लेखन:सुहास किर्लोस्कर६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २ वर्षांच्या विश्रामानंतर सुरू झाला आणि पहिला दिवस संस्मरणीय केला शाश्वती मंडल यांच्या मारवा राग गायनाने. सायंकाळच्या वेळी सवाई गंधर्व महोत्सवाच्या मंडपामध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांनी मारवा रागामधील ‘पिया मोरे अनत देस गईलो’ ही बंदिश तिलवाडा तालामध्ये सादर करण्यास सुरुवात केली. ग्वाल्हेर गायकीनुसार शाश्वती यांनी बंदिश केंद्रस्थानी मानून, मध्य-विलंबित लयीमध्ये संपूर्ण रागविस्तार केला. शाश्वती यांनी स्वरलगाव ऐकवताना रागाचे सौंदर्य उलगडून दाखवले. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर केला जाणारा विहार श्रवणीय होता. शाश्वती यांच्या गायनामध्ये ठेहेराव होता त्यामुळे बेहलावा, मिंडकाम यामधून स्वरांचा आनंद श्रोत्यांना विलंबित लयीमध्ये घेता आला. राग सादर करताना शाश्वती यांनी मारव्याचे गांभीर्य कायम राखले. श्रोत्यांना आवडेल अशा द्रुत लयीमध्ये गायन करण्याचा अट्टाहास त्यांच्या गायनात नसल्यामुळे राग सौंदर्य दाखवण्याला महत्व आले आणि गायन दर्जेदार झाले.

आलाप-ताना, लयकारी आणि बेहलावायुक्त प्रवाही गायकीचे दर्शन घडवल्यानंतर शाश्वती यांनी ‘हो गुनियन मिल गाओ बजाओ’ ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. भरत कामत यांनी तबला साथ केली आणि डॉक्टर मौसम यांनी संवादिनीसाथ केली. टप्पा हा पंजाब-सिंध प्रांतामधून आलेला गायन प्रकार त्यामधील वेगळ्या तानांच्या पॅटर्नमुळे अनोखा आहे. ग्वाल्हेर आणि बनारस घराण्यात वेगवेगळ्या प्रकारे गायला जातो. शाश्वती मंडल यांनी ‘भला जटी जोर’ हा टप्पा ग्वाल्हेर पद्धतीने सादर केल्यानंतर द्रुत तीनतालात तराना गायला.

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महोत्सवास भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे गायक पं. उपेंद्र भट यांच्या मुलतानी राग गायनाने सुरुवात झाली. ‘सो बलमा मोरे तुमीसंग लागीलो चितवा’ ही मध्यलय तीनतालातील बंदिश सादर करताना उपेंद्र भट यांना फारुख लतीफ खान यांनी सुरेल सारंगी साथ केली. गायनास सुरुवात करताना उपेंद्र भट यांनी सरगम गायनावर भर दिला. सारंगी प्रमाणेच निरंजन लेले यांनी हार्मोनियमवर केलेल्या साथीमुळे सादरीकरणात एक भरीवपणा आला. अशाप्रकारे दोन वाद्ये साथीला घेतल्यामुळे गायकाला दमसास घेण्यास विश्रांतीच्या जागा मिळतात. ‘काहे मान करो सखी री अब’ ही मधूवंती रागामधील बंदिश उपेंद्र भट यांनी सचिन पावगी यांच्या तबला साथीने आणि मनोज भांडवलकर यांच्या पखवाज साथीने सादर केल्यानंतर उपेंद्र भट यांनी ‘श्याम ना अब तक आए’ ही मिश्र खमाज रागामधील ठुमरी गायली. ‘बिजलीचा टाळ नभाचा मृदंग’ हा अभंग उपेंद्र भट यांनी माऊली टाकळकर यांच्या टाळ साथीने सादर केला. २०२२ चा सौ. वत्सलाताई जोशी पुरस्कार उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला.

