32.3 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeमनोरंजन*सचिन जगताप यांच्या 'आरंभ' माहितीपटाला राज्य शासनाचा एक लाखाचा पुरस्कार*

*सचिन जगताप यांच्या ‘आरंभ’ माहितीपटाला राज्य शासनाचा एक लाखाचा पुरस्कार*


सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर – (प्रतिनिधी)-

मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांनी या राज्य शासनाच्या उमेद अभियानावर तयार केलेल्या महिलांची यशोगाथा असलेल्या ‘आरंभ’ या माहितीपटाला एक लाख रुपयांचे राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांच्या हस्ते हे पारितोषिक सचिन जगताप यांना प्रदान करण्यात आले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १०० हून अधिक लघुपट व माहितीपट शासनाकडे सादर करण्यात आले होते. यात सोलापूरने तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले.

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि १ लाख रुपयांचा धनादेश असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.
याप्रसंगी एकात्मिक महिला बाल विकास आयुक्त श्रीमती रुबल गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक राजाराम दिघे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपायुक्त (विकास) कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, गिरीश भालेराव, उमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, पोलीस अधिक्षक श्रीमती संगीता अल्फान्सो तसेच सोलापूर उमेद अभियानाचे राहुल जाधव आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी या गावातील महिलांच्या स्वयंसहायता समूहाने एकत्रित येऊन सुरू केलेल्या आठवडी बाजार आणि त्यातून मिळणारे उत्पन आणि आनंद यावर आधारित हे सर्व चित्रीकरण सचिन जगताप आणि त्यांच्या टीमने करुन आरंभ माहितीपटाची निर्मिती केली आहे.

प्रतिकुल परिस्थितीत हतबल न होता आपल्या गावासाठी काही करता येईल असा विचार बेलाटी गावातील महिलांनी केला. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या महिलांनी बचतगटाच्या अर्थात ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ता. उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने केलेल्या कार्याची यशोगाथा या ‘ आरंभ’ माहितीपटात दाखविण्यात आली आहे. यासाठी निर्मिती, संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन सचिन जगताप यांचे असून व्हिडीओ चित्रीकरण सोहेल इंगळगी तर लेखन श्रुती कुलकर्णी-पात्रुडकर आणि निवेदन आवाज रसिका भट-लिमये यांचा आहे.

यासाठी उमेद-तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, ता.उत्तर सोलापूर आणि उमेद अभियानातील समस्त बेलाटी ग्रामस्थ परिवार, ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर यांचे विशेष सहकार्य सचिन जगताप यांना मिळाले. सोलापूरच्या सचिन जगताप यांच्या माहितीपटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळाल्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल सचिन जगताप यांचे समाजातील सर्वस्तरांमधून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]