36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमनोरंजन*स्वरसाक्षी फाऊंडेशनची- नज़ाकत*

*स्वरसाक्षी फाऊंडेशनची- नज़ाकत*


मराठीत संगीत आणि शब्दांचं नातं आहे फार पूर्वीपासूनचं. मागील काळात विविध नाटक कंपन्यांनी उत्तमोत्तम संगीत नाटकं बसवून ती मराठी लोकांसमोर आणली होती. एक काळ असा होता की मराठी श्रोतावर्ग हा संगीत नाटकांसाठी अक्षरशः वेडा होता. संध्याकाळी सुरू झालेलं नाटक अगदी पहाटे पहाटे पर्यंत चालायचं. नाटकातली नाट्यपदे कितीतरी वेळ गायली जायची.


पण हळूहळू विविध मर्यादांमुळे संगीत नाटकांचा ओघ कमी झाला आणि चित्रपटांचे माध्यम लोकप्रिय होत गेले आणि रसिकांना करमणुकीचं वेगळं साधन मिळालं.
त्याच काळात मराठी कविता ही लिखित स्वरूपात वृत्तपत्रं, मासिकांमधून रसिकांपर्यंत पोहोचवली गेली.मराठी कविता लोकप्रिय व्हावी, ती रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी ज्येष्ठ कवी वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांनी विविध ठिकाणी जाऊन एकत्रित काव्यवाचनाचे प्रयोग केले आणि मराठी कविता रसिकांपर्यंत आपल्या वेगळ्या अशा सादरीकरणाच्या माध्यमातून पोहोचवली.
याच काळात हिंदी उर्दू ग़ज़लांचे मुशायरे विविध ठिकाणी आयोजित केले जात होते, गजल मैफिलीही होत होत्या पण मराठी गझल मात्र तुलनेने नवीन होती, जनसामान्यांत पोहोचली नव्हती. इ.स.१९६० नंतर मराठी गझला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम गझलसम्राट सुरेश भट यांनी केलं. ते स्वतः, गझल गंधर्व सुधाकर कदम आणि शाहीर सुरेशकुमार वैराळकर विविध ठिकाणी जाऊन गझलांचे कार्यक्रम करायचे. सुरेश भटांच्या गझल सादरीकरणाची मोहिनी मराठी गझल रसिकांवर प्रचंड होती.


नंतरचा काही काळ तसाच गेला. त्यानंतर गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या वेगळ्या अशा गझल गायकीने खऱ्या अर्थाने मराठी गझल सर्वदूर पोहोचवली, लोकप्रिय केली असं म्हणावं लागेल. मराठी गझल मैफिलीचे विविध प्रयोग भारतात आणि भारताबाहेरही त्यांनी केले. आता दुसऱ्या पिढीतील बरेच गायक संगीतकार आपापल्या परीने मराठी गझल सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आजही म्हणाव्या तशा गझल मैफिली आयोजित केल्या जात नाहीत हे वास्तव आहे.
आता ‘स्वरसाक्षी फाऊंडेशन’ या संस्थेने मराठी गझल मराठी श्रोतावर्गात वेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचं ठरवलं आहे. प्रसिद्ध संगीतकार-गायक अतुल दिवे आणि संगीतकार-गायिका वैशाली राजेश यांचा ‘नजाकत’ हा गझल मैफिलीचा कार्यक्रम आपलं वेगळेपण जपत आहे. या नजाकच्या माध्यमातून अतुल दिवे वैशाली राजेश यांनी विविध गझलकारांच्या गझला संगीतबद्ध करून प्रत्यक्ष मैफिली आणि ध्वनिमुद्रित स्वरूपात मराठी श्रोतावर्गात पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ३५०० पेक्षा अधिक मैफिलीचा अनुभव असलेले अतुल दिले आणि जवळजवळ २५०० मैफिलींचा अनुभव असलेल्या वैशाली राजेश यांचं शब्द सुरांवरचं प्रभुत्व अफलातूनच. विविध गझलकारांच्या आशयपूर्ण गझला निवडणे, त्याला सुंदर सुमधुर अशा चालींमध्ये बांधणे आणि आपल्या उत्तम गोड आवाजात त्या सादर करणे हे या नजाकतच्या दोन प्रमुख गायक-संगीतकारांचं वैशिष्ट्य.
कुठलाही उपक्रम हा पाठबळाशिवाय पूर्ण होत नाही नजाकत गझल मैफिल बांधण्यात त्यांच्या सहकाऱ्यांचाही मोठा हातभार आहे. दि.१८ जूनला औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये नजाकतचा प्रयोग झाला. यात वैभव जोशी, सुरेश भट, दिलीप पांढरपट्टे, व्यंकटेश कुलकर्णी, गिरीश जोशी, डॉ. महेंद्र वाव्हळ, रमेश ठोंबरे, डॉ. राज रणधीर, आत्माराम जाधव या गझलकारांच्या उत्तमोत्तम गझला काल औरंगाबाद येथील मराठी रसिकांनी अनुभवल्या. प्रा. महेश अचिंतलवार यांचं निवेदन कौशल्य रसिकांना परिचित आहेच. कालच्या मैफिलीत प्रा. महेश अचिंतलवार आणि गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी निवेदनातून गझलेची ओळख रसिकांना करून दिली.
या मैफिलीचं उदघाटन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी
अंजली धानोरकर आणि माजी आमदार श्री. श्रीकांत जोशी यांनी केलं.

  • व्यंकटेश कुलकर्णी ,हैदराबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]