हृषिकेश दातार व आकांक्षा लडकत यांचा विवाह सोहळा पुण्यात थाटात संपन्न
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे सुपुत्र हृषिकेश बनले पुण्याचे जावई…
पुणे, २९ डिसेंबर २०२१ – दुबईस्थित अल अदील समूहाचे संचालक हृषिकेश दातार पुण्याचे जावई बनले आहेत. हृषिकेश हे अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून त्यांची लग्नगाठ पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक-व्यावसायिक समीर लडकत यांची कन्या आकांक्षा हिच्याशी जुळली आहे. हृषिकेश व आकांक्षा यांचा विवाह नुकताच कोरेगाव पार्क भागात श्री. लडकत यांच्या निवासस्थानी कोरोना साथीबाबतचे नियम पाळून शानदार वातावरणात थाटामाटाने संपन्न झाला.
पारंपरिक रीतीरिवाजांची किनार असलेला हा नेत्रदीपक सोहळा गेले तीन दिवस सुरू होता. त्यासाठी दातार व लडकत परिवारांतील सदस्य तथा नातलग तसेच राजकीय व उद्योग क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते. त्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी आमदार धनंजय माने पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व गीता जाधव, डॉ. योगेश जाधव व डॉ. स्मिता जाधव यांच्याखेरीज देश-विदेशातील अनेक उद्योजक-व्यावसायिकांचा समावेश होता. दातार कुटुंबातर्फे डॉ. धनंजय दातार, सौ. वंदना दातार आणि रोहित दातार यांनी तर लडकत परिवारातर्फे समीर लडकत व सौ. मानसी लडकत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

हृषिकेश यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संयुक्त अरब अमिरात (युएई) व भारतातील नामवंत शाळांत झाले असून काही काळ ते पुण्यातील एका शाळेचेही विद्यार्थी होते. त्यांनी वर्ष २०१५ मध्ये दुबईतील एमिरेट्स एव्हिएशन युनिव्हर्सिटीतून बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम) ही पदवी प्राप्त केली. वर्ष २०१६ मध्ये त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अल अदील समूहामध्ये शिकाऊ उमेद्वार म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. एकीकडे घरच्या व्यवसायातील खाचाखोचा समजून घेत त्यांनी आखाती देशातील अल अदील सुपर स्टोअर्सच्या साखळीला तंत्रज्ञानाच्या नव्या पातळीवर पोचवले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी समूहासाठी विविध ईकॉमर्स प्रकल्प राबवण्यात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांची पत्नी आकांक्षा हीसुद्धा व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेतील पदवीधर आहे.











