लातूर, दि. ३- (प्रतिनिधी)-
अंदनामानात अकरा वर्षे व रत्नगिरीत सोळा वर्षे असा सत्तावीस वर्षाचा प्रदीर्घ तुरूंगवास भोगून देशाच्या अखंडतेसाठी स्वतः च्या प्राणाची आहूती देणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अकारण आक्षेप घेतले जात आहेत. सावरकरांवर धूळफेक करण्याचे नव्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे युवा पिढीला सावरकरांचा खरा इतिहास समजावून सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक प्रवचणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

भगवान परशुराम जयंती निमित्त परशुराम जयंती महोत्सव समिती २०२२ च्यावतीने विवेकानंद संस्कार सेवा केंद्राच्या सभागृहात ‘सावकर एक झंझावात’ या विषयावर शेवडे गुरूजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शेवडे यांनी आपल्या तासाभराच्या व्याख्यान स्वातंत्र्यावीर सावकरकरांचे साहित्य , त्यांचे जीवनकार्य याविषयी परखड विवेचन करून सावरकराचा झंझावात, धगधगते सावरकर श्रोतृवर्गापुढे उभे करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. जेष्ठ अभियंते देवीकुमार पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्याख्यानास मंचावर परशुराम जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. संजय पांडे, आमदार अभिमन्यू पवार, यंदाच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी अत्यंत परखडपणे आपल्या व्याख्यानात प्रारंभीच सध्याची युवा पिढी, राज्यकर्ते आणि सावरकरांविषयी अपप्रचार करणार्यांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजनच घालण्याचा प्रयत्न केला. फेसबुक, व्हॉटसअप विद्यापीठाच्या अधीन झालेली युवा पिढी कुठलाही सारासार विचार न करता खोट्या माहितीला, अपप्रप्रचाराला बळी पडत आहेत, हे दुर्देवी असून, युवा पिढीला सावरकर समजावून सांगण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.सावरकरांची वाक्य तशीच मोडून तोडून वापरून त्यांच्याविषयी अपप्रचार पसरवला जात आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सध्या जातीपातीचे राजकारण केले जात आहे. याविषयी बोलतांना ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत जातीपातीचे राजकारण अजिबात नव्हते. शिवाजी महाराजांनी तर अठरापगड जातींना एकत्र केले होते. तेंव्हा जाती होत्या मात्र जाती – जातीमध्ये देष नव्हता सध्या जाती- जातींमध्ये द्वेष जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. हे खरोखर दुर्देवी आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. हिंदू धर्म म्हणजे वटवृक्ष आहे. आणि त्यांच्या पारंब्या म्हणजे वेगवेगळ्या जाती. एकमेकांवर दोषारोप करून जातीभेद निर्माण करणे कधीही घातक आहे. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करा, अपप्रचाराला बळी पडू नका, बुद्धीचा वापर करा, आपल्या धर्मावर गाढा विश्वास ठेवा.

डॉ. सच्चिदानंद शेवडे पुढे म्हणाले की, सावरकरांच्या वाट्याला रेाजचा अपमान , छिलका कुटणे व कोलू चालविणे येत होते. त्यातूनही आपले मन हे वेड लागण्याकडे व आत्महत्येकडे झुकू नये याचा ते प्रयत्न करीत होते. यातूनच अप्रतीम खंडकाणवयाची निर्मिती झाली. कोठडीची भिंत हाच कागद व घातपाताचा काटा अथवा खिळा हा कलम बनला.
ज्या देशाने सावरकरांवर दीर्घ मुदतीची शिक्षा लादली त्या देशातील एक खासदार लॉर्ड फेन्नर ब्रॉकवेचे उद्गार लक्षात ठेवायला हवे. ७ जून १९८५ ला ब्रिटिश संसदेने सावरकरांना श्रद्धांजली वाहिली ८ जूनला इंडिया हाऊसमध्ये ८० ब्रिटिश खासदार व ग्रीसच्या राजदूतांची एक सभा झाली. त्यात बोलतांना लॉड ब्रॉकवे म्हणाले ब्रिटिशांनी सावरकरांवर ठेवलेले सर्व आरोप निराधार होते. सावरकरांसारखा देशभक्त असणे ही कोणत्याही देशाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. ब्रिटिश संसदेने सावरकरांचा गौरव केल्यानंतर अठरा वर्षांनी आम्हाला जाग आली व भारतीय संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. अशी माहितीही डॉ. शेवडे यांनी आपल्या व्याख्यानात दिली.
प्रारंभी भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात जयंती महोत्सव समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या संस्कृत श्लोक पाठांतर, रांगोळी पाककला, ऑनलाईन रामरक्षा पठण स्पर्धाचा यावेळी निकाल जाहीर करण्यात आला. यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व परशुरामांची प्रतिमा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते देण्यात आले. यंदाच्या समितीचे अध्यक्ष प्रवीण कस्तुरे यांनी प्रास्ताविक केले. देवीकुमार पाठक यांनी अध्यक्षीय समारोप केला. आरोह संगीत अकादमी मधील कु. आर्या अनंत कासारखेडकर सावरकरांचे बहारदार गीत सादर केले. संजंय अयाचित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.




