लातूर– स्त्रीवादी साहित्य जहाल पध्दतीनेच मांडण्याची गरज नाही तर स्री पुरुष यांच्यात प्रेमाने संवाद व समानतेचा पुल बांधता येतो. मवाळ स्त्रीवादी भूमिका मांडून समाजाला प्रेमाने समृद्ध करता येते असे सांगणारी गझल म्हणजे विमल मुदाळे यांचा शब्दचकोर गझलसंग्रह होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.
विमल मुदाळे- इरले लिखित शब्दचकोर या गझलसंग्रहाचे प्रकाशन लातूर येथे अतिथी सभागृहात रविवारी झाले.याप्रसंगी ते प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी फ.म.शहाजिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गझलकार प्रा.संध्या पाटील, बापू दासरी, प्राचार्य विकास कदम यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.राजशेखर सोलापुरे म्हणाले की, कवीने सर्वांच्या मनातील भावना व्यक्त करणारी कविता ही लिहिली पाहिजे म्हणजे अव्यक्त माणसाला आपले प्रतिबिंब साहित्यात दिसेल. दुःख हा ईश्वर मानणारी कवयत्री बुध्दाच्या विचारांशी आपले नाते सांगते. दुःख आणि वेदनेने विव्हळताना सहानुभूतीची अपेक्षा न करता स्त्रीयांनी सक्षमतेने उभे राहण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे असा मार्ग शब्दचकोर गझलसंग्रह दाखवितो, असे मत त्यांनी मांडले.
प्रा. संध्या पाटील बोलताना म्हणाल्या की, स्त्रीचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी शब्दचकोर गझलसंग्रहातील गझला महत्वपूर्ण आहेत.बापू दासरी यांनी इतर गझलकारांच्या सोबत विमल मुदाळे यांच्या गझलांची तुलना केली. विकास कदम यांनी शब्दचकोर गझलसंग्रहातील एक गझल गाऊन दाखविली.
अध्यक्षीय समारोप करताना फ.म.शहाजिंदे म्हणाले, सहजपणे गझल लिहिली पाहिजे. स्त्री व पुरुष यांच्यातील संवाद म्हणजे शब्दचकोर गझलसंग्रहातील गझला आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भक्ती पाटील या लहान मुलीने गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव मुदाळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मीना घुमे यांनी केले तर आभार डॉ. संजय जमदाडे यांनी केले. याप्रसंगी पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे आशय शशी डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश काशिनाथ मुदाळे, आकाश हनुमंत इरले, ऋषिकेश हनुमंत इरले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्य साहित्यिक उपस्थित होते.

+++++++++++++++++++++
फोटो ओळ- विमल मुदाळे-इरले लिखित शब्दचकोर या गझलसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा.फ.म.शहाजिंदे, डॉ.राजशेखर सोलापुरे,प्रा.संध्या पाटील, प्रा.विकास कदम, बापू दासरी, रामराव मुदाळे.
————–++++++++++———