वाहू हा संसार देवापायी
हा भाव वासनेस काबूत ठेवून
सत्कर्म -सेवेला फलद्रूप करतो
………………………………..
अँड.शाम कुलकर्णी याजंकडून…
औसा ;आपण जे काही कर्म करतो ते त्या परमात्म्याच्या साक्षीत्वातच करतो हे लक्षात घेऊन जे कर्म हातून घडते ते निश्चितपणाने सत्कर्म असते आणि जेव्हा परमार्थ सेवा असेल किंवा संसार तो देवाला अर्पण करण्याच्या वृत्तीने असेल तर अशा कर्मातून सेवा तर पण चित्तास समाधान लाभते असे विचार ह भ प श्री ज्ञानराज महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.

5ऑगस्ट पासून औसा येथील नाथ मंदिरात सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात अत्यंत भक्ती उत्साहात सुरू असलेल्या श्रावण मास अनुष्ठानात सायंकाळी नित्य चक्रीभजन साधनेनंतर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वरील निरूपणात ज्ञानराज महाराज बोलत होते.
संसारात जशी लेकीवर माया असली तरी ती परघरचे धन व लक्ष्मी असल्याने त्यावर पित्याची अशक्य असत नाही. ज्याप्रमाणे आंब्यामध्ये काही भाग सडलेला असला तरी तो बाजूला काढून आपण चांगलाच आंबा खातो, ज्याप्रमाणे गाय देखणी असेल किंवा कुरूप परंतु तिचे दूध आपण प्राशन करतो, दुधाचा गुणधर्म तिथे बदलत नाही, तद्वत माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो वाईट चांगले गुण असताना आपण चांगल्या गुणांचा स्वीकार करतो वाईट गुण अव्हेरतो तसेच वासनेच्या बाबतीत आहे वासना चांगली असेल तर हातून कर्म ही चांगलेच घडतात आणि त्याची फलश्रुती देखील त्यास चांगली व पुण्यात्मक मिळू शकते असे महाराज म्हणाले. ज्यामधून आपल्याला पूर्ण समाधान आनंद लाभेल ते कर्म निश्चितपणे करावे आणि यासाठीच गुरूंची संगती आणि या अनुष्ठानाचा उद्देश असल्याचे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले.

वासनेला नियंत्रित आणण्याकरता संतांनी अनेक मार्ग सांगितले आहेत ते आपण ऐकतो पण त्यावर अंमल करत नाही यावर भर देत ज्ञानराज माऊली म्हणाले संन्यास दंभ, पतंजली म्हणजेच ध्यानधारणा ,योग आणि क्रियेचा मार्ग हे वासनेला काबुत ठेवण्यासाठी परिणामकारक ठरतात असे त्यांनी स्पष्ट केले.

संतांनी फळाची अपेक्षा ठेवली नाही तसे भक्तांनीही फळाची अपेक्षा न ठेवता साधना उपासना केली पाहिजे कर्म चांगले असतील तर त्याचे फळ निश्चितपणे समाधान व आनंद देणारे असते असे सांगून संतांनी संसार परमार्थ दोन्हीही देवास अर्पण करण्याचा संदेश आपणास दिल्याचे महाराज म्हणाले
गुरुवारी श्री शिंदे बंधू कवटा येथील भजनी मंडळ आणि लक्ष्मीकांत माळवतकर यांची माळ सेवा गुरु चरणी नाथअनुष्ठानात रुजू झाली.
…..




