स्तनपान सप्ताह

0
492

 

स्तनपानाकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पहावे

स्तनपानामुळे सशक्त आणि सुदृढ समाज निर्माण होईल

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत

लातूर, दि. 5 – जन्मानंतरचे पहिले सहा महिने बाळासाठी आईचे दूध हे पुर्णअन्न असते. नियमित स्तनपानामुळे बाळ व माता या दोघांचीही प्रकृती चांगली राहाण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या अर्ध्या तासात स्तनपान केल्याने बाळास आयुष्यभरासाठीची रोगप्रतिकारक शक्ती मिळते. प्रत्येक मातेने आपल्या बाळास नियमित स्तनपान केल्यास सशक्त आणि सुदृढ समाज निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे स्तनपान करवून घेणे, ही केवळ मातेपूरती मर्यादित जबाबदारी नसून कुटूंबाची आणि समाजिक जबाबदारी असल्याचे मत एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आयोजित कार्याक्रमात बोलताना तज्ज्ञांनी व्यक्त केले.

येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभाग आणि भारतीय वैद्यकीय संघटना, महिला शाखा, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 5 ऑगस्ट रोजी जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त बालरोग विभाग येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड, प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, आयएमएच्या लातूर शहर अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, आयएमएच्या महिला शाखा अध्यक्षा डॉ. मोहिनी गाणु, आयएमएच्या सचिव डॉ. राजश्री सावंत, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा काळे म्हणाल्या की, स्तनपानाचे महत्त्व कळावे यासाठी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधील जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. स्तनपान हे बाळ व माता या दोघांसाठीही फायद्याचे आहे. आईच्या पहिल्या दूधात प्रतिजैविक औषधे (Cholesterol) जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आईचे पहिले दूध बाळासाठी अधिक लाभदायी असते. गर्भधारणेच्या काळात मातेच्या पोटातील गर्भ पिशवी ही मोठी होत असते. नियमित स्तनपान केल्याने गर्भ पिशवी अकुंचन पावून पुर्ववत होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या बाळास एक ते दिड वर्ष तरी स्तनपान करणे आवश्यक आहे. मातेने व्यवस्थीत बसून स्तनपान दिल्याने स्तनपान सुरळीतपणे होते. शिवाय गरोदरपणापासून स्तनांग्रहाची काळजी घेतल्यास बाळ व मातेची प्रकृती चांगली राहाते.

यावेळी बोलताना संधीवात तज्ज्ञ डॉ. मोहिनी गाणु म्हणाल्या की, आईच्या दूधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची कॅल्शियमची गरज ही स्तनपानातून भागते. साधारणपणे बाल वयापासून ते तरुण वयापर्यंत हाडांची वाढ होत असते. महातारपणी हाडे ठिसूळ होवू नयेत यासाठी लहान वयापासून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान वयात 500 मी.ग्रा. दूध, हिरव्या पालेभाज्या, बदाम–काजू, अंबट फळे यांचे सेवन करावे. त्यासोबत ‘ड’ जिवनसत्वाची मात्रा भरून काढण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा 30 मिनीटे उन्हात बसावे. चालणे, धावणे, दोरीवरच्या उड्या, खेळणे व योगासणे अशा प्रकारचे व्यायाम केल्याने हाडे बळकट होण्यासाठी मदत होते.

यावेळी बोलताना नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्षा कराड म्हणाल्या की, आईचे दूध हे बाळासाठी सर्वश्रेष्ठ अन्न्‍ असून ते अमृता समान आहे. त्याचा उपयोग प्रत्येक मातेने आपल्या बाळास नियमितपणे स्तनपान करुन करावा. बाळासाठी आईच्या दूधाचे फायदे अमर्याद आहेत. मात्र गैरसमजूतीमुळे समाजातील अनेक माता आपल्या बाळास स्तनपान करीत नाहीत. अशा मातांमध्ये जागृती व्हावी हा स्तनपान सप्ताह साजरा करण्यामागचा हेतू आहे.

यावेळी बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉ. विद्या कांदे म्हणाल्या की, पहिले सहा महिने बाळास इतर अन्न्‍ वर्ज्य असून बाळास केवळ आईचे दूधच द्यावे. स्तनपान ही केवळ एकट्या मातेची जबाबदारी नसून ती कुटूंबाची व सामाजिक जबाबदारी आहे. नकारात्मक मानसिकतेमुळे सध्या समाजातील 50 टक्केच माता नियमित स्तनपान करतात. परिणामी स्तनपानाअभावी समाजात कुपोषीत बालकांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संक्रमीत माताही सुरक्षा नियमांचे पालन करुन बाळास स्तनपान करु शकतात व गरोदर मातेला लसीचे दोन्ही डोस घेता येतील.

यावेळी डॉ. एन.पी. जमादार, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सी. एस. पाटील, मेट्रन मिना पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शिल्पा दडगे यांनी तर आभार डॉ. संस्कृती मरळी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. लिला भट्टड, डॉ. संजिवनी तांदळे, डॉ. आशा कोल्हे, डॉ. शैला बांगड, डॉ. चारुशिला उदगीरकर, डॉ. शितल शेळके, डॉ. कल्पना जाजू, डॉ. भागवत लवटे, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. दत्तात्रय कुलकर्णी, डॉ. विरेंद्र पाटील, प्रा. पद्मावती यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण, माता व नातेवाईक उपस्थित होते.

———————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here