32.2 C
Pune
Sunday, March 15, 2026
Homeलेख‘हरित उद्योजकते’चा नवा प्रयोग !

‘हरित उद्योजकते’चा नवा प्रयोग !

हरित उद्योजकते’चा नवा प्रयोग !
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्याला ‘एनआयएफ’कडून अनुदान
  • रजनीश जोशी
    सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम युरियासारख्या खताच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर झाला तर पर्याय काय आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच पडू शकतो. पण मंगळवेढ्याचे कृषीसंशोधक आणि शेतकरी वैभव मोडक यांनी ‘कॉम्पॅक्ट सेंद्रिय खत पॅलेट मशीन’द्वारे ‘ऑर्गेनिक फर्टिलायझर’चा पर्याय निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या संशोधनाची दखल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानने (एनआयएफ) घेतली. इतकेच नव्हे तर त्या मशिन्सच्या निर्मितीसाठी ८० हजार रूपयांचे अनुदानही दिले.

  • साधारणपणे ५० किलो युरियाचे पोते २२०० रूपयांना आहे. सरकार त्यावर ‘सबसिडी’ (अनुदान) देते आणि शेतकऱ्यांना ते कमी किमतीत मिळते. अशा एका पोत्यावर सुमारे १९०० रूपये अनुदान सरकारला द्यावे लागते, ‘मोडक अग्रोटेक’ची ‘कॉम्पॅक्ट ऑर्गेनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजी’ वापरली तर शासकीय अनुदानाची कोट्यवधी रूपयांची बचत होऊ शकते. रासायनिक खतांवरील अवलंबित्व आणि मातीचा ऱ्हास रोखण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडू शकते. कोरडवाहू शेतीत ज्वारी, बाजरी, करडी, हरभरा बियाणे पेरणीवेळीच हे खत एकत्रित टाकल्याने पिकाच्या मूळाशी पोषक तत्वे थेट मिळतात.

  • या खताची ‘पॅलेट मशीन’ तयार करून श्री. मोडक यांनी सुमारे ६५ महिला गटांना उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून दिले आहे. ते म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या शेतातील गोठ्यात गाय, म्हैस, बैलाचं शेण गोळा करण्याचं काम सुरू होतं. या साठवलेल्या शेणाचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून करण्याचा माझा विचार होताच. पण अन्य शेतकऱ्यांकडे शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या असतात. त्यातून मोठी खतनिर्मिती होते. त्याचा योग्य वापर करण्यासाठी मी एक तंत्र शोधले. बरेच शेतकरी सेंद्रिय खतही ट्रॉलीने पसरतात. त्यामुळे ३० ते ४० टक्के खत वाहून जाते. पण या खताच्या पॅलेट्स तयार केल्या आणि बायोफर्टिलायझरचा स्प्रे केला तर मातीची सुपीकता वाढते, तणांची वाढ घटते, खतांचा अपव्यय कमी होतो, असे माझ्या लक्षात आले.’’
    मोडक यांच्या या तंत्रज्ञानामुळे, पेरणीदरम्यान खते आणि बियाणे एकाचवेळी जमिनीत जात असल्यामुळे पिकांची उगवण आणि वाढ चांगली होते. कर्ब, नत्र, स्फूरद आणि पालाश ही सेंद्रिय अन्नद्रव्ये, जीवाणूंचे विरजण आणि ओलावा योग्य प्रमाणात जागेवरच मिळतो. सोपी यंत्रसामग्री असल्यामुळे कामगारांची कमतरताही भासत नाही. पर्यावरणदृष्ट्या शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते. शेतकऱ्याला व्यक्तिगतरित्या परवडेल असे हे मॉडेल असून त्याचा उत्पादन खर्च फक्त चार हजार रूपये आहे. व्यवसाय मॉडेल म्हणूनही त्याचा उपयोग करता येतो. ग्रामीण भागात महिलांना रोजगार मिळू शकतो. गावातला तरुण गावातच राहिला पाहिजे, महिलांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे, इतकंच नाही तर ग्रामीण महिलांना ग्रामविकासाच्या निर्णयात अग्रस्थान दिलं पाहिजे, असं मानणारे अंकोलीच्या प्रयोग परिवाराचे अध्वर्यू अरुणकाका देशपांडे यांनीही श्री. मोडक यांच्या संशोधनाचे कौतूक केले आहे.

  • सगरोळी, बारामती, कण्हेरीमठ आणि मंगळवेढ्यासाठी प्रत्येकी एक अशा चार ‘कॉम्पॅक्ट सेंद्रिय खत पॅलेट मशीन’ तयार करण्याचे काम वैभव मोडक करीत आहेत. ही मशिन्स शेतावरच तयार करता येतात. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार तरुणांसह महिलांना यातून रोजगार मिळू शकतो.
    वीस शेतकऱ्यांचा प्रयोग
    वैभव मोडक यांच्या या ‘ऑर्गेनिक फर्टिलायझर’चा उपयोग मंगळवेढा परिसरातील २० शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर आपापल्या शेतात केला. तेव्हा पिकाची उगवण, वाढ, दर्जा आणि उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. मातीचे आरोग्य आणि पिकाचे उत्पादन वाढवणाऱ्या या प्रकल्पामुळे कमी श्रमात जास्त फायदा होऊन शेती उत्पन्नात क्रांती घडू शकते, असे लक्षात आले. त्याचीही दखल केंद्र सरकारस्तरावरील यंत्रणेने घेतली आहे.
    वैभव मोडक यांचा मोबाईल क्रमांक : ९४२०९१६८५८

लेखन: रजनीश जोशी, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]