दयानंद महाविद्यालयामुळे आयुष्याला कलाटणी मिळणारा प्रवास मांडला पुस्तकातून
लातूर दि. ३१ आजकाल तरुणांनी सतत काहीतरी नित्य नूतन केलं पाहिजे परंतु याचे भान ही पिढी विसरत आहे. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासेत्तर साहित्यिक पुस्तकांचे वाचन करावे, उत्तम कथा व कवितांचे लेखन करावे, वादविवाद- वक्तृत्व स्पर्धेत हिरारीने भाग घ्यावा. तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असतो.परंतु ही युवा पिढी आज समाज माध्यमाच्या विळख्यात अडकलेली दिसून येते. परंतु सई शिंदे हिने मात्र इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अत्यंत कमी वयात एक सुंदर व प्रेरक पुस्तक लिहिले आहे.
दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विभागात इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात सई शिंदे हिच्या यू टर्न या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदिपान जगदाळे, सृष्टी जगताप, विनोदवीर बालाजी सुळ, सूरज साबळे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. अल्प वयात साहित्य निर्मिती केल्याबद्दल प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. या पुस्तकाला डॉ. संदीपान जगदाळे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

वास्तविक पाहता शिक्षण हे व्यक्तिमत्त्व घडवणारे धारधार शस्त्र आहे. शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि महाविद्यालयातील अध्यापकांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होतो. जीवनाला योग्य दिशा मिळते. किंबहुना त्यांच्या आयुष्याला ‘यू टर्न‘ मिळतो. कु. सई शिंदे हिचे ‘यु टर्न‘ हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक आदर्श पायवाटच आहे. खेड्यातून आलेली एक लाजरी-बुजरी, आत्मविश्वास हरवलेली, कोणतेही भव्य दिव्य स्वप्न डोळ्यात नसणारी सई शिंदे पुढे दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेते आणि दयानंदच्या परिस्पर्शाने तिच्या आयुष्याचे सोने होते. प्रचंड जिद्द, आत्मविश्वास, कठोर परिश्रम, सातत्य, सहनशीलता, विनम्रता आदी गुणांच्या बळावर सई सराईतपणे अस्खलित बोलायला शिकते. वहीच्या शेवटच्या पानावर कविता लिहिणारी सई पुढे विविध साहित्य संमेलनात कवितांचे सादरीकरण करते.
इयत्ता दहावी पेक्षा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत तब्बल ११.२३ % गुणांची वाढ करून ‘स्व गुणवाढ पारितोषिकाची‘ मानकरी ठरते.एवढेच नाही तर शालेय अभ्यास करत असताना कथा-कविता,कादंबऱ्या,प्रवास वर्णन,आत्मचरित्र आदी अभ्यासेत्तर साहित्यिक पुस्तकांचे ती वाचन करायला सुरुवात करते. या साऱ्याचाच परिपाक म्हणून पुढे ती स्नेहसंमेलनात ‘उत्कृष्ट वाचक‘ पुरस्काराची मानकरी ठरते. परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिता न येणाऱ्या पिढी आपल्याला वरचेवर दिसत असताना सई मात्र बारावी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर लागलीच ‘यु टर्न‘ नावाचे पुस्तक लिहिते. तिचा प्रगतीच्या दिशेने हा बदलत जाणारा प्रवास थक्क व्हायला लावणारा आहे. यशाकडे वाटचाल करणारी तिची पायवाट निश्चितच पुढील पिढीसाठी नेत्रदीपक व प्रकाशवाटा दाखवणारी आहे. शिक्षक आणि महाविद्यालयावर श्रद्धा व निष्ठा असेल तर शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो याची अनुभूती ‘यु टर्न‘ या पुस्तकाच्या माध्यमातून तिने मांडली आहे.
पुस्तक प्रकाशनाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे,ललितभाई शाह, रमेश राठी, सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकरयांनी सई शिंदे हिचे अभिनंदन केले आहे.




