◆काव्यातील व्याकरणाचे पुनरुज्जीवन हे मराठी गझलेचे योगदान – प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी◆
सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचा सूर
लातूर –
पारंपारिक, अभिजन कवितेवर प्रतिक्रिया देत आलेल्या मुक्तछंदाच्या स्वैरतेनंतर, मराठी गझलांनी पुढील पिढ्यांना मराठी व्याकरणाची नव्याने वळणवाट देवून मराठी भाषेचे दालन पुन:श्च वैभवशाली केले व त्याचे श्रेय मराठी गझलसम्राट सुरेश भटांना जाते, असे प्रतिपादन सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व चंद्रपूरच्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले.

सुरेश भटांनी नव्या जाणिवांच्या अभिव्यक्तीसाठी नव्या प्रतिमा, नव्या प्रतीकांसह सर्वसामान्यांच्या साध्या सोप्या, सहज, मात्र प्रभावी शब्दयोजनेवर भर देवून आपल्या कलंदर, अनवट विचारांचे तसेच सडेतोड काव्यशैलीचे गारुड येणाऱ्या पिढ्यांवर केले हे सांगत, सुरेश भटांनी त्यासाठी केलेल्या संघर्षावर सोदाहरण विवेचन करताना ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’, ‘जमणारच नव्हते माझे, माझ्या या चोरपिढीशी, मी येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होतो’, ‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेवून येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ अशा अनेक शैलीदार शेरांचा उल्लेख त्यांनी आपल्या व्याख्यानात केला.
सुरेश भटांची काव्यविषयक भूमिका ही माणसांच्या वेदना वेचणारी होती व आपल्या आग्रही अभिनिवेशाने त्यांनी नि:संकोच मराठी भाषा व मराठी गझलेचा विकास करून मराठी कवितेला नवे परिमाण दिले, हे त्यांचे मराठी साहित्यातील योगदान अविस्मरणीय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले व ‘मराठी गझल ही पुढे येत आहे, मराठीसही ती पुढे नेत आहे’ ‘दिली देणगी ही मराठीस ज्याने, ‘सुरेशा’स त्या ती दुवा देत आहे’ अशी आपल्या शेरांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य अजय पांडे (बेवक्त) यांनीही सुरेश भटांचे जीवनकार्य व भाषाकार्य अतिशय मोठे असून, त्यांनी मराठी कवितेला अभिव्यक्तीची नवी भाषा दिली व ‘साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला’ या सुरेश भटांच्या शेराने त्यांचे कार्य अधोरेखित करत दाद घेतली.

याच कार्यक्रमात संतोष कुलकर्णी यांच्यासह शहरातील रंगकर्मी डॉ. ऋजुता अयाचित, विजय मस्के, कौस्तुभ जोशी यांनी सुरेश भटांच्या निवडक व बेजोड कविता, गझलांचे अतिशय शैलीदार, वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे अभिवाचन करून सादरीकरण केले व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी उर्दू भाषिक रसिकाग्रणी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून मुहम्मद युनुस मुहम्मद युसुफ पटेल यांचा त्यांच्या साहित्यविषयक उपक्रमांच्या सातत्यपूर्वक आयोजनाबद्दल व त्यांच्या निरपेक्ष समाजकार्याबद्दल सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
यानिमित्ताने सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मराठी गझल लेखन समिधा स्पर्धा व गझल सादरीकरण स्पर्धेच्या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धक व मान्यवरांच्या गझलांचा अंक प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर याही वर्षी प्रकाशित करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोहर कबाडे यांनी व आभार प्रदर्शन गझल मंथन साहित्य संस्थेचे लातूर जिल्हा सचिव श्री. यशवंत मस्के यांनी केले. कार्यक्रमास शिरीष पोफळे, नंदकिशोर कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, सिने अभिनेते अनिल कांबळे, कल्याण वाघमारे, योगीराज माने, बालाजी टेंकाळे, संतोष गांधी, अमिता पेठे, डॉ. वर्षा पाटील, नामदेव कोद्रे, विमल मुदाळे, डॉ. श्रीराम पाटील, बाळासाहेब यादव, सुधन्वा पत्की यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक व कलावंत मंडळी उपस्थित होती.