वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा देत पाठपुरावा करण्याची ग्वाही
लातूर/प्रतिनिधी ः-
कोरोनाच्या संकट काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिली त्याच वैद्यकीय क्षेत्रातील बांधवाना आंदोलन करण्याची वेळ येते हे सरकारचे अपयश असल्याचे सांगून वैद्यकीय शिक्षकांनी ज्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलेले आहे त्या मागण्या अतिशय रास्त असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या या मागण्या पुर्ण करुन देण्यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठविण्यात येऊन या करिता शासन दरबारी पाठपुरावा ही करण्यात येईल अशी ग्वाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्याकरीता संपुर्ण राज्यभरात विविध ठिकाणी असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आंदोलन सुरु केलेले आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनास भेट देत आ. निलंगेकरांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती अॅड. दिपक मठपती आदींसह नगरसेवक व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्यरत असलेल्या वैद्यकीय बांधवांचे कोवीडच्या संकट काळातील योगदान अतिशय अमुल्य होते असे सांगत या संकट काळात वैद्यकीय सेवेचे महत्व अधिक अधोरेखीत झाल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. जे बांधव संकट काळात धाऊन जातात त्याच बांधवांवर आता संकट आलेले असताना सरकार मात्र त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येती हे सरकारचे अपयश असून या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा उघडा पडलेला आहे. विशेष म्हणजे मागण्यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळेस सचिवांकडे चर्चेसाठी गेले त्यावेळी सचिवांनी दिलेली अपमानास्पद वागणूक हे सरकारच्या अहंकाराचे प्रतिकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच मंत्रालयात दोन-दोन वर्ष येत नसतील तर त्याच मंत्रालयातील अधिकारी अशाच पद्धतीने वागणे अपेक्षीत आहे. त्यांच्यावर सरकारचा अंकुश नसल्यामुळे या अधिकार्यांची मनमानी सुरु असल्याचेही आ. निलंगेकरांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय बांधवानी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या अतिशय रास्त असून या मागण्या शासन दरबारी मांडत त्या मान्य करून घेण्यासाठी आगामी अधिवेशन काळात प्रश्न उपस्थित करून त्यासाठी पाठपुरावाही करण्यात येईल अशी ग्वाही आ. निलंगेकरांनी यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना दिली. त्याचबरोबर ज्या सचिवाने अपमानास्पद वागणूक दिली आहे त्यांना पदमुक्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास यावेळी देण्यात आला. वैद्यकीय बांधवानी आंदोलन सुरु केलेले असले तरी त्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले असल्याबद्दल त्यांचे आभारही आ. निलंगेकरांनी यावेळी मानले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. उदय मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव डॉ. गणेश बंदखडके, डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. डोपे, डॉ. बनसोडे, डॉ. चावडा, डॉ. होळीकर, डॉ. कंदाकुरे, डॉ. होळंबे मॅडम, डॉ. राम मुंडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय बांधव, भगिंनी यांची उपस्थिती होती.











