एमपीसी मार्फत निवड झालेल्या पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मागणी
निलंगा/प्रतिनिधी ः- देश व समाजसेवेचे स्वप्न बाळगून दिवस रात्र एक करत लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीसी) परीक्षा राज्यातील अनेक विद्यार्थी देत असतात. या परीक्षा उत्तीर्ण होऊन आयोगामार्फत निवड झालेल्या 432 पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देश व समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारे हजारो विद्यार्थी आहेत. या आयोगाच्या माध्यमातून परिक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी दिवस रात्र एक करून अभ्यास करीत असतात. परिक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर आयोगामार्फत पात्र झाल्यावर उमेदवारांना नियुक्ती देण्यात येते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सध्या 432 उमेदवार पात्र असून त्यांना अद्यापर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही. मोठ्या कष्टातून आणि आर्थिक अडचणीला तोंड देत हे उमेदवार आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पात्र ठरलेले आहेत. मात्र शासनाच्या वतीने अद्यापर्यंत त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या उमेदवारांसह त्यांच्या कुटूंबियांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विंवेचनेतूनच कांही दिवसापुर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आपली जीवन यात्रा संपविली असल्याची दुर्देवी घटनाही घडलेली आहे. आगामी काळात आणखीन कांही उमेदवारांनी हे दुर्देवी पाऊल उचलू नये याकरीता शासनाने पात्र 432 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणे आवश्यक आहे.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत या 432 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर सन 2018-19 मध्ये महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 3400 उमेदवारांच्या मुलाखती अजून घेतलेल्या नाहीत. हे 3400 उमेदवारही मुलाखतीसह नियुक्तीच्या प्रतिक्षेत असून या उमेदवारांच्या मुलाखती तात्काळ ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्यांनाही दिलासा देण्यात यावा अशी मागणी आ. निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.











