उदगीर—दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ च्या गजरात उदगीर व देवणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हत्तीबेट यात्रेची सांगता उत्साहात पार पडली.
हत्तीबेट ‘ब’ वर्गीय पर्यटन स्थळाच्या गडावर दत्तजयंती निमित्त मोठी यात्रा भरली होती. सकाळी श्री. सद्गुरू गंगारामबुवा महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रा. व्यंकटराव पाटील चवणहिप्परगेकर यांच्या हस्ते सपत्नीक तर श्री स्वामी समर्थ मंदिरात नांदेड वाघाळा महापालिकेचे उपायुक्त भारत राठोड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी घुगरीची आरती व पूजा उद्योजक जयवंतराव पाटील यांच्या हस्ते तर गुलाल उधळण व व आरती जि. प. चे माजी सभापती गोविंदराव चिलकुरे यांच्या हस्ते करण्यात आली.

उदगीरच्या गणेश मंदिराचे पुजारी रघुनाथराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गुरूचरीत्र पारायणाची सांगता यावेळी करण्यात आली. दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर सुरू होता. यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी हत्तीबेट संस्थानच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.यात्रेत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, उपनिरीक्षक तानाजी चेरले, बनसोडे व त्यांचे सहकारी हे दिवसभर थांबून चोख बंदोबस्त ठेवला होता. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी व्ही. एस. कुलकर्णी, गंगा महाराज,श्रीराम चनावार, सीतारामदास त्यागी महाराज,रामपुरी महाराज,भानुदास महाराज, वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे, वनरक्षक सुभाष वटपल वार यांनी पुढाकार घेतला.