राजा नारायणलाल लाहोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त
2,800 झाडांचे मियावॉकी पद्धतीने वृक्षारोपण
लातूर –लातूर शहरासह संबंध मराठवाडा प्रांताच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आध्यात्मिक, सामाजिक वैभवात अमुल्य योगदान देणारे विभूती राजा नारायणलाल लाहोटी यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या परिसरात 2,800 वृक्षांची लागवड सोमवारी करण्यात आली.
राजा नारायणलाल लाहोटी यांनी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचविली व हजारो सुशिक्षित, सुसंस्कृत तरुणांची पिढी त्यांनी लातूरला दिली. काळाची गरज ओळखून लातूर शहराला रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री मो जाफर शरीफ यांच्याशी पाठपुरावा करून लातूरला रेल्वे आणण्यात भरीव योगदान दिले.
त्यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा परिसरात 5,600 स्क्वेअर फुट जागेमध्ये 2,800 वृक्षांची मियावॉकी पद्धतीने लागवड करून वनीकरण करण्यात येत आहे. यानिमित्ताने स्कूलमध्ये 19 जुलै ते 24 जुलै दरम्यान वनीकरण उत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी यांच्या हस्ते सोमवारी वृक्षारोपणाने झाले. याप्रसंगी प्राचार्य कर्नल एस ए वरदन यांच्यासह कुलसचिव प्रविण शिवनगीकर, मुख्याध्यापिका विद्या साळवे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी राजा नारायणलाल लाहोटी यांना सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. संगीत विभागाच्या वतीने भजन सादर केले तर शिक्षक डॉ सतीश जाधव यांनी राजा नारायणलाल लाहोटी यांच्या स्मृतीला उजाळा दिला.
आपल्या भाषणात डॉ जाधव म्हणाले की, राजा नारायणलालजी लाहोटी हे लातूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षितिजावर तेजाने तळपणारे सूर्य होते. बिकट परिस्थितीतून त्यांनी आपल्या वडिलांचा वसा पुढे चालवित आपल्या शिक्षण संस्थेला वैयक्तिक निधीतून बळकटी देऊन शाळा चालवली. ते अतिशय उदार व दानशूर होते. म्हणूनच त्यांना ‘राजा’ या नावाने संबोधले गेले. राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो’ हा उदात्त विचार राजा नारायणलालजी यांच्या व्यक्तिमत्त्वात ठळकपणे दिसतो.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी उत्तुंग होती. त्यांनी लातूर शहराचे नाव जगाच्या नकाशावर यावे यासाठी येथे लोहमार्ग सुरू व्हावा यासाठी आग्रही व प्रयत्नशील राहिले. यामुळे लातूरवासीयांना खूप फायदा झाला व लातूरमधील बाजारपेठ बहरू लागली.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्व जाणून दूरदृष्टी असणाऱ्या राजा नारायणलालजीनी १९८३ मध्ये श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलची स्थापना केली. फक्त शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर ‘सामाजिक जाणिवेचे भान’ हा लाहोटी घराण्याचा वारसा ही त्यांनी चालवला. लातूरमध्ये जनहिताचे कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात नारायणलालजींचा सक्रिय सहभाग असे, असेही डॉ सतीश जाधव म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयश्री गुट्टे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी मिलिंद शेटे, आशिद बनसोडे, प्रकाश जकोटिया, बीके भालेराव, विवेक डोंगरे, अकमल काझी, ज्ञानेश्वर यादव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिक्षक व कर्मचारी होते.











