महिलांच्या विविध स्पर्धाही संपन्न
लातूर/प्रतिनिधी: महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त शहरातील १००१ महिलांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास रविवारी सकाळी महारुद्राभिषेक केला.यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाही संपन्न झाल्या.
शहरातील महिलांकडून दरवर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास महारुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे.यावर्षीही ही परंपरा जपत १००१ महिलांनी ग्रामदैवताला रुद्राभिषेक केला.सकाळी ९ वाजता या रुद्राभिषेकास प्रारंभ झाला.अभिषेक संपन्न झाल्यानंतर महारुद्र पठणही करण्यात आले.

महिलांसाठी विविध स्पर्धा मंदिरात घेण्यात आल्या.यात रताळ्यापासून गोड पदार्थ बनविणे,कडधान्यापासून तिखट पदार्थ तयार करणे यासह विविध प्रकारांचा समावेश होता.या सर्व स्पर्धातील विजेत्या महिलांना लगेचच पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.स्पर्धांचे परीक्षक म्हणून नीता अग्रवाल व शीला यादव यांनी काम पाहिले. महारुद्राभिषेक व विविध स्पर्धांमध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला.महारुद्राभिषेक व विविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शुभदा रेड्डी,सुखदा मांडे व स्मिता गोजमगुंडे यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले.

उपस्थित सर्वांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.