येणाऱ्या सर्व निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा निर्माण करावा
संघर्षातून पुढे आलेले रमेशआप्पांचे नेतृत्व
भाजपा लातूर ग्रामीणच्या संकल्प मेळाव्यात खा. अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन
लातूर दि. १५ – लातूर ग्रामीण मतदार संघात धनशक्ती विरुद्ध सामान्य माणसाची शक्ती अशी लढाई झाली. या लढाईत जनतेनी साथ देवून रमेशआप्पांना निवडून देवून नवी क्रांती घडविली. संघर्षातून पुढे आलेले आप्पांचे नेतृत्व असून अशा नेतृत्वाला जनतेच्या प्रश्नाची, अडीअडचणीची जाण असते जनतेचे प्रेम आणि मेळाव्यास उपस्थित असलेली गर्दी पाहता हेच रमेशआप्पांचे बँक बॅलन्स आहे असे सांगून शत प्रतिशत भाजपा निर्माण करण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा, जनता आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री भाजपा नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा खा. अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी लातूर येथील विश्वपॅलेस मंगल कार्यालयात संपन्न झाला. या मेळाव्यास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार अमर राजूरकर, भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रदीप पाटील खंडापूरकर, विक्रमकाका शिंदे, रामचंद्र तिरुके, ऋषिकेश कराड, ओमप्रकाश गोडभरले, त्र्यंबकआबा गुट्टे, सतीश आंबेकर, बन्सी भिसे, अनिल भिसे, महेंद्र गोडभरले, प्रताप पाटील, शरद दरेकर, सुरज शिंदे, उद्धव काळे, वैभव सापसोड, दशरथ सरवदे, वसंत करमुडे, श्रीकृष्ण जाधव यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

मोदीजींनी जे बोलले ते करून दाखवले यामुळे त्यांचा देशात करिष्मा कायम आहे. देशाचे नेतृत्व मोदीच करू शकतात हे सिद्ध झाले असून असे नेतृत्व आजपर्यंत कधीही देशाला मिळाले नाही. राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकार चौफेर विकासाची प्रगती करत आहे. मोदीजींनी भारताच्या आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प केला, मराठवाड्याच्या पर्यायाने लातूर जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करूया असे सांगून यावेळी बोलताना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, विरोधकाकडे कुठलाही मुद्दा नसल्याने दिशाहीन झालेल्या लोकांकडून मत चोरीचा आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मत चोरी करण्याची गरज पडली असती तर अर्चनाताई पराभूत झाल्या असत्या का आणि २५० मतांनी नाना पटोले विजयी झाले असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून जनतेचा काँग्रेसवर विश्वास राहिला नाही जनता त्यांच्या सोबत राहायला तयार नाही. संपूर्ण मराठवाड्यात सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीसाठी परिश्रम, मेहनत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाची मजबूत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

दोन वेळा पराभूत झालो म्हणून खचलो नाही आणि घेतलेला वसा खाली टाकला नाही. जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली, अश्रू पुसण्याचे काम केले यामुळेच मतदार संघात दहशतीचे वातावरण असतानाही माय माऊलीनी मोठा आशीर्वाद दिला याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ विकत घेतला नसता तर देशमुखांची पाट तेंव्हाच लावली असती दहशतीच्या या मतदारसंघात बहाद्दर मतदारांनी मस्तवालाची मस्ती मतपेटीतून जिरवण्याचे काम केले आहे असे सांगून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भाजपा पक्ष असून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पक्षात केले जाते. येत्या दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. लातूर महानगरपालिका जिंकणे हे आपले ध्येय असून भाजपाला शंभर टक्के यश मिळालेच पाहिजे रेणापूरसह लातूर पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणण्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले.

भाजपा लातूर जिल्ह्याचं अध्यक्षपद हे माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. आज झालेला सत्कार हा अध्यक्षपदाचा व कार्यकत्यांचा सन्मान असून या सत्काराच्या माध्यमातून प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली याबद्दल रमेशअप्पा कराड यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. लातूर ग्रामीणमध्ये विजयी होवून रमेशअप्पा कराड यांनी वेगळा इतिहास स्थापन केला असल्याचे सांगून बसवराज पाटील म्हणाले की, लातूरकरांवर नांदेडचे पूर्वीपासून प्रेम आहे. लातूरची माणसे मोठी झाली ती केवळ नांदेडच्या आशीर्वादामुळे रमेशआप्पा तुमच्या माध्यमातून पुन्हा नांदेडकरांचा आशीर्वाद आपल्याला राहणार आहे. राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाची घोडदौड सुरू आहे सर्व घटकांना न्याय देण्याचे काम होत आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मेहनतीने काम करून शंभर टक्के विजय प्राप्त करूया असे बोलून दाखवले.

या कार्यक्रमात आ. अभिमन्यू पवार, पाशा पटेल, गोविंदअण्णा केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्रितपणे काम करून भाजपाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. प्रारंभी नवनाथ भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शेवटी भागवत सोट यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. या कार्यक्रमास लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्याचे दिवस असतानाही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास मतदार संघातील गावागावातून आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांसह मतदार बंधू भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. मंगल कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये जागा अपुरी पडत असल्याने तळमजल्यावरील सभागृहात उपस्थितसाठी अचानक पणे संयोजकांना स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. दोन्ही मजल्यात तेवढीच गर्दी आणि बाहेर तशीच गर्दी दिसून येत होती. भाजपाचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अशोकरावजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, रमेशआप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
एकूणच या कार्यक्रमात प्रचंड उत्साह आणि जल्लोष दिसणारा भाजपचे ध्वज ठिकठिकाणी लावण्यात आले होते तर भाजपाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे असंख्य भव्य कटाआउट कार्यक्रमाच्या परिसरात उभे करण्यात आले होते.





