लातूर/ प्रतिनिधी:
सामुहिक शेती हे माझे स्वप्न आहे. अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ते वरदान आहे.सामूहिक शेतीत रोहयोच्या माध्यमातून बांबू लागवड करणे शक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात अधिकचे चार पैसे पडतील, असे मत भाजपा नेत्या माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,लातूर अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या पतपुरवठ्यातून कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड अंतर्गत औसा तालुक्यातील लोदगा येथे उभारल्या जाणार्या जगातील पहिल्या स्वयंचलित बांबू फर्निचर उद्योगाच्या भूमिपूजन प्रसंगी पंकजाताई मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे तर व्यासपीठावर आ.अभिमन्यू पवार,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल मॅनेजर के.दुर्गा सुनिता,माजी आमदार पाशा पटेल,नितीन कोतवाल,कृषी खात्याचे अधिकारी क्षिरसागर,लोदग्याचे सरपंच पांडुरंग गोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सामूहिक शेतीचे स्वप्न मी बालपणापासून पाहिले आहे.ज्यांना अत्यंत कमी जमीन आहे,जे भूमिहीन आहेत ते इतरांच्या शेतात रोजगारासाठी जातात. सामूहिक शेती झाली तर त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते.

पंकजाताई म्हणाल्या की,शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळावे यासाठी पाशा पटेल यांनी आजपर्यंत लढा दिला आहे.आता ते बांबू या विषयात काम करत आहेत. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्वांनीच काम केले पाहिजे. शेतकऱ्याला शेती करण्याची लाज वाटू नये,त्याच्या मुलांनाही शेतीत काम करावे असे वाटावे.शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देताना वधूपित्याने विचार करू नये, असे काम होण्याची आवश्यकता आहे.यासाठी शेती आधारित उद्योग वाढले पाहिजेत असे त्या म्हणाल्या. बांबू लागवडीतून चांगला फायदा होऊ शकतो.शेकडो एकर गायरान जमिनी आजही उपलब्ध आहेत. सामूहिक शेती करत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या जमिनीवर बांबू लागवड करता येईल.त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल,असेही पंकजाताई म्हणाल्या. राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की,बांबू लागवडी संदर्भात पाशा पटेल यांनी देशभरात दीड हजारापेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे.राज्य शासनाने त्याकरिता ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले आहे.या अंतर्गत देखील बांबू लागवड करता येईल,असेही ते म्हणाले.
आ.अभिमन्यू पवार यांनी पाशा पटेल हे कृषी क्षेत्रातील क्रांतिकारक असल्याचे म्हटले.पाशा पटेल व बांबू हे समीकरण झाले असून कधीही न थांबणारा नेता अशी पाशा पटेल यांची ओळख असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक करताना पाशा पटेल यांनी बांबू लागवडीचे फायदे व उपलब्ध बाजारपेठेची माहिती दिली. पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग बांबूने उपलब्ध करून दिला आहे.नव्याने सुरू होणाऱ्या बांबू फर्निचर उद्योगासाठी पुढील दोन महिन्यात ११ सीएनसी मशीन बसविण्यात येणार असून या माध्यमातून फर्निचर उद्योग गतिमान होणार असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांनी स्व. गोपीनाथराव मुंडे,डॉ.एपीजे अब्दुल कलाम व भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण केली. पाशा पटेल,परवेज पटेल, अमर पटेल,किशोर साळुंके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून आलेले शेतकरी,भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मला रुपया तर पाशाभाईंना दिड रुपया…
आपल्या भाषणात पंकजाताईंनी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.स्व.मुंडे हे सूर्य तर आम्ही सारे त्याभोवती फिरणारे तारे होतो.सुर्याच्या प्रकाशात तारे दिसत नाहीत.पण जेंव्हा अंधार दाटतो तेंव्हा त्यांचं काम दिसू लागतं.मोठ्या नेत्यांच्या लेकरांचं असंच असतं.पण जबाबदारीही असते.पाशा पटेल हे स्व.मुंडेसाहेबांच्या अत्यंत जवळचे होते आणि हुशारही होते.ते साहेबांचा वारसा सांगू शकतील अशी स्थिती होती.साहेबांचेही त्यांच्यावर खुप प्रेम होते.माझ्यासाठी साहेबांनी एक रुपया दिला असेल तर पाशाभाईंसाठी दिड रुपया दिला एवढं हे नातं घट्ट होतं.साहेबांचा वारसा त्यांनी सांगावा.तसं कामही त्यांनी सुरू ठेवलेलं आहे,असंही पंकजाताई यावेळी बोलताना म्हणाल्या.