मुंबई : दि.१४ ( विशेष प्रतिनिधी ) –— विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी काल, बुधवारी रात्री उशिरा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह बंड करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तसेच महानगरपालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार आव्हान दिलं आहे. त्यातच आता खासदारांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे १८ पैकी तीन खासदार वगळता इतर तब्बल १५ खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणार आहे.
शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आपल्या गटात आणून ताकद दाखवून दिली. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सातत्याने सांगितले जात आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, भाजप-एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असला तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांचे जाहीररित्या आभार व्यक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाला सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे का, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.




