28 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeठळक बातम्यासंपूर्ण उपचाराने क्षयरोग बरा होतो

संपूर्ण उपचाराने क्षयरोग बरा होतो

डॉ. शितल पाटील; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

लातूर, दि. 25 –

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार हवेतून होतो. क्षय रोगाच्या रुग्णांपासून इतरांना या रोगाचा संसर्ग होतो. अपूरा औषधोपचार अथवा उपचाराअभावी क्षय रोग्याचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र लवकर निदान होऊन क्षय रोगावर वेळेत उपचार घेतल्यास त्याला नियंत्रित करुन संपूर्ण उपचाराने क्षयरोग बरा करता येतो, असे मत छातीविकार तज्ज्ञ डॉ. शितल पाटील यांनी व्यक्त केले.

येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील क्षय आणि छाती विकार विभागाच्या वतीने गुरुवार, दि. 24 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. शितल पाटील बोलत होते. या वेळी प्रशासकीय व शैक्षणीक संचालिका डॉ. सरिता मंत्री, छाती विकार तज्ज्ञ डॉ. गणेश नरवाडे, डॉ. शशिकांत कौळाजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. जाधव, डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. शितल पाटील म्हणाले की, मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्यूलॉसिस या अतिसुक्ष्म्‍ जंतूमुळे क्षयरोग होतो. एकूण क्षयरोग्यांपैकी 85 ते 90 टक्के रुग्णांना फुफ्फुसाचा क्षयरोग होतो. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून शरीरातील जंतू हवेत पसरतात. हे जंतू श्वासाद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास फुफ्फुसाचा क्षयरोग होतो. दोन आठवड्यापेक्षा अधिकचा खोकला, छातीत दुखणे, दम लागणे, ताप येणे, भूक कमी लागणे, वजण कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे अशी लक्षणे फुफ्फुसाच्या क्षयरोगात दिसून येतात.

फुफ्फुसा व्यतिरिक्त पाठीचा मणका, हाड, मूत्रपिंड, यकृत, मेंदू, लसिका ग्रंथी, गर्भाशय या अवयवांनाही क्षयरोग होऊ शकतो. पाठदुखी, पोटात दुखणे, सांधेदुखी, लसिका ग्रंथीना सूज येणे, डोकेदुखी, बेशुध्द होणे, वंधत्व अशी संशयीत लक्षणे असलेल्या रुग्णांनी क्षयरोगाची तपासणी करुन घ्यावी. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर वैद्यकिय सल्ल्यानुसार संपूर्ण उपचार घ्यावेत.

क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध योजना राबविल्या जात असून सध्या केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत शासकीय व निवडक खाजगी रुग्णालयात क्षय रोगावरील सर्व उपचार मोफत दिले जातात. तसेच क्षयरोग प्रतिबंधासाठी संशयीत अथवा संक्रमीत व्यक्तींनी लवकर निदान व संपूर्ण उपचार घ्यावेत, जन्मता बालकांचे बी. सी. जी. लसीकरण करावे, खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा, क्षय रोग्याच्या सहवासितांची तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत. त्याचबरोबर एच.आय.व्ही. बाधित रुग्णांमध्ये क्षयरोगाची बाधा लवकर होऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीने क्षयरोग तपासणी साठी जागरुक राहावे, असे डॉ. पाटील म्हणाले.

यावेळी डॉ. सरिता मंत्री म्हणाल्या की, देशात दर दिवशी पाच हजार लोकांना क्षयरोगाची लागन होत असून दररोज जवळपास एक हजार व्यक्तींचा या आजाराने मृत्यू होत आहे. क्षयरोगामुळे लाखो मुले शिक्षणापासून दूरावत असून या रोगामुळे हजारो स्त्रिया कुटूंबापासून विस्थापीत होत आहेत. क्षयरोग्यापासून कुटूंबातील व समाजातिल निष्पाप लोकांना या रोगाची लागत होत आहे. लोकांतील अज्ञान यास कारणीभूत असून या रोगाला रोखण्यासाठी लोकांनी अधिक जागरुक राहून आजाराची लक्षणे दिसल्यास निदान करुन वेळेत उपचार घ्यावेत.      

या वेळी जागतिक क्षय रोग दिनानिमीत्त पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनात एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय व एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्षय रोगाविषयी माहिती असलेले पोस्टर्स सादर केले. या प्रदर्शनात प्रियंका जाधव प्रथम, भाग्यश्री सुर्यवंशी व्दितीय, आकांशा सोनकांबळे तृतीत, तर विलास कांदे व सिध्देश्वर हालकुडे यांनी उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रामाचे सूत्रसंचालन डॉ. राजशेखर कुदमुड यांनी केले तर आभार डॉ. ए. एस. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. गणेश नरवाडे, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. राजशेखर कुदमुड, तंत्रज्ञ सुभदा नाईक, लिपीक सुनिता कराड यांनी पुढाकार घेतला. यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय व एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयातील डॉक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]