भावपूर्ण श्रद्धांजली
प्राचार्य सदाविजय आर्य सर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी आली आणि कानावर विश्वास बसलाच नाही.सरांना आम्ही नेहमीच क्रियाशील पाहिलेले आहे.तब्येतीबद्दल जागरूक असलेले अनुभवले आहे.आमच्या कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.माझे सासरे स्व.व्यंकटरेड्डी पुल्लागोर व आर्य सरांची चांगलीच मैत्री होती.त्यामुळे आर्य सर नेहमीच त्यांच्या पत्नीसह शहापूरला येत असत.' असली दही,दूध और छांछ खाना है तो शहापूर जाओ |असे आवर्जून म्हणणारे आर्यसर आता शहापूरला कधीच येणार नाहीत.हे सत्यही आता स्वीकारावेच लागेल.आमचे सासरे स्व व्यंकटरेड्डी यांचे अचानक निधन झाल्यावर आर्य सरांनी काही महत्वाच्या कार्यात आमच्या कुटुंबाची खूप मदत केली होती.'बेटा सुनिल,कैसे हो?' असे आवर्जून माझ्या पतीला विचारणारे तर मला 'अनिता ,तुम तो बहूत प्रतिभाशाली हो,आंतरभारती के लिए योगदान दो |' असे हक्काने म्हणणारे आर्य सर अंतिम श्वासापर्यत कार्यरत होते,हे विशेष.एक झंझावाती व संघर्षमय आयुष्य जगलेले आर्य सर यांनी देह ठेवतानाही कालचा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचाच दिवस निवडला.त्यांच्या कुटुंबाला अलौकिक शौर्याचा व बलिदानाचा ऐतिहासिक वारसा आहेच.'श्यामलाल स्मारक विद्यालय' हे उदगीर शहरातील शैक्षणिक लौकिक प्राप्त असलेले विद्यालय सरांनी सुरूवातीपासूनच उंचीवर नेत वेगळेपण प्राप्त करून दिले आहे.त्यांच्या पेन्शनचा निकाल सर्वोच्च न्यायालयातून काही दिवसापूर्वीच सरांच्या बाजूने लागला .कित्येक दिवसापासूनचा लढा 'सदा' विजयाने आताच थांबला होता आणि सरांनी इहलोकांची यात्रा या विजयानंतरच संपवली .त्यांच्या नावाला शोभेल आसे 'सदाविजयी' जीवन जगत अतिशय बुद्धिमान असणारे सर शेवटच्या क्षणी ही हातात लेखनी घेऊनच आंतिम श्वास घेत मृत्यूवर स्वार झाले.कार्यमग्नता जीवन व्हावे ,मृत्यू हीच विश्रांती ...त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,हीच प्रार्थना...ॐशांतीॐलेखन :अनिता येलमटे




