श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायागाची पूर्णाहुती
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता
दोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
आज सकाळी प.पू. विद्यानंदजी सागर बाबा यांचे काल्याचे कीर्तन
लातूर; दि. 20( वृत्तसेवा )- श्री श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर नगरीत आयोजित सात दिवसीय श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायागाची सांगता परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबा आणि भारतभरातून आलेल्या साधुसंतांच्या हस्ते यज्ञात आहुती टाकून करण्यात आली .यावेळी ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रांचा जयघोष केला .तसेच पूजनीय बाबांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचीही आज सांगता झाली .

लातूर नगरीतील श्री राजीव गांधी चौक पंचमुखी हनुमान परिसरात १५ एकर जागेत सात मजली यज्ञशाळा आणि विशाल कथामंडप उभारण्यात आला होता. या यज्ञशाळेत लातूर शहर व परिसरातील दररोज १०८ दांपत्यांनी होम -हवन करीत महायागात सहभाग नोंदवला .यज्ञ आचार्य वेदशास्त्रसंपन्न सुयश शिवपुरी (पैठण ) यांच्या पौरोहित्याखाली जवळपास १०८ ब्रह्मवृंदांनी यज्ञ कर्म केले .मंगळवारी परम पूजनीय विद्यानंदजी सागर बाबा आणि साधुसंत तसेच संयोजन समितीचे पदाधिकारी आणि १०८ यजमानांच्या पूर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली. यावेळी बाबांजी सह साधुसंत ,यजमानानी यज्ञशाळेस सात प्रदक्षिणा घातल्या. अत्यंत मांगल्यपूर्ण, शुद्ध ,सात्विक व पवित्र वातावरणात यज्ञाची पूर्णाहुती झाली. उपस्थित ब्रह्मवृंदांसह शेकडो भाविकांनी ‘यज्ञ नारायण भगवान की जय ‘,’सनातन हिंदू धर्म की जय ‘आदींचा जयघोष केला
या यज्ञकर्मात स्वामी राघवानंदजी गिरीजी (राजस्थान), स्वामी बालकानंदजी गिरीजी (आंध्र प्रदेश ),स्वामी ब्रह्मानंद गिरीजी, स्वामी राजेश्वरानंद गिरीजी (झाशी ),स्वामी सुरेशानंद गिरीजी (ऋषिकेश ),स्वामी गोविंदानंद गिरीजी ,स्वामी सुरेशानंद गिरीजी (ऋषिकेश ),स्वामी नंदगिरी ,स्वामी शिवानंद गिरीजी (हरिद्वार ),स्वामी नित्यानंदजी गिरीजी (शिर्डी ),स्वामी हरिनारायण गिरीजी( हिमाचल प्रदेश ),स्वामी गोरक्षानंद गिरीजी( मुंबई ),स्वामी पूर्णानंद गिरीजी( मध्य प्रदेश ),स्वामी कैवल्य गिरीजी (हरिद्वार), स्वामी शंकरानंद गिरीजी (काशी ),स्वामी सुरत गिरी (अकोला )साध्वी सोनाली गिरीजी (अकोला) , स्वामी नित्यानंद सरस्वती (हरिद्वार ) ,स्वामी गणेशानंद गिरीजी (संभाजीनगर ),स्वामी गणेश्वरानंद गिरीजी तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री, सचिव संजय बोरा, नाथसिंह देशमुख ,राजेश्वर बुके ,विशाल जाधव, सिद्धराम जाधव ,दगडे पाटील ,जगदीश तापडिया ,ब्रह्मानंद लोमटे उमेश गारठे ,मनीष आकनगिरे आदींनी सपत्निकआजच्या यज्ञकर्मात सहभाग नोंदवला.
कथेच्या समाप्तीच्या वेळी पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान समिती, आयोजन समिती ;तसेच भोजन समिती, यज्ञ समितीच्या वतीने पूजनीय बाबांचा वस्त्र पुष्पहार अर्पण करून उचित सन्मान करण्यात आला . तसेच काही संतांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला .संपादक रामेश्वर बद्दर, पंडितराव धुमाळ ,गणपतराव बाजुळगे यांनी भागवत ग्रंथाचे पूजन केले. संपादक संगम कोटलवार यांनी कथास्थळी येऊन बाबांचे सपत्नीक दर्शन घेतले.
कथेच्या सातव्या दिवशी पूजनीय बाबांनी आपल्या अमोघ वाणीने श्रीकृष्ण लीला ,रासलीला ,श्रीकृष्ण -सुदामा भेट आदींचे वर्णन करून कथेची रंगत वाढवली .यावेळी कथा मंडपात स्मशानशांतता दिसून आली. उपस्थित हजारो श्रोते शांतपणे बाबांची कथा एका जागी बसून श्रवण करीत असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले .आज शेवटच्या दिवशी कथा मंडपात जनसागर लोटला होता. परंतु कोठेही गडबड किंवा गोंधळ दिसून आला नाही. आतापर्यंत दोन लाख भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला आहे,असे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. आज माघी एकादशी होती; त्यामुळे या ठिकाणी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली होती. संतांच्या हस्ते आरती करण्यात आली .विशाल जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कथेची सांगता झाली. बाबांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे कथेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रगीत म्हटले जाऊनच भारतमातेचा ,सनातन वैदिक धर्माचा जयजयकार करण्यात येतो .आणि आठव्या दिवशी बाबांचे काल्याचे कीर्तन होत असते. त्यानुसार दि. २१फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ते १ या वेळात बाबांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
