पानगावच्या शाळांत मराठी विज्ञान परिषदेची शनिवारी विज्ञानवारी सुरु
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम
लातूर ; दि१५ -( वृत्तसेवा )-विज्ञान ही जीवनशैली झाली पाहिजे, त्यासाठी त्याचा प्रसार मातृभाषेतून झाला पाहिजे व ग्रामीण भागात तो प्राधान्याने झाला पाहिजे, या जाणिवेतून सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे मराठी विज्ञान परिषद (मुंबई) या नामांकित संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शनिवारी विज्ञानवारी’ या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचा आरंभ दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

या उपक्रमासाठी पानगाव येथील तिरुपती विद्यालय, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर; तसेच पाथरवाडी -भंडारवाडी शिवाजी विद्यालय या चार शाळांचा अंतर्भाव प्रतिष्ठानने केलेला आहे.
लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील अक्षता जाधव, सोनाली गरुड, साईनाथ कुलकर्णी, विश्वजीत गरड, योगेश वाघमारे, बुद्धभूषण कांबळे, श्रीनिवास माडे, यश कोकणे हे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असून या विद्यार्थ्यांचे जालना येथील विभागात मराठी विज्ञान परिषदेतर्फे विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानप्रयोगांची प्रात्यक्षिके करून हे प्रशिक्षित महाविद्यालयीन विद्यार्थी विज्ञानाच्या संकल्पना समजावून सांगतील.

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना समजणे सोपे व्हावे, यासाठी प्रयोगाद्वारे प्रत्यक्ष कृती आवश्यक असते. परंतु निमशहरी व गावातील आणि काही अंशी शहरातील शाळांमध्ये देखील पुरेशा प्रयोग शाळा व तत्सम सोयीअभावी विद्यार्थ्याना प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. अशी संधी विद्यार्थ्यांना मिळावी व त्यामधून त्यांना विज्ञानात रुची उत्पन्न व्हावी व एकूणच विज्ञान प्रसार व्हावा या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘शनिवारी विज्ञानवारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, समन्वयक प्रा. मनोहर कवाडे, दत्ता कुलकर्णी, वैजनाथ चामले, मुरलीधर डोणे यांनी दिली आहे.

या उपक्रमासाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, बाळासाहेब गोडबोले वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दीपक चाटे, प्रा. उज्ज्वला गायकवाड, प्रा. प्रतीक्षा मामडगे यांचे सहकार्य लाभते आहे. त्याशिवाय, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक सुरेश जाधव, प्राचार्य श्री. धर्मराज चेगे, सौ. महानंदा गिते, सौ. भगवती खंदाडे व प्रकल्प समन्वयक नेताजी चव्हाण, वैजनाथ चामले, संजय नागरगोजे, वैजनाथ खंदाडे हे परिश्रम घेत आहेत.
