साहित्य अकादमी पुरस्कार

0
305

प्रिय सोनाली,

काल दुपारी तुझा अचानक खूप दिवसांनी फोन आला आणि सलमा या तामिळ लेखिकेच्या पुस्तकाच्या तू अनुवाद केलेले “मध्यरात्रीनंतरचे तास” साठी तुला साहित्य अकादमीचा अनुवादाचा मानाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगितलेस, तेंव्हा मला किती मनस्वी आनंद झाला, हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.

यापूर्वीच्या तुझ्या मी दोन अनुवादीत कलाकृती वाचल्या आहेत व हे पुरस्कार विजेते पुस्तक तर माझ्या संग्रहीच आहे.

अनुवाद करणं म्हणजे नवसर्जन असतं. मूळ भाषिक संस्कृती व वातावरण कायम ठेवत त्याचा अनुवादित भाषेतील वाचकांना( येथेमराठी वाचकांना) प्रत्यय आणून देणे व त्याच वेळी अनुवाद वाचताना वाचकांना त्याच्याशी रिलेट करता येणं व कांही तरी मौलिक वाचायला- अनुभवायला मिळणं, ही उत्तम अनुवादाची कसोटी असते. या कसोटीवर “मध्यरात्रीनंतरचे तास” हा तू केलेला सरस अनुवाद शंभर टक्के उतरतो. आता त्यावर साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन मान्यतेची मोहोर उमटवली आहे. सोनाली, तुझे किती अभिनंदन करावे हे मला कळत नाही. पण एवढे जरूर सांगेन- I am proud of you!

माझं जीवन समृद्ध करणारी अनेक माणसं माझ्या आजवरच्या जीवन-प्रवासात अली, पण तुझी बात और आहे. माझे कोल्हापूरचे वास्तव्य तुझ्यामुळे भावश्रीमंत झाले.

तू जेंव्हा केंव्हा भेटतेस- बोलतेस तेंव्हा आपण एका चैतन्याच्या झऱ्याजवळ बसलो आहोत व त्या चैतन्याचा आपल्याला पण स्पर्श होतो आहे, ती चैतन्याची ऊर्जा मिळते आहे,असंच मला नेहेमी वाटत आलं आहे. Believe me!

तुझ्या जीवनाबद्दल काय सांगावं,? नुकतंच राम जगताप यांनी तू म्हणजे एक अरभट कादंबरीचा विषय आहेस ,असं जे लिहिलं आहे, ते शंभर टक्के खरं आहे. मी तुझा जीवन संघर्ष जवळून पाहिला आहे. पण तुझी अभंग मनोवृत्ती किती चकित करणारी आहे. दुर्दैवाने अपघात होऊन आलेल्या शारीरिक अपंगत्वावर मात करीत आनंदाने आणि लेखन- संपादन करीत अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन सोनाली तू किती सहजतेने जगत आहेस !लेखन- वाचन- अनुवादासोबत संगीत, सिनेमा आणि घरी असून अफाट मित्रपरिवार जमवणे.. सारं कांही स्तिमित करणारं आहे. म्हणूनच मी म्हणतो की , तू एक सकारात्मक व्यक्तिमत्वाचे लोहचुंबक आहेस. तुझ्याकडे माझ्यासारखे लोक ती सकारात्मक ऊर्जा मिळवून स्वतःही चार्ज होण्यासाठी खेचले जातात. किती अफाट व व्यापक मित्रपरिवार आहे तुझा. त्या साऱ्यांना तुझ्याकडून कांहीतरी मौलिक मिळत असणार. मला तुझ्याकडून सकारात्मकता आणि मैत्र कसं जोडावे- राखावे हे फार मूल्यवान असं ज्ञान मिळालं आहे व मी तुझ्या मुळे थोडा अधिक समृद्ध झालो आहे. हे तुझे श्रेय आज जाहीरपणे तुला देत आहे!

तुझ्या “जॉयस्टिक” या बाल कथासंग्रहाच्या प्रकाशनाला आलो असता मी तुझ्यात एक सर्जनशील लेखिका दडली आहे ,तिचा शोध घे व कथा- कविता – कादंबरीकडे वळ ,असं म्हणालो होतो. त्याची आज आठवण करून देतोय.

पण असेही वाटतेय की, तू या टप्प्यावर आपलं आत्मचरित्र लिहावंसं. साहित्य अकादमी पुरस्काराने तू आता साहित्य क्षेत्रात प्रस्थापित झाली आहेस व कोल्हापुरला आल्यानंतर स्वतःच्या हिमतीवर समाजाकडून अकारण मिळणारी सहानुभूती नाकारत स्वावलंबी जीवन जगली आहेस. या कालखंडात तुला कांही कमी भोगावे- सोसावे लागले नाही. तुझा हा प्रवास खचितच सोपा नव्हता. पण उदय कुलकर्णीच्या रुपानं तुला “बाबा” – मार्गदर्शक मिळाला आणि पाहता पाहता इथवर तू येऊन पोचलीस. त्यामुळे मनापासून वाटते की तुझा हा प्रवास केवळ अपंगांसाठीच नाही तर शरीराने धडधाकट पण मनानं पंगू असणाऱ्यानाही प्रेरणादायी ठरेल, म्हणून हीच वेळ आहे तुझा आत्मचरित्ररुपी जीवन प्रवास शब्दबद्ध करण्याची. याचं साहित्यिक मोल तर आहेच, पण त्याहून अधिक सामाजिक मोल आहे. हे आत्मचरित्र एक महत्वाचा सामाजीक दस्तावेज ठरेल. पहा, विचार कर !

सोनाली, तुला खूप खूप शुभेच्छा! तुझा सृजन प्रवास पुढील काळात अधिक बहरो !

लक्ष्मीकांत देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here