पंडित जसराज सवाई गंधर्व महोत्सवामध्ये दरवर्षी हजेरी लावायचे. त्यांची आठवण सवाई श्रोत्यांना येणे स्वाभाविक आहे. पं. जसराज यांचे शिष्य रतनमोहन शर्मा यांनी गोरख कल्याण राग गायन सादर करताना ‘प्रीत मोरी लागे रे तुम संग मोहन’ हा ख्याल विलंबित एकतालामध्ये गायला. अभिनय रवांदे यांची संवादिनी साथ, अजिंक्य जोशी तबला साथ, सुखद मुंडे पखवाज साथ आणि तीन शिष्य तानपुरा – गायन साथीला असा माहोल असल्यामुळे स्वरमंचावर गर्दी झाल्यासारखे वाटले. आता अनेक कलाकार साथ संगतीला घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. अनेक वाद्ये साथीला घेतल्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि गायनाला वेळ कमी मिळतो तसेच सलग गायनाअभावी राग संगीताचा अपेक्षित परिणाम होण्यात अडथळे येतात. द्रुत तीन तालातील रचनेनंतर तराना सादर झाला ज्यामध्ये तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी श्रोत्यांच्या टाळ्या मिळवणारी होती. हवेली संगीतामधील रचना सादर केल्यानंतर रतनमोहन शर्मा यांनी पंडित जसराज यांनी लोकप्रिय केलेले ‘ओम नमो वासुदेवाय’ भजन गायले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा शेवट सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने झाला. सरोद वादनाची सुरुवात अनुव्रत चटर्जी आणि अमित कवठेकर यांच्या तबला जुगलबंदीने झाली, हे विशेष. त्यानंतर उस्ताद अमजद अली खां यांनी शुद्ध कल्याण रागामध्ये मध्यलय तीनतालातील रचना सादर केली. आलाप-जोड-झाला, त्यानंतर तबला साथीने रचना सादर करणे असे वाद्य वादन मैफिलीचे स्वरूप उस्ताद अमजद अली खां बदलल्याचे जाणवले. तबला साथीने रचना सादर केल्यामुळे आणि काही आवर्तनानंतर लय वाढवल्यामुळे रागाची धून होऊन श्रोते त्यात रममाण होणे, असा प्रकार घडला नाही. पाच मिनिटानंतर भजनी ठेक्यामध्ये दुसरी रचना सादर केली. एका वाद्याच्या साथीला दोन तबला वादक घेण्याचा प्रघात नव्याने सुरू झाल्याचे जाणवले. शुद्ध कल्याण रागामध्ये आरोहामध्ये भूपाली रागाचे स्वर आणि अवरोहामध्ये यमन रागाचे स्वर, अशी रचना असते. पाच मिनिटानंतर उस्ताद अमजद अली खां यांनी निर्माण केलेल्या गणेश कल्याण रागामधील एक रचना सादर केली.

सर्वसाधारणपणे विलंबित रचना, मध्यलय आणि त्यानंतर द्रुत लय असे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-वादनाचे स्वरूप असते. त्यामध्ये उस्ताद अमजद अली खां यांनी बदल केला आणि तबला जुगलबंदीने सुरुवात करून द्रुत लयीमधील चार रचना एकामागोमाग एक अशा वाजवल्यानंतर राग दरबारी सादर केला. पाच मिनिटाच्या आलापीनंतर मध्यलय तीनतालामधील रचना सादर करताना उस्ताद अमजद अली खां म्हणाले, “एखाद्या रचनेमध्ये संपुर्ण दरबारी रागाचे स्वरूप सादर करता येते. त्यामुळे आलाप-जोड-झाला वादन करण्याची गरज नाही.” हिंदुस्थानी राग संगीतामध्ये होणाऱ्या बदलाची ही नांदीच म्हणावी लागेल. आता राग संगीताचे दोन प्रकार अस्तित्वात येत आहेत – राग संगीत आणि महोत्सवातील संगीत. वाढत्या लयीमधल्या सरोद वादनाबरोबर दोन तबला वादकांच्या जुगलबंदीने दरबारी राग वादनाची सांगता झाली. खमाज रागामधील एका रचनेमधून ‘एकला चलो रे’ ही रवींद्रनाथ टागोर यांची रचना सरोद वादनामध्ये सादर करून उस्ताद अमजद अली खां यांनी सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता केली.
सुहास किर्लोस्कर
9422514910




