27.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहाराष्ट्रसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूरकरांचेच राहणार लातूर वाचवा आंदोलनात आ. संभाजी पाटील निलंगेकरांचे...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूरकरांचेच राहणार लातूर वाचवा आंदोलनात आ. संभाजी पाटील निलंगेकरांचे वचन


लातूर ः- केंद्र सरकारच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन गोर-गरीबांसह लातूरकरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे. मात्र आता हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरण करण्याचा घाट राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घातलेला आहे. या माध्यमातून लातूरकरांचे हे हॉस्पिटल हिरावले जाणार असून याला विरोध करण्यासाठी आपण आगामी काळातही आंदोलन करू अशी ग्वाही देऊन हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूकरांचेच राहणार असे वचन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहे. त्याचबरोबर शहराला होणारा घाण पाणीपुरवठा तात्काळ थांबविला नाही तर यापेक्षा अधिक तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरन होऊ नये आणि शहरात होणारा घाण पाणीपुरवठा तात्काळ थांबवून शुद्ध पाणीपुरवठा व्हावा याकरीता लातूर शहर भाजपाच्या वतीने लातूर बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनप्रसंगी माजी मंत्री आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव, मनपा सभागृह नेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती माजी सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, सरचिटणीस प्रविण सावंत, अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, सौ. जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह गोर-गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व उपचार प्राप्त व्हावेत याकरीता लातूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगत आ. निलंगेकर म्हणाले की,  सदर हॉस्पिटल पुर्ण होऊन तीन वर्ष झाले तरी अद्यापर्यंत हे हॉस्पिटल महाविकास आघाडी सरकार व  पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सुरु झालेले नाही. आता तर हे हॉस्पिटल खाजगीकरण करण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातला असल्याने गोर-गरीबांच्या हक्काचे हॉस्पिटल हिरावून नेण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. केंद्र सरकारने उभा केलेले हे हॉस्पिटल खाजगीकरण होऊ नये याकरीता हे आंदोलन प्राथमिक स्वरुपाचे असून आगामी काळात याची प्रक्रिया रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे  सांगत सदर हॉस्पिटल लातूरकरांचेच राहिल असे वचन आ. निलंगेकरांनी यावेळी दिले.उजनीचे पाणी देणार असे आश्वासन देणारे पालकमंत्री लातूरकरांना दहा ते बारा दिवसाआड पाणी देत असल्याचे सांगून आ. निलंगेकर यांनी पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढला. स्वतःच्या कारखान्यांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देणारे पालकमंत्री मात्र लातूकरांना आता घाण पाणीपुरवठा करू लागलेले आहेत. या पाणीपुरवठ्याबाबत अनेकवेळा लातूकरांनी तक्रारी केलेल्या असून अद्यापर्यंत यात बदल घडलेला नाही. या घाण पाण्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आलेले असून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम पालकमंत्री व मनपाकडून होत असल्याचा आरोप आ. निलंगेकरांनी यावेळी केला. भाजपच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक दिवसही घाण पाणीपुरवठा केला नसल्याची आठवण करून देत आ. निलंगेकरांनी याच काळात अमृत योजनेसह विविध विकास कामांकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असल्याचे आ. निलंगेकरांनी यावेळी सांगितले. मात्र गत अडीच वर्षात पालकमंत्र्यांनी मनपास एक रुपयांचाही निधी दिला नसल्याचे सांगून कोणतेही नवीन विकासकाम झाले नसल्याचा आरोप आ. निलंगेकरांनी यावेळी केला. जनतेला गृहीत धरणार्‍या या पालकमंत्र्यांना आता लातूरकरच धडा शिकवतील असे सांगून तात्काळ हा घाण पाणीपुरवठा नाही थांबविल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आ. निलंगेकरांनी यावेळी दिला.


लातूर बचाव आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी चौक येथून महात्मा गांधीजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व छत्रपती शाहु महाराज यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून अभिवादन  करून करण्यात आली. यानंतर  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर आंदोलनाचा हा मोर्चा लातूर महानगरपालिकेवर धडकला. यादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केले. यानंतर शहराच्या विविध भागातून जमा केलेल्या घाण पाण्याच्या बाटल्याचे तोरण मनपा प्रवेशद्वाराला आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बांधण्यात आले. तसेच या घाण पाण्याने लातूर मनपा प्रवेशद्वारास अभिषेक करण्यात आला. या आंदोलनप्रसंगी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य शैलेश लाहोटी यांनी मनपा सह पालकमंत्र्यांच्या कारभारावर टिका केली.   मनपा सभागृह नेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी सुत्रसंचलन तर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांनी आभार प्रदर्शन केले. या आंदोलनात भाजप  शहर जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकट
जनतेसमोर झुकावेच लागते
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे मै झुकूंगा नही असे धोरण असल्याने ते जनतेला गृहीत धरत असल्याचा आरोप आ. निलंगेकर यांनी यावेळी केला. ज्या जनतेने आर्शिवाद देऊन आपल्याला मंत्री केलेले आहेत त्या जतनेसमोर आपल्याला झुकावेच लागेल असे सांगून आ. निलंगेकर यांनी पालकमंत्र्यांच्या या वृत्तीचा निषेध व्यक्त करून आगामी काळात लातूरकर आपल्याला झुकविल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]