कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या कलाकारांसाठी सहाय्य योजना शासनाच्या विचाराधीन
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख.
मुंबई( प्रतिनिधी ):
राज्यातील जे कलाकार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडले आहेत, त्यांच्यासाठी सहाय्याची योजना शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. संघटित व असंघटित क्षेत्रातील कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी च्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव सुपे, उपसचिव विलास थोरात तसेच गायक आनंद शिंदे, रमेश कांबळे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
ऑर्केस्ट्रा कलाकार, बॅन्जो कलाकार, कवाली गायक, गीतकार, आंबेडकरी गायक, तबला व ढोलक वादक इत्यादी कलाकारांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करावी, आर्थिक अडचणीत सापडलेल्या कलाकारांना अर्थसाह्य करावे, कोरोनामुळे मरण पावलेल्या कलाकाराच्या कुटुंबास सहकार्य करावे अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या होत्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी पुढाकार घ्यावा व कलाकारांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी, संपूर्ण राज्यात लवकरच जिल्हा स्तरावर सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती दिली. यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर सूचना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. आर्थिक संकटात सापडलेल्या कलाकारांसाठी शासन सकारात्मक असून अर्थसाह्य करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.











