23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeलेख*हसा आणि हसवा,लेकहो !🤣*

*हसा आणि हसवा,लेकहो !🤣*

आपल्याकडे उगाचच सदा गंभीर राहणाऱ्या व्यक्तीस उगाचच खूप मानाचं स्थान मिळत असतं. याउलट हसणाऱ्या व्यक्तीस मात्र “हसण्यावारी” घेतलं जातं. त्याच्याकडे कुत्सितपणे पाहिल्या जातं. त्याला उथळ समजल्या जातं. “टवाळा आवडे विनोद” असं तर पूर्वापार म्हटलं गेलंय.

खरं म्हणजे हसण्याचे खूप फायदे आहेत. हसण्याने आपले
ताणतणाव दूर होतात. आपले स्नायू मोकळे होतात. हसण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. प्रतिकूल परिस्थितीला आपण सहज तोंड देऊ शकतो. जास्त हसणारी माणसं जास्त काळ, जास्त छान जगतात. “हसणं हे उत्कृष्ट औषध आहे” असं ,(अर्थातच इंग्रजी !) सुभाषित आहे.

जगात दिवसेंदिवस खूप भौतिक प्रगती होत आहे. पण त्यामुळे माणूस यशस्वी झाल्याचे समजण्यासाठी कृत्रिम निकष लावल्या जाऊ लागलेयत .नैसर्गिक भाव भावना मागे पडू लागल्या. त्या इतक्या की माणूस रडणं, हसणंही विसरत चाललाय . मनातल्या भावनांचा वेळीच यथा योग्य निचरा होत नाहीय. त्यामुळे शारीरिक, मानसिक आजार वाढत आहेत. आत्महत्या करण्याचे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचे,मानसिक आजारांचे,मनो शारीरिक आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. प्रगत समजल्या जाणारे देशही यास अपवाद नाहीत.

अशा या सर्व गंभीर परिस्थितीत भारताने जगाला एक छान भेट दिलीय. ही भेट आता जागतिक चळवळ झालीय.ही भेट म्हणजे “जागतिक हास्य दिन” होय. मुंबई येथील डॉ. मदन कटारिया यांच्या असं लक्षात आलं की, त्यांच्याकडे येणाऱ्या असंख्य रुग्णांमध्ये मनोशारीरीक रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. म्हणजे लक्षणं जरी शारीरिक असली तरी कारणं ही मानसिक आहेत.

डॉ मदन कटारिया यांनी हसण्याचे फायदे ओळखून जगात सर्वत्र लोक हसावेत,आनंदी रहावेत, निरोगी असावेत यासाठी “हास्य योग” चळवळ सुरू केली. पत्नी आणि चार मित्रांसह मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाकडे सुरुवातीला हसण्यावारीच बघितल्या जाऊ लागलं ! हळूहळू जाहीरपणे हसण्याचें फायदे कळायला लागल्यावर लोक मोठया प्रमाणात सहभागी होऊ लागले. ठिकठिकाणी हास्य क्लब निर्माण होऊ लागले. आपण कधी बागेत जात नसाल तर अवश्य जायला लागा. तिथे गेल्यावर हसणाऱ्या माणसांकडे दुरूनच पाहून हसू नका. त्यांच्यात सामील व्हा. निर्भयपणे ,निर्भेळपणे हसायला पण शिका.

जगात आज ७०पेक्षा अधिक देशांमध्ये हास्य चळवळ पसरली आहे. एखाद्या बागेत, सभागृहात , सार्वजनिक ठिकाणी , सर्व सदस्यांनी दररोज एकत्र यायचं आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यात आलेला हास्य योग करायचा असा हा उपक्रम असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक पातळीवर बदल,सुधारणा ही करण्यात येतात.

#जगात हास्य चळवळीला
मोठयाप्रमाणात यश मिळाल्या नंतर ११ जानेवारी १९९८ रोजी मुंबईत पहिला जागतिक हास्य दिवस साजरा करण्यात आला. जगभरातून जवळपास १२ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. हा आकडा खराच असणार, कारण त्या दिवशी जेवण्यासाठी १२ हजार ताटं लागली होती☺️!

पुढे मात्र सर्व सहमतीने मे महिन्यात येणारा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आजचा ७ मे हा जागतिक हास्य दिन आहे.

मंडळी,आपण जर हा लेख वाचत असाल तर तो कृपया हसण्यावारी घेऊ नका. आज पासून मित्र मंडळी,नातेवाईक यांना विनोदी व्हिडीओ पाठवा, निखळ, निर्भेळ विनोद पाठवा,ऐकवा. कधी स्वतःच्या जीवनात विनोदी प्रसंग, परिस्थिती निर्माण झाली असेल तर मोकळेपणाने सांगा, स्वतःवर लोकांना हसू द्या. प्रत्येक जण जीवनात अशा प्रसंगांना सामोरा गेलेलाच असतो,आपण दुसऱ्याला हसविलं की तो ही आपणास निश्चितच हसवेल.

हस्वण्याच्या वेळी एकमेकांच्या जोडीदारांचा मूड बघा. मगच हसविण्याचं धाडस करा.एकमेकांच्या सासवा, मेहुणे, मेव्हण्या यांच्यावर विनोद करू नका. अन्यथा ते अंगलट आल्यास देवेंद्र भुजबळ जबाबदार असणार नाहीत !
थोर विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन म्हणूनच गेलाय की, ज्या दिवशी आपण हसला नाहीत,तो आपला दिवस वाया गेला,असं समजा.

काही लोक तर आयुष्यच वाया घालवतात. त्यांना काय म्हणावं ? असो. अजून जास्त काही लिहून मी आपल्याला बोअर करू इच्छित नाही. खरं म्हणजे, मी लिहितो, ते किती जण खरंच वाचतात, हा प्रश्नच आहे. कारण काही मित्र मंडळी माझं काही लिखाण त्यांना मिळता क्षणीच तत्परतेने मला लगेच अंगठा दाखवतात. खरंच वाचलं का म्हणून चिकाटीने,आशेने विचारलं तर काही कळवत नाहीत. यावरून आपण समजून घ्यायचं ,मित्राने आपल्याला खरंच अंगठा दाखवलाय म्हणून! असू द्या, ते असं करत असले तरी, शेवटी ते मित्रच आहेत.त्यामुळे देवा, त्यांना माफ़ कर .काही पाप लागू देऊ नकोस.

पण मित्रांनो, आज तरी आपण मला नुसता अंगठा दाखवू नका. लिहायचा कंटाळा असेल तर एखादा छानसा विनोद पाठवा. हसा आणि हसवा.आपल्याला हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


लेखन: देवेंद्र भुजबळ
+91 9869484800.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]