दयानंद कला महाविद्यालय संगीत विभागाचा उपक्रम
लातूर.दि.१०
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी साऱ्या भारतीयांना आपल्या सुमधूर गायनाने मंत्रमुग्ध केले. भारतीय लोकांच्या मनाची ओंजळ भरली.अशा या भारताचे वैभव असलेले लता मंगेशकर याचे दुःखद निधन झाले. त्याच्या जाण्याने आपल्या देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे सारा देश हळहळला. त्यांच्या अनमोल कार्याप्रती व भारतीय संगीतासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांना देशभरातून वेगळ्या रुपात श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी लतादीदींची चित्रे काढून व भित्तीपत्रक तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतरत्न लता दीदींच्या चित्रांचे विमोचन दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी,राज्य मंडळ सदस्य डॉ. संदीप जगदाळे,डॉ.गोपाल बाहेती,प्रा. जिगाजी बुद्रुके, प्रा.रविकिरण गळगे,प्रा. सुधीर गाडवे,प्रा.दशरथ ननावरे आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर साठे या विद्यार्थ्याने बारा तास परिश्रम घेऊन लता मंगेशकर यांचे चित्र काढले व आदरांजली वाहिली. याबरोबरच कु. वैष्णवी कमळे,कु.तेजश्री जमादार, आदम शेख यांनी सुद्धा अत्यंत रेखीव अशा प्रकारची लतादीदींची चित्रे काढून कृतज्ञता व्यक्त केली. वल्लभ काटकर, मंगेश वाघमारे, कृष्णा गोडसे यांनी लतादीदींच्या देदीप्यमान कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी भित्तीपत्रके तयार करून लता दीदींना अभिवादन केले.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या या चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी व दिदींना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.नवोदित चित्रकारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.