येत्या शैक्षणिक वर्षापासून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्या बाबतची चाचपणी करावी
— वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई दि. 24: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबतची चाचपणी करण्यात यावी अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जगातील, देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. यापुढील काळात सामान्य माणसालाही उत्तम रुग्णसेवा मिळणे याला प्राधान्य देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वानुसार वैद्यकीय महाविद्यालये चालविता येतील का याबाबतची शक्यता तपासून घेणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढीवर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणारे वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) कसे उभारता येईल, याबाबतचे नियोजन करण्यात यावे.
आज महाराष्ट्रातील रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांची संख्या वाढणे जितके आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सातारा, उस्मानाबाद आणि अलिबाग येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ही शासकीय वैद्यकीय रुग्णालये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वातून महाविद्यालय कसे सुरु करता येईल याबाबत नियोजन करण्यात यावे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पहिल्या वर्षासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीसह, फर्निचर आणि साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे











