डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून सर्वांना न्याय- अनंत ताकवले
*संविधान फाऊंडेशनची बार्टीत संविधान जनजागृती कार्यशाळा*
पुणे :- दिनांक 23 ऑक्टोबर प्रतिनिधी संविधानाने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव ही तत्त्वे या देशातल्या नागरिकांना बहाल केली.यातून सर्व समाज घटकाला समसमान न्याय मिळाला. संविधानिक मूल्ये समाजात रुजली पाहिजेत, चांगला नागरिक बनण्यासाठी संविधानाचा अभ्यास करा,व संविधानाची मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहान पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी केले.

संविधान फाउंडेशनच्यावतीने बार्टीमध्ये संविधान जनजागृतीच्या संदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी संविधान फाउंडेशनचे प्रमुख निवृत्त सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,निवृत्त सनदी अधिकारी श्याम देशपांडे, आयकर विभागाचे सहआयुक्त जीवन बच्छाव,उपायुक्त क्रांती खोब्रागडे यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना ताकवले म्हणाले,व्यक्तीचे सार्वभौमत्व असेल तरच राष्ट्रीय सार्वभौमत्व राहील. संविधानाने सामाहिक हिताला प्राधान्य दिले असून प्राणीमात्रांविषयी करुणा असावी, पर्यावरणाचे रक्षण करावे,हेही संविधानाला अभिप्रेत आहे.अजूनही संविधान सामान्य जनतेपर्यंत गेले नसून जनतेमध्ये संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शधम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांना ” सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध” हे पुस्तक व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले .
यावेळी मनोगत व्यक्त करताना इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, संविधानाच्या नीतिमूल्यनुसार देश चालला असता तर आज मोठी क्रांती झाली असती. आदर्श समाज निर्माण होण्यासाठी संविधानाची संकल्पना जनमानसात रुजली पाहिजे.विविध शासकीय संस्थांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी ,पुणे यांनी या कार्यशाळेस संबोधित करताना म्हटले की, जगातील सर्वात सुंदर संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिले. अजूनही संविधानाची अंमलबजावणी खालच्या स्तरापर्यंत झाली, नाही त्यामुळे देशात दारिद्र्य ,विषमता ,जातिभेद, बेकारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे . संविधानाची योग्य अंमलबजावणी झाल्यास बऱ्याच समस्या सुटतील. इ. झेड. खोब्रागडे सरांनी संविधानाची ओळख हा उपक्रम सुरू केला त्याची आज लोकचळवळ झाली. बार्टीच्या वतीने संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बार्टी समतादुतामार्फत ग्रामीण पातळीवर जनजागृती करेल.अशी ग्वाही त्यांनी दिली. बार्टी फेसबुक पेजवर दररोज संविधानाची ओळख जनतेला करून देण्यात येत आहे. अशीही त्यांनी सांगितले.

डॉ बबन जोगदंड , यांनी संविधान हे १४० कोटी जनतेसाठी असून संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुण्यात संविधान परिषद ,व संविधान साहित्य संमेलन घेणार असल्याचे सांगून जनतेने व अधिकारी वर्गाने संविधानाचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा व संविधान जनजागृती अभियानात सामील व्हावे, असे आवाहन केले.
बार्टीच्यावतीने संविधान जनजागृती अभियान स्लाईड शो चे सादरीकरण श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक ,बार्टी पुणे यांनी केले या कार्यशाळेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन सहारे,प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी यांनी केले तर आभार जीवन बच्छाव यांनी मानले .या कार्यशाळेत रेखाताई खोब्रागडे, डॉ. प्रकाश पवार, यशवंत मानखेडकर डॉ. आनंद जोगदंड डॉ.बी. आर. सोनवणे, डॉ.कुमार आहेर, डॉ.सुरेंद्र जोंधळे, अभिजीत गायकवाड,संजय आढाव,रामदास लोखंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.











