम.
★येरे घना,ये रे घना ,न्हाऊ घाल माझ्या मना !
आरती प्रभु .
★ श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहिकडे !
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे !
बालकवी .
प्रेमीजनांच्या मिलनाचा ,विरहाचा आणी विरहाला निमित्तमात्र झालेला हा श्रावण !
भावनांना साद-प्रतिसाद देणारा हा चिंबकाळ !!!
श्रावणाच्या हिरव्यागार, ओल्याचिंब शुभेच्छा 🌹😅❣️
(ही हिरवाई माझ्या बागेची ❤️)
जयंती देशमुख