31.8 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडीहत्तीबेट तीर्थक्षेत्राचा विश्वकर्मा :व्ही. एस. कुलकर्णी

हत्तीबेट तीर्थक्षेत्राचा विश्वकर्मा :व्ही. एस. कुलकर्णी


पर्यटन विकास व ऑक्सिजन बँकेसाठी झटतोय हाअवलिया!!!


** पत्रकार हा निर्मोही व निर्भय समाजसेवकच असतो.याचे भान सतत ठेवणारा पत्रकार म्हणून व्ही.एस.कुलकर्णी सर्वांना परिचित आहेत. एखाद्या कामाचे वेड लागल्यानंतर देहभान विसरून ते काम यशस्वी करण्यासाठी व्ही. एस. कुलकर्णी जीवापाड कष्ट करतात. यातून हत्तीबेट तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाबरोबरच त्यांनी या बेटावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ऑक्सिजन बँकच तयार केली आहे.
श्री.व्ही. एस. कुलकर्णी यांच्या जन्मभूमीजवळील देवर्जन गावाजवळ असलेला हत्तीबेटाचा ओसाड डोंगर आता ‘मिनी माथेरान’झाला आहे.


गेल्या ४० वर्षांपासून पत्रकार असलेले व्ही. एस.कुलकर्णी हे हत्तीबेटाच्या विकासासाठी झटत आहेत. “ज्या माणसाच्या ठायी सत्य,पावित्र्य आणि निःस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल”. हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य कायम स्मरणात ठेवून त्यांनी आपले हे विधायक
कार्य चालूच ठेवले.
हत्तीबेटाला “मिनी माथेरान”करण्याचा विडा या सृजनशील पत्रकाराने उचलून लेखणी व वाणीद्वारे हत्तीबेटाबाबत लोकांना निसर्गाप्रति अतिशय संवेदनशील बनविले. लोकांची मने चेतविली, त्यांना चिंतन करण्यास भाग पाडले. प्रसार माध्यमाचा उपयोग उत्तम प्रकारे करून राजकारणी व अधिकाऱ्यांना हत्तीबेटाचे दर्शन हट्टाने घडविले.हत्तीबेटावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून हरितक्रांती करावी असा संकल्प या विश्वकर्मा पत्रकाराने केला.


सुरुवातीला एका नर्सरीतील रोपे खरेदी करून ब्लास्टिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे करून वेगवेगळ्या९६७ वृक्षांची लागवड या विश्वकर्म्याने हत्तीबेटावर केली.खडक फोडून ही झाडे लागवड करताना या खडकावर झाड येते का?हा पत्रकार आहे,कुठलं तरी घबाड कुणाला तरी फसवून आणलं असेल, असे तर्क कुतर्क करीत, टिंगल टवाळी सुरू केली. हा झालेला अपमान हीच प्रेरणा समजून त्या झाडांना जगविण्याचे कार्य समोर आलेल्या संकटांना सामोरे जावून केले. या सुरू केलेल्या कार्याचे यश दिसून येत असतानाच वन विभाग व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हत्तीबेटावरील उर्वरित क्षेत्रावर वृक्षांची लागवड त्यांनी सुरू केली. अधिकारी व राजकारणी मंडळींच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण करून त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाचे छोटे फलक तारीख टाकून लागवड केलेल्या झाडाजवळ लावून ते झाड सांभाळ करण्याचे काम सुरू केले.


सामर्थ्य आहे चळवळीचे।
जो जो करील तयाचे।
मात्र तेथे पाहिजे अधिष्ठान, भगवंताचे”.!!

या दासोक्तीनुसार या धडपड्या पत्रकाराची व्यापक हिताची तळमळ कायम तना मनात असते. आणि अगदी,
निष्ठावंत भाव ,भक्तांचा स्वधर्म।
निर्धार हे वर्म चूको नये”।।
अशी जगण्याची शैली या व्यक्तिमतवाची आहे.
‘नम्र जाला सर्व भूता,
तेणे कोंडीले अनंता’।।

या संतोक्तीनुसार सर्व सृष्टी त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यामागे उभी राहिली आहे. हत्तीबेटावर वन विभागाच्या सहकार्याने पुन्हा १५हजारांच्या वर वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याबरोबरच या झाडांचा वाढदिवस व “झाड माझा भाऊ”समजून महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते झाडांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्याचे कार्य या अवलियाने सुरूच ठेवल्यामुळे राज्यशानाने हत्तीबेटास सन२०१२साली संत तुकाराम वन ग्राम योजनेचा १०लक्ष रुपयांचा पुरस्कार देवून या हत्तीबेटाचा व याअवलियाचा सन्मान केला आहे.वृक्षांची लागवड करण्या अगोदर देवर्जन प्रकल्पाचे काम सुरू असताना मोठा बुलडोझर आणून दत्त मंदिरासमोरचे मैदान ,रस्ता तयार करून श्री. दत्त मंदिराची प्राणप्रतिष्ठा रामपूरी महाराजांच्या प्रेरणेतून करण्यात आली. श्री.सद्गुरू गंगारामबुवा महाराज संजीवन समाधी मंदिरा समोर मैदान,महाराजांची पितळी मूर्ती,व मंदिराचा जीर्णोद्धार व अलीकडे श्री. स्वामी समर्थ मंदिर उभे करून स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे काम या विश्वकर्म्याने केले आहे. भाविक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हत्तीबेटास१९९५साली पर्यटनाचा”क”दर्जा व २०२०साली”ब”दर्जा घेवून हत्तीबेटाच्या विकासासाठी पर्यटनाचा निधी मंजूर करून आणण्यासाठी हा अवलिया वर्षानुवर्षे झटतोय. हा विशालकाय डोंगर हिरव्यागार वृक्षांनी आच्छादित होवून बहरला आहे.
संत रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे


उंच डोंगर ते उंच कडे भारी।
पडे धो धो ज्याचिया वरूनी वारी।
भोवताले रान ते दाट आहे।
अशा ठायी देव तो स्वयें राहे ।
देवळी त्या देवास बळे आणा।

परी राहे तो सृष्टीमध्ये राणा’।। याप्रमाणे हत्तीबेटावर असलेल्या देव देवतांना राहायला सुंदर वन मिळण्यासाठी या पत्रकार असलेल्या विश्वकर्म्याला इथे काम करण्याची प्रेरणा याच देवदेवतांनी दिली असावी.हत्तीबेटाचे नाव आज जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. येत्या वर्षभरात हत्तीबेट या पर्यटन स्थळाचा समावेश जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी या निर्मोही व निर्भय समाजसेवकाची धडपड सुरूच असल्यामुळे या पत्रकाराचे करावे तितके कौतुक कमीच पडणारे आहे. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे “।
असे पवित्र दृश्य डोळ्यासमोर ठेवून ही वृक्ष संपदा निर्माण व जोपासणाऱ्या या जगावेगळ्या वृक्ष प्रेमीला माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!

शशिकांत चिंचोरे,
पुणे.
बासरीवादक,संगीत समीक्षक,
डॉ.पं. केशव गिंडे यांचे शिष्य,पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]